रविवारी देशभरात फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघावरही फ्रेंडशिप डेचा फिव्हर दिसून आला. ‘टेढा है पर मेरा है’ असं म्हणत सलामीवीर शिखर धवनने कर्णधार विराट कोहलीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून कोलंबो कसोटीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने लंकेचा पराभव करत मालिकेत बाजी मारली. व्यस्त वेळापत्रकामुळे संघातील खेळाडू कुटुंबापासून दूर बहुतांशी वेळ एकत्रच असतात. मैदानात उत्तम समन्वय साधून संघाला विजय मिळवून देणारे हे खेळाडू मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत. याची प्रचिती शिखर धवनच्या व्हिडीओवरुन येते. शिखर धवनने फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला. या पोस्टमध्ये धवन म्हणतो, ‘टेढा है पर मेरा है’. या व्हिडीओत धवनसोबत कर्णधार विराट कोहली आणि रनमशिन चेतेश्वर पुजारा हेदेखील आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कोलंबो कसोटीत भारताच्या सव्वा सहाशे धावांचा डोंगर श्रीलंकेला दोनदा फलंदाजी करुनही सर करता आळा नाही. रवींद्र जडेजाच्या फिरकीपुढे लंकेच्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले. या कसोटीत लंकेवर एक डाव आणि ५३ धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.