India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ५ पैकी ४ सामने खेळले गेले आहेत. या मालिकेत इंग्लंडचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. इंग्लंडचा संघ पाचवा कसोटी सामना जिंकून कसोटी मालिका आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हा सामना केव्हा, कुठे आणि कधी खेळवला जाणार? जाणून घ्या.

अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफीतील निर्णायक कसोटी सामना गुरूवार,३१ जुलैपासून सुरू होणार आहे. हा सामना केनिंग्सटन ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही महत्वाचे बदल केले जाणार आहे. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज पदार्पणात फ्लॉप ठरला होता. त्यामुळे त्याला पाचव्या कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी आकाशदीपला अंतिम अकरात स्थान दिले जाऊ शकते. तर जसप्रीत बुमराह हा सामना खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.तो जर अंतिम अकरात नसेल, तर त्याच्या जागी अर्शदीप सिंग किंवा प्रसिध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते. तर दुखापतीमुळे पाचव्या कसोटीतून बाहेर पडलेल्या ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेलला संधी दिली जाऊ शकते.

या सामन्यासाठी असा असू शकतो भारताचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ:

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, आकाशदीप, अर्शदीप सिंग/प्रसिध कृष्णा.

अंतिम सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ:

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रुक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, जेमी ओव्हरटन, जोश टंग

केव्हा आणि कुठे पाहता येणार हा सामना?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्याला ३१ जुलैपासून सुरूवात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरु हईल. तर सामन्याचं नाणेफेक दुपारी ३ वाजता होईल. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. यासह जिओ हॉटस्टारवर देखील फुकटात लाईव्ह पाहू शकता.

हवामान कसं असेल?

अॅक्यूवेदरने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या सामन्यातील सुरुवातीचे २ दिवस पावसाची बॅटिंग पाहायला मिळू शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. ढगाळ वातावरणाचा वेगवान गोलंदाजांना चांगलाच फायदा होऊ शकतो. त्यामुळे कुठलाही संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणार नाही.