नवी दिल्ली : आगामी इराणी चषक क्रिकेट सामन्यासाठी अनुभवी फलंदाज हनुमा विहारीकडे शेष भारत संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तीन वर्षांनंतर होणाऱ्या या सामन्यात शेष भारतापुढे २०१९-२०च्या हंगामातील रणजी करंडक विजेत्या सौराष्ट्रचे आव्हान असेल.

राजकोट येथे १ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या इराणी चषकाच्या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी १५ सदस्यीय शेष भारत संघाची घोषणा केली. या संघात मुंबईचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान यांना स्थान मिळाले आहे. तसेच युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकात विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या यश धूलचाही शेष भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे. जैस्वाल, सर्फराज आणि धूल यांनी अलीकडच्या काळात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात जैस्वालने द्विशतक, तर सर्फराजने शतक साकारले. उदयोन्मुख वेगवान गोलंदाज उमरान मलिकचाही शेष भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकीची धुरा जयंत यादव, सौरभ कुमार आणि साई किशोर सांभाळतील. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघ : हनुमा विहारी (कर्णधार), मयांक अगरवाल, प्रियांक पांचाळ, अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जैस्वाल, यश धूल, सर्फराज खान, के. एस. भरत (यष्टिरक्षक), उपेंद्र यादव (यष्टिरक्षक), जयंत यादव, सौरभ कुमार, साई किशोर, मुकेश कुमार, उमरान मलिक, कुलदीप सेन, अरझान नागवासवाला.