दक्षिण आफ्रिकेने पराभूत केल्यामुळे भारतीय महिला संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारताच्या धडाकेबाज खेळाडू मिताली राज आणि झुलन गोस्वामीचं भारताला जेतेपद मिळवून देण्याचं स्वप्न अखेर अधुरं राहिलं आहे. एकीकडे भारताला पराभवाचा धक्का बसलेला असताना दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेमध्ये विजयाचे दिमाखदार सेलिब्रेशन केले जात आहे. त्यांच्या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आज दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात लढत झाली. मात्र या सामन्यात पराभव झाल्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्य फेरीत राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे गरजेचे होते. मात्र या सामन्यात पराभव झाल्यामुळे भारत विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलाय. भारताने प्रथम फलंदाजीला उतरत आफ्रिकेसमोर २७५ धावांचे लक्ष्य उभे केले होते. स्मृती मानधनाने दिमाखदार फलंदाजी करत ८४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७१ धावा केल्या. त्यानंतर मिताली राजनेही चांगला खेळ करत ८४ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या जोरावर ६८ धावा केल्या. तसेच शेफाली वर्मा (५३), हरमनप्रित कौर (४८) यांनी मोलाची कामगिरी करुन दक्षिण आफ्रिकेसमोर २७५ धावांचे आव्हान उभे केले.

तर दुसरीकडे २७५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या आफ्रिका संघाची सुरुवात थोडी खराब झाली. १४ धावांवर असताना आफ्रिकेने पहिला गडी गमावला. मात्र त्यानंतर लॉरा वोल्वार्ड (८०) आणि लारा गुडॉल (४९) यांनी संघाला सावरले. कर्णधार सुने लुस (२२), मिग्नॉन डू प्रिझ (५२), मारिझान कॅप (३२) यांनी आफ्रिकेचा विजय सुकर करण्यास मदत केली. शेवटी लढत अटीतटीची झाली. दक्षिण आफ्रिकेला दोन चेंडूंमध्ये तीन धावा करायच्या होत्या. मात्र दिप्ती शर्माने नो बॉल टाकल्यामुळे नंतरच्या दोन चेंडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेने दोन धावा केल्या आणि भारताचा पराभव झाला.

त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेमध्ये या विजयाचं ग्रँड सेलिब्रेशन होत आहे. एकीकडे पराभव झाल्यामुळे संपूर्ण भारत दु:ख व्यक्त करत असताना आता आफ्रिकेच्या महिला मात्र आनंद साजरा करत आहेत. या विजयासह आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies womens cricket team defeated india in icc womens world cup celebration video went viral prd
First published on: 27-03-2022 at 17:32 IST