भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिका पार पडली आहे. त्याचबरोबर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतून काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ज्यामध्ये स्टार फलंदाज विराट कोहलीचा समावेश आहे. सध्या तो सुट्टीवर असल्याने त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर लाखो कमेंट्स आणि लाइक्स येत आहेत.

विराट कोहलीने पुन्हा एकदा त्या टी-२० विश्वचषक २०२२ मधील ऐतिहासिक दिवसाची आठवण करून दिली आहे. त्याने ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले आहे. कोहलीने लिहिले की, “२३ ऑक्टोबर २०२२ माझ्या हृदयात नेहमीच खास असेल. याआधी क्रिकेट सामन्यात अशी ऊर्जा कधीच अनुभवली नव्हती. किती छान संध्याकाळ होती ती.”

विराट कोहलीच्या या पोस्टला लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. असा सामना आणि खेळी यापूर्वी कधीच पाहिली नसल्याचे लोक सांगतात. विराट कोहलीनेही या सामन्यानंतर स्वीकारले होते की, ही त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम खेळी होती.

हेही वाचा – FIFA World Cup 2022: मेस्सीला शिवीगाळ केल्याने अर्जेंटिना आणि मेक्सिकोच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी, पाहा व्हिडिओ

२३ ऑक्टोबरला टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक सामना कोण विसरू शकेल. विशेषत: विराट कोहलीने हा सामना इतिहासात नोंदवला. विराट कोहलीने ज्या नेत्रदीपक पद्धतीने भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला तो भारत, पाकिस्तान किंवा संपूर्ण जग कधीही विसरू शकणार नाही. विराट कोहलीच्या ८२ धावांच्या संस्मरणीय खेळीने भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२२ च्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना ५० पेक्षा कमी धावसंख्येपर्यंत भारताचे आघाडीचे ४ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. या परिस्थितीतून विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने भारताच्या विजयाचा पाया रचला आणि अखेरच्या चेंडूवर भारताने सामना जिंकला. हॅरिस रौफच्या षटकात विराट कोहलीच्या २ षटकारांनी सामना पूर्णपणे उलटून गेला. हा सामना वर्षानुवर्षे स्मरणात राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.