Jasprit Bumrah: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा थरार ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण इंग्लंडचा संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघाला जर ही मालिका बरोबरीत समाप्त करायची असेल, तर मालिकेतील शेवटचा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. पण या सामन्याआधी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सामना खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला हा सामना खेळण्यासाठी अनुमती दिली नसल्याचं म्हटलं जात आहे.
ज्यावेळी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली त्यावेळी बुमराह ५ पैकी केवळ ३ कसोटी सामने खेळणार अशी माहिती देण्यात आली होती. ते ३ सामने कोणते असणार हे परिस्थिती पाहून ठरवण्यात येईल, हे देखील आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याचा वर्कलोड मॅनेज करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे या मालिकेतील ३ सामने खेळून झाले आहेत. मग आता बुमराह शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ईएसपीक्रीकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, बुमराह ओव्हल कसोटीत खेळताना दिसणार नाही. बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे गेले काही महिने संघाबाहेर होता. त्यामुळे ही दुखापत पुन्हा होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे तो ओव्हल कसोटी खेळताना दिसून येणार नाही.
बुमराह केवळ ३ सामने खेळणार
भारताचा इंग्लंड दौरा हा ५ कसोटी सामन्यांचा आहे. पण तो केवळ ३ कसोटी सामने खेळणार हे आधीच ठरलं होतं. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने याबाबत माहिती दिली होती. बुमराह मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात जसप्रीत बुमराह होता, हा सामना देखील भारतीय संघाला गमवावा लागला होता. त्यानंतर चौथ्या कसोटीतही बुमराह खेळण्यासाठी मैदानात उतरला. हा सामना भारतीय संघाने गमावला. त्यामुळे ठरल्याप्रमाणे बुमराहचे ३ सामने खेळून झाले आहेत. आता पाचव्या कसोटीत त्याच्याजागी आकाशदीपला संधी दिली जाऊ शकते.
भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा सामना
मालिकेतील शेवटचा सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.कारण भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर आहे. मालिका बरोबरीत आणायची असेल, तर शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. कारण हा सामना गमावला किंवा ड्रॉ केला, तर इंग्लंडचा संघ मालिकेवर कब्जा करेल. त्यामुळे भारतीय संघाला पूर्ण जोर लावावा लागणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.