PM Modi Interaction With Virat Kohli: टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतासाठी मोठी धावसंख्या उभारणारा विराट कोहली सध्या त्याच्या नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. एरवी मैदानावर आक्रमक दिसणारा कोहली फायनलचा सामना जिंकल्यापासून अत्यंत नम्रपणे प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये दिसून आला आहे. मैदानात शेवटच्या चेंडूनंतर कोहलीच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू सुद्धा अशीच काही कहाणी सांगत होते. आज, ५ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्युब चॅनेलवर टीम इंडियासह मोदींच्या गप्पांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यात सुद्धा कोहलीचा वेगळाच अंदाज दिसून आला. चला तर मग, अहंकार, न्याय व खेळाचा आदर याविषयी कोहलीने मोदींशी केलेली चर्चा पाहूया..

पंतप्रधान नरेंद्र मोदी व विराट कोहलीमध्ये काय झालं संभाषण?

पंतप्रधान मोदी: विराट, तुझी यंदाची लढाई तर फार उतार चढावांची होती, काय सांगशील?

विराट कोहली: यंदाचा विश्वचषक, फायनलचा दिवस नेहमी माझ्या लक्षात राहील. भारताच्या पूर्ण विश्वचषक मोहिमेत मी मला हवं तसं योगदान देऊ शकलो नव्हतो. तेव्हा मी राहुल भाईंना सुद्धा म्हणालो होतो की मला असं वाटतंय मी स्वतःला आणि संघाला न्याय देत नाहीये. तेव्हा राहुल भाईंनी मला सांगितलं होतं की जेव्हा वेळ येईल तेव्हा तू नक्की कमाल करून दाखवशील. आमचं हे बोलणं झालं त्यानंतर फायनलच्या सामन्यात मी रोहितला म्हणालो होतो की, मला आत्मविश्वासच नाहीये, जसं मला जमेल तशी मी बॅटिंग करेन, पण मी गेलो आणि पहिल्याच चार चेंडूंमध्ये तीन चौकार मारले, मी तेव्हाच रोहितला पुन्हा म्हणालो की हा काय खेळ आहे? कधी कधी आपल्याला काहीच मिळत नाही, कधीतरी सगळंच मिळून जातं. त्या स्थितीत संघाची गरज बघून स्वतः ला झोकून देणं गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलं आणि मला असं वाटतं की त्या झोनमध्ये मला कुणीतरी टाकलं होतं. काय झालं, कसं झालं माहित नाही पण गोष्टी घडत गेल्या.

मला नंतर कळलं की जे व्हायचंय ते कुठेतरी लिहून ठेवलेलं असतं आणि ते होतंच, सामन्याच्या बाबत सुद्धा हेच झालं, शेवटाकडे प्रत्येक चेंडूवर सामना बदलत होता. मॅच पलटताना आम्ही प्रत्येक चेंडू जगलोय. एका क्षणी असं वाटलं होतं की आता सामना हातून गेलाय तेव्हाच हार्दिकने विकेट घेतली मग एक एक चेंडू आम्ही खेळत गेलो. मला आता याचा आनंद वाटतोय की महत्त्वाच्या दिवशी मला संघाला विजय मिळवून देण्यात थोडं तरी योगदान देता आलं.

पंतप्रधान मोदी: काही क्षण असे येतात जिथे असंख्य लोक तुम्हाला सांगत असतात की, तू करशीलच! कदाचित त्याचा प्रभाव सुद्धा आपल्या खेळावर होऊ शकतो; तुझ्या विजयावर घरच्यांची कशी प्रतिक्रिया होती?

विराट कोहली: खरंतर दोन्ही देशांमध्ये वेळेचा एवढा फरक आहे की घरी जास्त बोलणं व्हायचं नाही त्यात माझी आई तर लगेच टेन्शन घ्यायची. आणि खेळाबाबत सांगायचं तर, मी जे करायचा प्रयत्न करत होतो ते माझ्याकडून होत नव्हतं. त्यात जेव्हा आपल्याला असं वाटतं की “मी करेन” तेव्हा तुमचा अहंकार वर येतो आणि खेळ तुमच्यापासून दूर जातो. हेच समजण्याची गरज होती. माझ्यासाठी तर अशी परिस्थितीच नव्हती, खेळ असा चालू होता की माझा अहंकार डोकं वर काढूच शकणार नव्हता. ज्या दिवशी आम्ही खेळाला आदर दिला, त्या दिवशी खेळाने आम्हाला विजय दिला.

Video: विराट कोहलीचं मोदींना नम्र उत्तर..

हे ही वाचा<< “तुझी हिंमत कशी झाली?”, कुलदीप यादवला मोदींचा थेट प्रश्न; रोहित शर्माची तक्रार करत गोलंदाजानेही दिलं स्पष्ट उत्तर, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाच्या दोन दिवसांच्या सेलिब्रेशन टूर नंतर आता ५ जुलैला सकाळीच विराट कोहली आपल्या पत्नी व मुलांसह वेळ घालवण्यासाठी लंडनला रवाना झाला आहे. अनुष्का शर्मा सध्या वामिका व अकायसह लंडनमध्ये आहे.