भारतातील फुटबॉलला नवसंजीवनी देणाऱ्या बहुचर्चित अशा इंडियन सुपर लीगचा सध्या जोरदार गाजावाजा सुरू आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर ही स्पर्धा आठ फ्रँचायझी शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, सलमान खान, जॉन अब्राहम आणि रणबीर कपूर यांसारखे क्रिकेटपटू आणि बॉलीवूड कलाकार सहमालक म्हणून फुटबॉलच्या मैदानात उतरल्यामुळे या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. मात्र इंग्लिश प्रीमिअर लीग आणि स्पॅनिश लीगचे अनुकरण असलेली आय-लीग ही देशातील अव्वल दर्जाची स्पर्धा आपले अस्तित्व जेमतेम टिकवून आहे. कोणतेही ग्लॅमर नसलेली आय-लीग ही स्पर्धा लोकप्रियतेच्या शिखरापासून शेकडो मैल दूर आहे. मात्र नव्याने उदयास आलेली इंडियन सुपर लीग (आयएसएल) ही स्पर्धा देशातील फुटबॉलच्या इतिहासात नवा अध्याय लिहेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ‘जो दिखता है, वो बिकता है’ असे मत भारतीय फुटबॉलमधील जाणकारांनी ‘चर्चेच्या मैदानातून’ या व्यासपीठाद्वारे व्यक्त केले.
चाहते पुन्हा स्टेडियमकडे वळतील, अशा कल्पक आणि प्रयोगशील स्वरूपाच्या स्पर्धेची भारतीय फुटबॉलला नितांत गरज होती. इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या निमित्ताने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रयत्न फळाला येत आहेत. सेलिब्रेटी, उद्योजक आणि महान खेळाडूंचा पाठिंबा असलेली इंडियन सुपर लीग ही स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल, अशी आशा आहे. देशातील अव्वल दर्जाची फुटबॉल स्पर्धा असलेल्या आय-लीगला म्हणावी तितकी लोकप्रियता मिळू शकली नाही, ही खेदजनक बाब आहे. त्यामुळेच आम्ही इंडियन सुपर लीगसारख्या स्पर्धेचा घाट घातला. या स्पर्धेमुळे फुटबॉलसाठी लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा सुधारणार आहेत. त्याचबरोबर युवा खेळाडूंनाही या स्पर्धेद्वारे योग्य व्यासपीठ मिळणार आहे. फुटबॉलमध्ये भवितव्य आहे, हे समजल्यानंतर अनेक तरुण या खेळाकडे वळतील. आयएसएल ही भारतीय फुटबॉलला नवसंजीवनी देणारी स्पर्धा ठरणार आहे.
कुशल दास, अ.भा.फुटबॉल महासंघाचे महासचिव
आय-लीग स्पर्धेला जाहिराती आणि लोकप्रियतेची कमतरता जाणवत होती, ती इंडियन सुपर लीग स्पर्धेद्वारे भरून निघणार आहे. बॉलीवूड अभिनेते, क्रिकेटपटू आणि व्यावसायिकांनी फुटबॉलच्या मैदानात उडी घेतल्यामुळे आता भारतीय फुटबॉलला ‘चार चाँद’ लागणार आहेत. आय-लीगमध्ये खेळणारे खेळाडू चांगले आहेत, याची माहिती कुणापर्यंतही पोहोचत नव्हती. आता आयएसएलच्या रूपाने भारतीय फुटबॉलला नवा चेहरा मिळणार आहे. आमच्या वेळी आम्हाला भारतातील मोजकेच खेळाडू माहीत असायचे. त्यांना बघूनच आम्ही फुटबॉलकडे वळलो. आता स्थानिक खेळाडूंनाही परदेशातील अव्वल प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचबरोबर त्यांना परदेशातील अव्वल खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे. पायाभूत सोयीसुविधा सुधारल्यानंतर अनेक मुले फुटबॉलकडे वळतील, अशी आशा आहे. माझ्या मते, भारतीय फुटबॉलच्या उभारीसाठी हीच योग्य वेळ आहे.
– संदेश झिंगन, मुंबई फुटबॉल क्लबचा बचावपटू
नावाजलेल्या मंडळींचा समावेश, मार्केटिंगचे नवे तंत्र आणि मनोरंजनाचा तडका देण्यात आल्यामुळे सध्या इंडियन सुपर लीगचा सध्या गाजावाजा होत आहे. आय-लीगमध्ये मोहन बागान, ईस्ट बंगाल यांसारखे अनेक दिग्गज संघ होते. पण त्यांची तितकी चर्चा होत नव्हती. हे सर्व फुटबॉलवरील प्रेमामुळे आपले अस्तित्व टिकवून आहेत. आय-लीगमध्ये मुंबईचे चार, गोव्याचे पाच, कोलकाताचे चार संघ आहेत. प्रत्येक संघाचे बजेट मर्यादित आहे. पण हे सर्व संघ एकत्र येऊन एकच संघ तयार केला तर अनेक बडे खेळाडू त्यांना विकत घेता येतील. साहजिकच भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावत जाईल. इंडियन सुपर लीगमध्ये तीन-चार जणांनी मिळून एक संघ विकत घेतला आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळणार आहे. तसेच तळागाळातील फुटबॉलच्या विकासालाही प्राधान्य दिले जाणार आहे. सर्व सामने प्राइम-टाइमला दाखवण्यात येणार असल्यामुळे हा खेळ भारतीय चाहत्यांमध्ये लोकप्रिय होण्यास मदत होणार आहे.
-हेन्री मेनेझेस, विफा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी