Virat Kohli On His Success Mantra: टीम इंडियाचा किंग कोहली पाच सामन्यांमध्ये तब्बल ३५४ धावा करून यंदाच्या विश्वचषकात सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरतोय. प्रत्येक सामन्यात कोहली वेगवेगळ्या विक्रमांना गवसणी घालतोय. कधी शंभर धावांची खेळी तर कधी जबरदस्त अर्धशतक झळकावून कोहलीने टीम इंडियाला विश्वचषकातील अपराजित टीम बनवण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. आता २९ ऑक्टोबर २०२३ ला भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर विश्वचषकातील गतविजेत्या इंग्लंडचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. तत्पूर्वी किंग कोहलीने आपल्या जबरदस्त फॉर्मविषयी बोलताना आपली कोणती सवय व विचारसरणी टीमला मॅच जिंकून देण्यासाठी सर्वोत्तम ठरतेय याविषयी भाष्य केलं आहे.
कोहलीने स्टारस्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “मी दररोज, प्रत्येक सराव सत्र, प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक हंगामात स्वतःला कसे चांगले बनवता येईल यावर काम केले आहे. त्यामुळे मला इतके दिवस फॉर्म टिकवून ठेवण्यास मदत झाली. आपण सर्व काही साध्य केलं आहे किंवा सर्वोत्तम आहोत अशी मानसिकता न ठेवता सातत्यपूर्ण कामगिरी करणे शक्य आहे असे मला वाटत नाही. जर तुमच्याकडे केवळ एखादे ध्येय असेल, तर काही काळानंतर तुम्ही समाधानी होऊन काम करणे थांबवू शकता पण विकास किंवा कालपेक्षा आज कसे उत्तम होता येईल हे तुमचे ध्येय असेल तर तुम्ही तो प्रवास सुरु ठेवता. “
कोहली सांगतो की, “भूतकाळापेक्षा आज उत्तम होणे नेहमीच माझे ध्येय राहिले आहे, सर्वोत्कृष्ट होणं हे माझे ध्येय नाही कारण मला प्रामाणिकपणे उत्कृष्टतेची व्याख्या काय आहे हे माहित नाही. माझ्या सध्याच्या ध्येयाला कोणतीही मर्यादा नाही, किंवा तुम्ही ठराविक स्तरावर पोहोचल्यावर तुम्ही उत्कृष्टता प्राप्त केली आहे असे कोणतेही निश्चित मानक नाही. म्हणून, मी दररोज चांगल्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि हो, स्वतःला मिळालेले यश हे जोडून आलेले असते कारण मूळ विचार किंवा मानसिकता ही संघाच्या विजयाचा विचार इतकीच असते.”
हे ही वाचा<< “पांड्याला संघात घेण्याचा धोका पत्करून..”, IND vs ENG आधी वसीम अक्रमचा सल्ला, म्हणाला “शमी हाच..”
पुरुषांच्या ३१ एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये, कोहलीने ५५.३६ च्या सरासरीने १,३८४ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि नऊ अर्धशतकं ठोकली आहेत. यापैकी १०७ हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे.