Virat Kohli Anushka Sharma Video: भारतीय संघाचा माजी कसोटी कर्णधार आणि रनमशीन म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विराट कोहलीच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मानेही कसोटी क्रिकेटला अलविदा केला आणि नंतर १२ मे रोजी विराटनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता निवृत्तीनंतर विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा वृंदावनला गेले आहेत.

विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने आपल्या पोस्टला कॅप्शन देत लिहिले की, “टीम इंडियाची कसोटी कॅप परिधान करून मला १४ वर्ष झाली. खरं सांगू तर, हा प्रवास मला कुठे नेईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. या प्रारुपाने माझी परीक्षा पाहिली, मला घडवलं आणि आयुष्यभरासाठी शिदोरी दिली.”

तसेत त्याने पुढे लिहिले की, “टीम इंडियासाठी कसोटी खेळणं हे माझ्यासाठी नेहमीच खास होतं. या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा निर्णय मुळीच सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी या खेळासाठी सर्वकाही दिलं. त्याहून अधिक या खेळाने मला परत दिलं. कृतज्ञ भावनेने भरलेल्या हृदयानं मी कसोटीचा प्रवास थांबवतोय.”

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एका दिवसानंतर, मंगळवारी सकाळी, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा त्यांच्या कुटुंबासह संत प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचले. जिथे सर्वांनी आध्यात्मिक गुरू संत प्रेमानंद महाराजांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर दिल्लीला रवाना झाले.

कसोटीमधून निवृत्तीच्या घोषणेनंतर, विराट मंगळवारी त्याच्या कुटुंबासह वृंदावनला पोहोचला. जिथे त्यांनी संत प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले. संत प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी विराट कोहलीची ही तिसरी भेट आहे. याआधी, वाईट फॉर्मातून जात असलेला विराट कोहली जानेवारी २०२५ मध्ये संत प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी आला होता. यापूर्वी, विराट कोहली त्याच्या कुटुंबासह ४ जानेवारी २०२३ रोजी संत प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी आला होता.

विराट कोहलीने आणि अनुष्का शर्मा यांचा प्रेमानंद महाराजांच्या मठातील फोटो व्हायरल झाला आहे. यादरम्यान अनुष्का आणि विराट अगदी साध्या वेशात दिसत होते. पण विराट कोहलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यादरम्यान प्रेमानंद महाराजांची भेट घेत असताना विराट कोहली समोर बसला होता. त्याच्या हातात काऊंटर दिसला. हा काऊंटर देवाच्या नामाचा जप करताना त्या जपाचा आकडा मोजण्यासाठी वापरला जातो. विराटच्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं, ज्याचा व्हीडिओ देखील व्हायरल होत आहे.

विराट कोहली आता कसोटी निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. दरम्यान आता आय़पीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांमध्येही कोहली खेळताना दिसेल.