Washington Sundar Clean Bowled Joe Root Video: इंग्लंड संघाला भारतीय संघाने दुसऱ्या डावात धावा करण्याची फारशी संधी दिली नाही. टीम इंडियाने चौथ्या दिवशी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या धावांवर अंकुश ठेवला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं. पण भारताचा अष्टपैलू फिरकीपटू वॉशिंग्टनने नावाप्रमाणेच एकदम सुंदर गोलंदाजी केली आहे. सुंदरने मैदानावर जम बसवलेल्या जो रूटला बाद करत ड्रीम विकेट मिळवली.
इंग्लंडने लंचब्रेकपर्यंत पहिल्या सत्रात ४ विकेट्स गमावत फक्त ९८ धावा केल्या होत्या. त्यामुळे जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी संघाचा डाव सावरण्यासाठी मोठी भागीदारी रचणं महत्त्वाचं होतं. संघाचा अनुभवी गोलंदाज जो रूट संयमी फलंदाजी करत होता. पाहता पाहता रूट आणि स्टोक्स यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुढे नेत होता.
रूटला बाद करण्यासाठी सर्वच गोलंदाज मोठे प्रयत्न करत होते. सिराजच्या गोलंदाजीवर जो रूट दोन वेळा रिव्ह्यूमुळे वाचला. यासह हळूहळू रूट आपला डाव पुढे नेत होता. भारताला रूटच्या विकेटची गरज असताना कर्णधाराने फिरकीपटूंना गोलंदाजीची जबाबदारी सोपवली. जडेजाने किफायतशीर गोलंदाजी केली तर वॉशिंग्टनने संघाला दोन विकेट मिळवून दिल्या.
वॉशिंग्टन सुंदरच्या ४३व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जो रूट त्याचा सर्वात आवडता स्वीप शॉट खेळायला गेला. स्वीप शॉट खेळताना जो रूट गुडघ्यावर खाली बसला आणि फटका खेळायला गेला. पण सुंदरचा चेंडू खेळायला चुकला आणि विकेटवर जाऊन आदळला. चेंडू स्टम्पसवर आदळताच बेल्स हवेत विखुरल्या.
रूटने मागे वळून स्टम्पकडे पाहिलं तर बेल्स विखुरल्या होत्या आणि हे दृश्य पाहताच रूटने डोळे बंद करून घेतले. जमिनीवर हात टेकत त्याने निराशा व्यक्त केली आणि तो पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. रूटने इंग्लंडकडून आतापर्यंत दुसऱ्या डावात सर्वात मोठी खेळी केली आहे. रूटने ९६ चेंडूत एका चौकारासह ४० धावा केल्या होत्या.
इंग्लंड संघाचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. दोन सत्रात इंग्लंडने ६ विकेट्स गमावले आहेत, यासह यजमान संघाने टीब्रेकपर्यंत ६ बाद १७५ धावा केल्या आहेत. भारतानेही पहिल्या डावात ३८७ धावा केल्याने पहिल्या डावातील इंग्लिश संघाकडे काहीच आघाडी नसल्याने आता १७५ धावांची आघाडी आहे.