मनप्रीत जुनेजा व स्मित पटेल यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळेच गुजरातने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत बडोद्यावर सहा गडी व आठ चेंडू राखून निसटता विजय नोंदविला.
प्रथम फलंदाजी करताना बडोद्याने ५० षटकांत ९ बाद २२४ धावा केल्या. त्यामध्ये आदित्य वाघमोडे याने सर्वाधिक ६६ धावा केल्या. सौरभ वाकसकर (३२), आदित्य रेड्डी (२६) व राकेश सोळंकी (नाबाद ४३) यांनीही बडोद्याच्या धावसंख्येस हातभार लावला. गुजरातच्या ऋषी कलारिया याने तीन तर अक्षर पटेल याने दोन बळी घेतले. गुजरातला विजयासाठी २२५ धावांचे लक्ष्य गाठताना थोडेसे झगडावे लागले. मात्र त्यांनी नियोजनबद्ध खेळ करीत ४९व्या षटकांत हे लक्ष्य साध्य केले. त्याचे श्रेय स्मित पटेल व मनप्रीत जुनेजा यांच्या शैलीदार १०४ धावांच्या भागीदारीस द्यावे लागेल. जुनेजा याने ८८ चेंडूंमध्ये तीन चौकारांसह ५८ धावा केल्या. स्मित पटेल याने सहा चौकारांसह नाबाद ८८ धावा केल्या. त्याला शेवटच्या षटकांमध्ये अब्दुल्लाह मलिक (नाबाद २१) याची चांगली साथ लाभली.