Virat Kohli only Indian cricketer to give fitness test in London: भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी फिटनेस टेस्ट दिली आहे. बीसीसीआयच्या देखरेखीखाली झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये वरिष्ठ खेळाडू ते नवे खेळाडू सहभागी झाले होते. पण भारताचा रनमशीन असलेल्या विराट कोहलीने मात्र इंग्लंडमध्ये फिटनेस टेस्ट दिली आहे.

बीसीसीआयने विराट कोहलीला लंडनमध्ये फिटनेस टेस्ट देण्यासाठी परवानगी दिली आहे. ज्यामुळे आता विराट कोहलीला सूट का यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. बंगळुरूमधील एनसीएमध्ये गेल्या आठवड्यात २९ ऑगस्टला खेळाडूंना फिटनेस टेस्टसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. यादरम्यान रोहित शर्मा, शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंनी फिटनेस टेस्ट दिली होती. मात्र कोहलीला लंडनमध्ये टेस्ट देण्याकरता परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, सध्या आपल्या कुटुंबासह इंग्लंडमध्ये असलेल्या कोहलीला लंडनमध्ये देखरेखीखाली त्याची फिटनेस टेस्ट पूर्ण करण्याची परवानगी देण्यात आली. सर्व खेळाडूंसाठी सामान्यतः अपेक्षित असलेल्या प्रोटोकॉलमुळे विराटसाठी बदलण्यात आलेल्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कसोटी आणि टी-२० मधून निवृत्त झालेला विराट कोहली आता फक्त एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत कोहली पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसू शकतो. विराट कोहलीच्या फिटनेस टेस्टचा अहवाल फिजिओने बीसीसीआयला पाठवला आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विराट कोहलीसाठी दिलेल्या खास निर्णयाबाबत वक्तव्य केलं नाही, परंतु त्यांनी म्हटलं की कोहलीने विदेशात टेस्ट घेण्यासाठी “पूर्व परवानगी घेतली असावी”. पण या घटनेमुळे भविष्यात इतर खेळाडूंना विशेषतः विदेशात फिटनेस मिळवत असलेल्या खेळाडूंना किंवा भारताबाहेर वैयक्तिक जबाबदारी असलेल्या खेळाडूंना अशीच सूट देण्यात येईल का, याबाबत चर्चा सुरू आहेत.

भारताच्या कोणकोणत्या खेळाडूंनी फिटनेस टेस्ट दिली?

अहवालानुसार, पहिल्या टप्प्यात फिटनेस चाचणी पूर्ण केलेल्या किंवा अंशतः उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, मोहम्मद सिराज, शुबमन गिल, जितेश शर्मा, प्रसिध कृष्णा, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, हर्षित राणा, श्रेयस अय्यर, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रजत पाटीदार, रवी बिश्नोई, संजू सॅमसन, शिवम दुबे, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, मुकेश कुमार, हार्दिक पांड्या, सरफराज खान, तिलक वर्मा, अभिमन्यू ईश्वरन, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि यशस्वी जैस्वाल यांचा समावेश आहे.

या टप्प्यात, खेळाडूंच्या रिकव्हरी पॅटर्न आणि मूलभूत स्ट्रेंथ टेस्टला प्राधान्य देण्यात आले. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, बहुतेक खेळाडूंनी फिटनेस पॅरामीटर्स यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. पण, काही खेळाडूंनी फक्त आंशिक फिटनेस चाचण्या घेतल्या आहेत. फिटनेस टेस्टचा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये होणार आहे, ज्यामध्ये सध्या पुनर्वसन किंवा रिटर्न टू प्ले (RTP) टप्प्यातून जात असलेल्या खेळाडूंचा समावेश असेल. या यादीत केएल राहुल, आकाश दीप, रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी आणि ऋषभ पंत यांची नावे आहेत.

याशिवाय, दुखापती किंवा आजारपणामुळे पहिल्या टप्प्यात टेस्ट न देऊ शकलेल्या खेळाडूंचाही या टप्प्यात समावेश केला जाईल. गेल्या काही वर्षांत दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती संख्या पाहता, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन फिटनेसबाबत अधिक कठोर झाले आहेत.