Washington Sundar: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये पार पडला. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते आणि इंग्लंडचे खेळाडू कधीच विसरू शकणार नाहीत. इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावांचा डोंगर उभारल्यानंतर सामन्यावर आपली मजबूत पकड केली होती. भारताच्या हातून हा सामना जवळपास निसटला होता. पण शेवटी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मिळून इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला. दोघांनी मिळून महत्वाची भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी शतकं झळकावली. ज्यावेळी जडेजाने आपलं शतक पूर्ण केलं, त्यावेळी हॅरी ब्रुक हात मिळवण्यासाठी पुढे आला होता. पण वॉशिंग्टन सुंदरने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही.
हा सामना भारतीय संघाच्या हातून पूर्णपणे निसटला होता. सामना जिंकणं दूर सामना वाचवणंही कठीण दिसत होतं. पण भारतीय फलंदाज जिद्दीने उभे राहिले. ४ सत्र फलंदाजी केली आणि सामना ड्रॉ केला. सुरूवातीला गिल आणि केएल राहुल यांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली आणि भक्कम पाया रचला. शेवटी वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार शतकं झळकावली.
ज्यावेळी हे दोन्ही फलंदाज शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. त्यावेळी सामन्याचा निकाल लागू शकणार नाही, हे इंग्लंडच्या खेळाडूंना माहीत होतं. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू हात मिळवणी करण्यासाठी पुढे येत होते. मात्र भारतीय खेळाडू काही माघार घ्यायला तयार नव्हते. या दोघांनी मिळून सामना वाचवण्यात मोलाचं योगदान दिलं. त्यामुळे त्यांना शतक पूर्ण करण्याचा पूर्ण हक्क होता, असं कर्णधार गिलने सामन्यानंतर सांगितलं. दोघेही ९० धावांवर फलंदाजी करत असताना स्टोक्सने गोलंदाजी करण्याची जबाबदारी हॅरी ब्रुककडे सोपवली. जो सहसा गोलंदाजी करत नाही.
ब्रुकच्या गोलंदाजीवर षटकार खेचून जडेजाने आपलं शतक पूर्ण केलं. त्यावेळी इंग्लंडला वाटलं की, आता तरी हे हात मिळवतील आणि सामना ड्रॉ होईल. हॅरी ब्रुक हात मिळवण्यासाठी पुढे येत होता. इतक्यात वॉशिंग्टन सुंदरने त्याला दुर्लक्ष केलं आणि पुढे निघाला हे पाहून हॅरी ब्रुकलाही राग अनावर झाला होता. जडेजाचं शतक झाल्यानंतरही सामना सुरूच होता. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने आपलं शतक पूर्ण केलं आणि भारतीय संघाने डाव घोषित केला. त्यामुळे सामना ड्रॉ झाला. इंग्लंडचा संघ या मालिकेत १-२ ने आघाडीवर आहे. मालिकेतील पाचवा सामना येत्या ३१ जुलैपासून द ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे.