Virat Kohli Cryptic Post Amid Retirement Rumors: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहली टीम इंडियासह पर्थमध्ये दाखल झाला आहे. येत्या १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी रोहित-विराटची कारकीर्द आणि हे दोघेही २०२७चा विश्वचषक जिंकणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चांदरम्यान विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला पोहोचताच एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
विराट कोहली अखेरचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात खेळताना दिसला होता. यानंतर आता थेट ६ महिन्यांनंतर विराट मैदानावर खेळण्यासाठी उतरणार आहे. १६ ऑक्टोबरला पहाटेच विराट-रोहितसह टीम इंडिया पर्थमध्ये दाखल झाली. यादरम्यानचे रोहित-विराटचे व्हीडिओदेखील व्हायरल झाले आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यानंतर विराट कोहलीने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विराटच्या या पोस्टमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. विराटच्या या पोस्टला त्याच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चांशी जोडलं जात आहे. विराट कोहलीने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता तो फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा भाग आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका ही विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटची मालिका असू शकते, अशी चर्चा आहे. यादरम्यान विराट कोहलीने पोस्ट शेअर करत म्हटलं, “जेव्हा तुम्ही प्रयत्नांची साथ सोडता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने हरता.” चाहते आणि क्रिकेट तज्ञ आता कोहलीच्या या पोस्टकडे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसंबंधित चर्चांना उत्तर म्हणून पाहत आहेत.
३६ वर्षीय विराट कोहलीची ही पोस्ट पाहता आता तो २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळणार असल्याचं चाहते म्हणथ आहेत. सर्वांचे लक्ष विराटच्या फिटनेस आणि फॉर्मवर असेल, कारण हा ऑस्ट्रेलिया दौरा त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेत त्याच्या जुन्या शैलीत वादळी फटकेबाजी करताना दिसावा, अशी चाहते आशा करत आहेत.
ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील निराशाजनक कामगिरीनंतर, विराट कोहलीने मे महिन्यात IPL 2025 चा हंगाम सुरू असतानाच निवृत्ती जाहीर केली. विशेष म्हणजे, त्याने याच हंगामात आपल्या कारकिर्दीतील पहिलं IPL विजेतेपदही आपल्या नावे केलं.