IND vs PAK Match Updates: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (१२२) याने सोमवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४७ वे शतक झळकावले. त्याचबरोबर किंग कोहलीने अनेक विक्रम रचले. या कालावधीत विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीत १३ हजार धावाही पूर्ण केल्या. या शतकी खेळीच्या जोरावर अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले आहेत.
विराट कोहलीचे कोलंबोसोबतचे प्रेमसंबंधही कायम राहिले, जिथे तो पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात यशस्वी झाला. कोहलीने केवळ ९४ चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १२२ धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान कोहलीने माजी कर्णधार एमएस धोनी आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही विक्रम मोडीत काढले.
रन मशीन कोहलीचा मोठा विक्रम –
विराट कोहलीने १२ व्यांदा एका वर्षात १००० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. विराट कोहली सर्वाधिक वर्षांमध्ये १००० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. क्रिकेटमध्ये सर्वाधिक वर्षांमध्ये १००० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. मात्र, विराट कोहलीने या प्रकरणात एमएस धोनी आणि राहुल द्रविडला मागे टाकले. धोनी आणि द्रविड या दोघांनीही ११ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IND vs PAK: कोहलीचं शतक पाहून गौतम गंभीर काय म्हणाला? के. एल. राहुलचं कौतुक आणि विराटला…
सर्वाधिक वर्षांत १०००+ आंतरराष्ट्रीय धावा करणारे भारतीय फलंदाज –
१६ – सचिन तेंडुलकर
१२ – विराट कोहली
११ – एमएस धोनी
११ – राहुल द्रविड
९ – रोहित शर्मा<br>९ – सौरव गांगुली
पाकिस्तानविरुद्ध सचिननंतर विराट कोहलीची दहशत –
बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध १००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या बाबतीतही महान फलंदाज सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. तेंडुलकरने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध १३२२ धावा केल्या आहेत.
कोहलीचे कोलंबोवर खास प्रेम –
विराट कोहलीने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर सलग चौथे एकदिवसीय शतक झळकावले. एकाच मैदानात सलग चार शतके झळकावून कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमलाची बरोबरी केली आहे. आमलाने सेंच्युरियनमध्ये सलग चार एकदिवसीय शतके झळकावली आहेत.