विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करतो आहे. न्यूझीलंडविरुद्धची वन-डे मालिका भारताने गमावली असली तरीही याआधीच्या टी-२० मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. त्याआधी घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला हरवण्यातही भारतीय संघ यशस्वी ठरला. विराट कोहलीच्या या खेळावर पाकिस्तानचा माजी खेळाडू मोईन खान चांगलाच प्रभावित झाला आहे. कोहलीकडे महान खेळाडू बनण्याची क्षमता असल्याचं मोईन खानने म्हटलं आहे.
“सध्याच्या घडीला विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे ज्याच्यात अनेक विक्रम मोडण्याची आणि महान खेळाडू बनण्याची क्षमता आहे.” मोईन खान GTV वाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होता. यावेळी बोलत असताना मोईन खानने धोनीचंही कौतुक केलं. “भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात धोनीचा मोठा वाटा आहे. सौरव गांगुलीने ज्या पद्धतीने भारतीय संघात बदल घडवायला सुरुवात केली, त्याच पद्धतीने धोनीने भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. याच कारणामुळे भारतात नवीन खेळाडू तयार होत आहेत.”
पाकिस्तान क्रिकेटच्या कार्यपद्धतीवर मात्र मोईन खानने नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानी संघात मॅच-विनींग खेळाडूंची कमतरता असल्याचं मोईन खानने सांगितलं. “ज्यावेळी मी पाकिस्तानी संघात होतो, त्यावेळी संघात अनेक मॅच विनींग खेळाडू होते. मात्र सध्याच्या संघाची अशी परिस्थिती नाही. मिसबाह उल-हकने प्रशिक्षक आणि निवड समिती प्रमुख अशी दोन्ही पदं स्विकारणही माझ्या दृष्टीने योग्य नाही.”