चॅम्पियन्स करंडकात अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून हार आणि त्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळेंचा राजीनामा यामुळे कर्णधार विराट कोहलीवर सध्या चहुबाजूंनी टिकेची झोड उठतेय. त्यातच जेफ्री बॉयकॉट सारख्या इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी अंतिम सामन्यात कोहलीचा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेण्यासारखा होता अशी टिका केली होती. मात्र सुनिल गावसकर आता विराट कोहलीच्या मदतीसाठी धावून आले आहेत.

”विराट कोहलीदेखील एक माणूस आहे. त्याच्याकडून प्रत्येक वेळी चांगल्या खेळाची अपेक्षा होणं साहजिक आहे मात्र एखाद्या दिवशी त्याची कामगिरीही ढासळू शकतेच. त्यामुळे प्रत्येक सामन्यात कोहली शतक झळकवेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. या अपेक्षांचं बोझं विराटच्या खांद्यावरुन कमी झालं तर त्याच्या कामगिरीत आणखी सुधारणा होईल”, असं गावसकर म्हणाले.

उपांत्य सामन्यात तुफान फटकेबाजी करणारा विराट कोहली अंतिम सामन्यात मात्र मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला होता. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीवर बोलताना गावसरकर यांनी विराट कोहलीची पाठराखण केली. अंतिम सामन्यात सुरुवातीच्या काही षटकांमध्ये भारताने सामन्यावर चांगली पकड ठेवली होती. बुमरहाच्या गोलंदाजीवर फखार झमान धोनीकडे झेल देत बादही झाला होता, मात्र तो बॉल नो पडल्यामुळे फखार झमानला जीवदान मिळालं. यानंतर फखार झमानने शतक झळकावत सामना भारताला विजयापासून दूर नेलं होतं. हा नो बॉल बुमराहला आयुष्यभर सतावत राहिलं असंही गावसकर म्हणाले.

चॅम्पियन्स करंडकानंतर विराट कोहलीची टीम इंडिया २३ तारखेला वेस्ट इंडिजसोबत खेळणार आहे. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकातल्या पराभवाची मरगळ झटकून कोहली संघाला कसा पुढे नेतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.