मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे लोकांनी घरबसल्या ऑनलाइन बुद्धिबळ खेळण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे बुद्धिबळात क्रांती घडली. या खेळाची लोकप्रियता वाढली. मात्र, ऑनलाइन बुद्धिबळाइतकेच खऱ्या पटावर (ऑफलाइन) खेळले जाणारे बुद्धिबळही गरजेचे आहे. दोन्हीचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी समतोल साधणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत विख्यात बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि प्रशिक्षक अभिजित कुंटेने व्यक्त केले.

‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या वेबसंवादात वरिष्ठ साहाय्यक संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत कुंटेने आपल्या बुद्धिबळातील प्रवासाबद्दल आणि बुद्धिबळात होणाऱ्या बदलांबद्दल दिलखुलास बातचीत केली. त्याच्या मार्गदर्शनात भारताने मागील काही काळात ‘फिडे’ ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये कांस्य, तर जागतिक महिला अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. या कामगिरीचे विश्लेषणही कुंटेने केले.

‘‘ऑनलाइन ऑलिम्पियाड स्पर्धेत विश्वनाथन आनंद भारतीय संघाचे नेतृत्व करत होता, तर मी उपकर्णधार आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेत कार्यरत होतो. या स्पर्धेत महिला आणि पुरुष खेळाडू एकत्र खेळले. आम्हाला साखळीत पहिल्यांदाच अव्वल स्थानी विराजमान होण्यात यश आले. उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकल्यावर उपांत्य फेरीत आमच्यापुढे अमेरिकेचे आव्हान होते. अमेरिका आणि भारताच्या प्रमाणवेळेत खूप फरक असल्याने आम्हाला रात्री उशिराने सामने खेळावे लागले. पाच मिनिटांच्या डावासाठी तुम्ही मानसिकदृष्टय़ा तत्पर असणे गरजेचे असते. वेळातील बदलाचा खेळाडूंवर परिणाम झाला. आम्ही अंतिम फेरी गाठू शकलो नाही याची खंत असली, तरी कांस्यपदक जिंकल्याचे समाधान आहे,’’ असे कुंटे म्हणाला.

‘‘ऑलिम्पियाडनंतर स्पेनमध्ये झालेल्या महिला अजिंक्यपद स्पर्धेतही आम्ही उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत निवडक १२ संघांनाच सहभाग देण्यात आला. लस समस्येमुळे हम्पीला खेळण्याची परवानगी मिळाली नाही आणि याचा संघाच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला. दुसऱ्या लढतीतील विजयानंतर आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आणि आम्ही चांगली कामगिरी सुरू ठेवत बाद फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत तानिया सचदेवकडून मोठी चूक झाली; पण आम्हाला उपांत्य फेरी गाठण्यात यश आले. या फेरीत तानियाच्या प्रतिस्पर्धीने सामना बरोबरीत ठेवण्याबाबत विचारले. मात्र, मी तानियाला खेळत राहण्यास सांगितले आणि तिने आपला खेळ उंचावत विजयाची नोंद केली,’’ असे कुंटेने सांगितले.

ऑनलाइन बुद्धिबळाचा कशा प्रकारे फायदा झाला आहे, असे विचारले असता कुंटेने म्हटले की, ‘‘ऑनलाइन आणि ऑफलाइन बुद्धिबळात बराच फरक आहे. टाळेबंदीच्या काळात सर्वच आघाडीचे खेळाडू ऑनलाइन पद्धतीने खेळत होते. त्यानंतर आम्ही जागतिक महिला अजिंक्यपद स्पर्धा खेळलो. ही स्पर्धा ऑफलाइन पद्धतीने झाली आणि आम्हाला पटावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत असल्याचे खेळाडूंनी मला सांगितले. मग सामन्यापूर्वी आम्हाला बुद्धिबळाचे पट आणून त्यावर सराव करावा लागला. ऑनलाइन आणि ऑफलाइन बुद्धिबळ या दोन्हींचे फायदे आणि तोटे आहेत. ऑनलाइन बुद्धिबळामुळे क्रांती घडली आहे, असे म्हणता येऊ शकते. करोना संपल्यावरही ऑनलाइन बुद्धिबळ सुरू राहील याची मला खात्री आहे. ऑफलाइन बुद्धिबळही मागे पडणार नाही. मात्र, दोन्हींचे महत्त्व टिकवण्यासाठी समतोल साधला पाहिजे. दोन्हीशी जुळवून घेणे गरजेचे आहे.’’

१९९८-२००४ मध्ये युरोपात राहायला न गेल्याचे शल्य

बुद्धिबळ कारकीर्दीदरम्यान मी १९९८ ते २००४ या कालावधीत युरोपात जाऊन राहिलो नाही याचे शल्य आहे. त्या काळी भारतात बुद्धिबळाच्या फारशा स्पर्धा आयोजित केल्या जात नव्हत्या. तसेच दर्जेदार प्रशिक्षकांची कमतरता होती. त्यामुळे युरोपात जाण्याचा निर्णय घेतला असता तर माझी कारकीर्द कदाचित अधिक बहरली असती. मात्र, त्या वेळी परदेशात जाणे तितके सोपे नव्हते. आर्थिक गणिते जुळवणे, विमान प्रवास आणि व्हिसा आदी गोष्टी सहजासहजी होत नव्हत्या. परंतु मी प्रयत्न करू शकलो असतो.

युवकांना मार्गदर्शन देताना प्रशिक्षणाची गोडी 

मला साधारण २०१२ ते २०१४ या कालावधीत अपेक्षित कामगिरी करता येत नव्हती. माझ्या गुणवारीत सुधारणा होत नव्हती. त्यातच त्या वेळी बरेच युवा बुद्धिबळपटू पुढे येत होते आणि ते मला प्रशिक्षण देण्याबाबत विचारणा करायचे. मात्र, पूर्ण वेळ प्रशिक्षक होणे मला शक्य नव्हते. मी त्या युवकांना काही प्रमाणात मार्गदर्शन करायचो. त्यांना शंका किंवा अडचणी असल्यास त्या दूर करण्याचा माझा प्रयत्न असायचा. त्यात काही प्रमाणात माझाही स्वार्थ होता. युवकांना नवे प्रयोग करण्यास आवडतात. त्यांची दीर्घ काळ खेळण्याची तयारी असते. त्यांच्यासोबत सराव केल्यास तुम्हालाही खूप शिकायला मिळते. मी मार्गदर्शन केलेल्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय मास्टर किंवा ग्रँडमास्टर किताब मिळवला.

विश्वनाथन आनंदचा दर्जा वेगळाच

आनंद १९८९ मध्ये एक स्पर्धा खेळण्यासाठी पुण्यात आला. त्या वेळी त्याला पराभूत करणे अशक्यच होते. त्यामुळे जो खेळाडू आनंदला जास्त वेळ रोखून धरेल, तो ही स्पर्धा जिंकला असे आम्ही समजायचो. त्याच्यासोबत तेव्हा माझा जवळचा संबंध आला नाही. मात्र, २००० नंतर आम्ही अनेकदा भेटलो आणि एकत्रित खेळलो. आनंदची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. तसेच प्रतिस्पर्धी कधी हल्ला करणार हे त्याला आधीच कळते. आनंदला कमी वयात परदेशात जाण्याची संधी मिळाली. त्याचा त्याला नक्कीच फायदा झाला. मात्र, त्याचा दर्जा वेगळाच आहे. तो १९९१ मध्ये वयाच्या २२व्या वर्षीच अव्वल पाच खेळाडूंमध्ये होता. त्याने हे स्थान २०१७ सालापर्यंत टिकवले. इतका दीर्घकाळ वर्चस्व गाजवणे सोपे नाही.

पुण्यात सुपर ग्रँडमास्टर दर्जाच्या स्पर्धा होऊ शकतात!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यासह भारतात सुपर ग्रँडमास्टर दर्जाच्या स्पर्धा होऊ शकतात. कोलकात्यात टाटा स्टील स्पर्धा सुरू झाली आहे. तसेच पुणे, दिल्ली किंवा हैदराबाद येथे अतिरिक्त दोन स्पर्धा घेण्यासाठी वाव आहे. एखादी स्पर्धा आयोजित करताना त्या शहरात बुद्धिबळाची संस्कृती आहे का, हे पाहणेही अत्यंत आवश्यक आहे. पुण्यामध्ये पाच ग्रँडमास्टर असून चार महिला ग्रँडमास्टर आहेत. त्यामुळे येथे चांगल्या दर्जाच्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्याचा नक्कीच विचार झाला पाहिजे. भविष्यात मीसुद्धा तसा प्रयत्न करेन.