India-England Both Teams Wearing Black Armbands: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून आजपासून इंग्लंडविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. आज म्हणजेच २० जूनला पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली असून इंग्लंडने सामन्याची नाणेफेक जिंकली आहे. यासह इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. पण या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत. यामागचं नेमकं कारण जाणून घेऊया.
इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्याची नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने सामन्याच्या एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली होती. तर नाणेफेकीनंतर भारताचा नवा कर्णधार शुबमन गिलने भारताची प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. भारताकडून पहिल्याच कसोटी सामन्यात साई सुदर्शनने पदार्पण केले आहे. तर भारताचा त्रिशतकवीर करूण नायरचं टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झालं आहे. तर वेगवान गोलंदाजीत बुमराह, प्रसिद्ध, सिराज आणि शार्दुल ठाकूर दिसणार आहेत.
सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरले. आजपासून कसोटी मालिकेला सुरूवात होत असल्याने दोन्ही संघाचे खेळाडू सामन्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी मैदानावर पोहोचले. राष्ट्रगीतापूर्वी मैदानावर सर्वांनी भारतात झालेल्या दुर्दुेवी विमान अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना श्रध्दांजली वाहिली. यानंतर दोन्ही संघांचे राष्ट्रगीत होत सामन्याला सुरूवात झाली.
भारतात १२ जून रोजी अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद येथेच उड्डाणानंतर भीषण अपघात झाला आणि एक प्रवासी वगळता २४१ प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झाला. एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी दोन्ही संघ आज हातावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरले आहेत. इंग्लंड क्रिकेटनेही पोस्ट शेअर करत या अपघाताबाबत दु:ख व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे.
भारत वि. इंग्लंड पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
इंग्लंड
झॅक क्राऊली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर
भारत
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा