सलामीवीर मुरली विजयला अखेर सूर गवसला आणि त्याने नाबाद ९१ धावांची दिमाखदार खेळी उभारली. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारताला पहिल्या दिवशी आत्मविश्वासाने फलंदाजी करता आली.
जोहान्सबर्ग कसोटीत फारसा प्रभाव न पाडू शकणाऱ्या ठरलेला २९ वर्षीय मुरली दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवरील आपल्या पहिल्या आणि कसोटी कारकीर्दीतील चौथ्या शतकापासून फक्त नऊ धावांच्या अंतरावर आहे. किंग्समेडवरील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात खराब सूर्यप्रकाशामुळे ६१ षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला, तेव्हा भारताची स्थिती १ बाद १८१ अशी समाधानकारक होती. विजयने २०१ चेंडूंत १७ चौकारांसह आपली खेळी साकारली, तर पुजारा ११७ चेंडूंत ७ चौकारांसह ५८ धावांवर खेळत आहे. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची नाबाद भागीदारी केली आहे.
सूर्याचा ढगांसोबत लपंडाव सुरू असल्यामुळे उसळी मारणाऱ्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. भारताने ३०व्या षटकात धावसंख्येचे शतक ओलांडले. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना बळी मिळवता आला नाही. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात १५३ धावांची खेळी साकारणाऱ्या पुजाराने आपली तीच खेळी पुढे चालू राखल्याप्रमाणे आत्मविश्वासाने फलंदाजी केली. जोहान्सबर्ग कसोटीत खराब कामगिरी करणाऱ्या मुरली विजयने ३४व्या षटकात आपले चौथे अर्धशतक साजरे केले आणि मग शतकाकडे वाटचाल सुरू केली. मग पुजाराने आपल्या कारकीर्दीतील १७व्या सामन्यात चौथे अर्धशतक पूर्ण केले.
त्याआधी, सकाळच्या सत्रात भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या कसोटी सामन्यात एकही बळी घेऊ न शकणाऱ्या आर. अश्विनऐवजी रवींद्र जडेजला संघात  स्थान दिले, तर दक्षिण आफ्रिकेने इम्रान ताहीरऐवजी रॉबिन पीटरसनला संघात स्थान दिले. आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षणासाठी आला तेव्हा जॅक कॅलिस सर्वप्रथम मैदानावर आला, त्याला स्टेडियममधील क्रिकेटरसिकांनी उभे राहून मानवंदना दिली. कॅलिसनेही आपली टोपी उंचावून त्यांचा आदर राखला. मग शिखर धवन आणि विजय यांनी ४१ धावांची सलामी दिली. मॉर्नी मॉर्केलने धवनचा अडसर दूर केला. तिसऱ्या स्लिपमध्ये अल्विरो पीटरसनने त्याचा सुरेख झेल टिपला. धवनने ४९ चेंडूंत चार चौकारांनिशी २९ धावा केल्या.
धावफलक
भारत (पहिला डाव) : शिखर धवन झे. पीटरसन गो. मॉर्केल २९, मुरली विजय खेळत आहे ९१, चेतेश्वर पुजारा खेळत आह ५८, अवांतर (लेगबाइज १, वाइड १, नोबॉल १) ३, एकूण ६१ षटकांत १ बाद १८१. बाद क्रम : १-४१.
गोलंदाजी : डेल स्टेन १६-६-४९-०, व्हर्नन फिलँडर १४-४-३९-०, मॉर्नी मॉर्केल १२-३-२६-१, जॅक कॅलिस ७-१-२३-०, रॉबिन पीटरसन १२-२-४३-०.