Who is Frontrunner As India Test Captain After Rohit Sharma: भारतीय संघाचे नेतृत्त्व केलेल्या यशस्वी कर्णधारांपैकी एक राहिलेल्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितने ७ मे रोजी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. यानंतर भारताचा पुढचा कसोटी कर्णधार कोण असेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील भारताच्या निवड समितीला नवीन कसोटी चक्राचा विचार करताना दीर्घकालीन कर्णधार हवा आहे. फक्त इंग्लंड दौऱ्याचा विचार न करता दीर्घकाळासाठी कर्णधार निवडण्याच्या तयारीत निवड समिती आहे. पण यामध्ये ऋषभ पंत किंवा जसप्रीत बुमराह नाही तर युवा खेळाडू पुढे आहे.
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर, शुबमन गिल भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीचा युवा खेळाडूला तयार करण्याची गरज आहे.
निवड समितीच्या मते हा युवा खेळाडू म्हणजे शुबमन गिल आहे. २५ वर्षीय गिल हा कसोटी कर्णधार होण्यासाठी आदर्श उमेदवार आहे, असे त्यांचे मत आहे. औपचारिक घोषणा करण्यापूर्वी निवड समिती बीसीसीआयशी यावर चर्चा करेल. जर गिलला कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले तर त्याची पहिली कामगिरी इंग्लंडमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका असेल.
इंडियन एक्सप्रेसने यापूर्वी वृत्त दिले होते की भारताचा वेगवान गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराह जूनच्या अखेरीस सुरू होणाऱ्या इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यात कर्णधारपद भूषवण्याची शक्यता कमी आहे. या स्टार वेगवान गोलंदाजाने वर्षअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला एकमेव कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला होता. याशिवाय, त्याने इतर दोन कसोटी सामन्यांमध्येही नेतृत्व केले. परंतु बुमराह त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंडमध्ये पाचही कसोटी सामने खेळण्याची शक्यता कमी असल्याने निवडकर्त्यांना दुसरा पर्याय विचारात घ्यावा लागला.
निवडकर्त्यांना भावी कर्णधार म्हणून युवा खेळाडूला तयार करायचं आहे. अशा परिस्थितीत, नवीन कसोटी चक्रासह, निवड समिती भारतीय संघाकरता दीर्घकालीन कर्णधाराचा पर्याय शोधत आहे, त्यांच्यामते गिल या श्रेणीत बसतो. बुमराहनंतर पंतचं नाव पुढे होतं, पण त्याचा फॉर्म पाहता निवड समितीने दुसरा पर्याय निवडण्याचा विचार केला. भारताची इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे, तर पाचवी आणि शेवटची कसोटी ३१ जुलैपासून सुरू होणार आहे.