भारतीय संघाने अखेर ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी ओव्हलवर इंग्लडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूरसह (२/२२) अन्य गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला नमवले आहे. पण फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला आतापर्यंत या मालिकेत खेळण्याची एकही संधी मिळालेली नाही. अश्विन चारही कसोटींच्या प्लेइंग ईलेव्हनचा भाग नव्हता आणि यासाठी संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहलीवर बरीच टीका झाली आहे. ओव्हलवरील विजयानंतर इंग्लंडच्या एका माजी क्रिकेटपटूने मात्र याबाबत वेगळंच मत मांडलं आहे.

भारतीय संघाच्या विजयानंतर इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज ख्रिस ट्रेमलेटने ट्विटरवर संघात अश्विनची गरज नसल्याचे म्हटले आहे. “जर तुमच्याकडे जसप्रीत बुमराह असेल तर तुम्हाला अश्विनची काय गरज आहे,” असे ख्रिस ट्रेमलेटने म्हटले आहे. ट्रेमलेटच्या या ट्विटनंतर लोकांकडून त्याला ट्रोलही करण्यात येत आहे.

Ind vs Eng: प्लेईंग ११ मध्ये अश्विनला संधी का नाही? विराट कोहलीने दिले उत्तर

ट्रेमलेटच्या या ट्विटनंतर अश्विनच्या चाहत्यांनी त्याचा अपमान केल्याचे म्हटले आहे. ‘जर तुमच्याकडे बुमराह असेल तर कोणाला अश्विनची गरज आहे. किती महान गोलंदाज, भारताने चमकदार खेळ केला. अप्रतिम गोलंदाजी, असे ट्रेमलेटने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताने दिलेले ३६८ धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडचा दुसरा डाव २१० धावांत आटोपला. भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांनी विशेषत: बुमराहने सपाट खेळपट्टीवर ज्याप्रकारे कामगिरी केली, त्याने सर्वांची मन जिंकली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लंच ब्रेकनंतर बुमराहने आपल्या सहा षटकांच्या स्पेलमध्ये ओली पोप आणि जॉनी बेअरस्टोला बाद करत भारताचा विजय निश्चित केला होता. या मालिकेचा शेवटचा सामना पाचवी कसोटी १० सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे खेळवण्यात येईल.