उदयोन्मुख फलंदाज ऋतुराज गायकवाडने (११२ चेंडूंत १३६ धावा) कर्णधाराला साजेशी खेळी साकारल्यामुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.

ऋतुराज आणि उपकर्णधार राहुल त्रिपाठी (५६) यांच्या उपयुक्त योगदानामुळे महाराष्ट्राने मध्य प्रदेशचा पाच गडी आणि दोन चेंडू राखून पराभव केला. ड-गटातील या सामन्यात मध्य प्रदेशने दिलेले ३२९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य महाराष्ट्राने अखेरच्या षटकांत गाठले. महाराष्ट्राचा गुरुवारी चंडीगडशी मुकाबला होणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना शुभम शर्मा (१०८) आणि कर्णधार आदित्य श्रीवास्तव (१०४) यांच्या शतकांमुळे मध्य प्रदेशने ५० षटकांत ६ बाद ३२८ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर अभिषेक भंडारीनेही ७० धावा केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्युत्तरात २४ वर्षीय ऋतुराजने सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर देत मध्य प्रदेशच्या गोलंदाजांवर दडपण टाकले. ऋतुराजने १४ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. त्याने यश नाहरसह (४९) १७ षटकांत १०७ धावांची सलामी दिली. मग त्रिपाठीच्या साथीने तिसऱ्या  गड्यासाठी ७५ धावांची भागीदारी रचली. वेंकटेश अय्यरने ऋतुराजला बाद केले. अखेरीस स्वप्निल फुलपागर (नाबाद २२) आणि अंकित बावणे (नाबाद २४) यांनी उपयुक्त फटकेबाजी करून महाराष्ट्राचा विजय साकारला.