Virat Kohli Most Fifties In ICC Events: मंगळवारी दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीने ८४ धावांची खेळी करत सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीने संयमी अर्धशतक झळकावत, आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक (२४) अर्धशतके करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी २३ अर्धशतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी होता. आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या बाबतीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या १८ अर्धशतकांसह स्थानावर आहे तर श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराचा १७ अर्धशतकांसह चौथ्या स्थानी आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग १६ अर्थशतकांसह पाचव्या स्थानावर आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा

यासह विराट कोहलीने या उपांत्य सामन्यात भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनचा २०१३ ते २०१७ या काळातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या १० सामन्यात ७०१ धावा करण्याचा विक्रमही मोडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली १९९८ ते २००४ या काळात १३ सामन्यात ६६५ धावांसह भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. ३६ वर्षीय विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २६५ धावांचा पाठलागात हा टप्पा गाठला. कोहलीने भारतासाठी १७ व्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात ही कामगिरी केली.

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आतापर्यंत, कोहलीने दुबईमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून देणारे शतक झळकावले होते. तर गट फेरीतील इतर दोन सामन्यांत त्याची कामगिरी साधारण राहिली आहे.

भारताची अंतिम फेरीत धडक

दरम्यान आजच्या सामन्यात, ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ७३ धावा केल्या तर अ‍ॅलेक्स कॅरीने ६१ धावा केल्या. भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला ४९.३ षटकांत २६४ धावांत गुंडाळले. भारताकडून मोहम्मद शमीने तीन तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन बळी घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती. सलामीवीर शुभमन गिल लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माही २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीच्या ८४ धावा, विराट-श्रेयसची ९४ धावांची भागीदारी, हार्दिकचे दोन षटकार आणि राहुलच्या विजयी षटकारासह भारताने ऑस्ट्रेलियाकडून २०२३ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेत दणदणीत विजय नोंदवला. भारताने उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीसह ऑस्ट्रेलियाला नमवत शानदार विजय मिळवला आहे. यासह भारताने ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सने मोठा विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे.