Ajit Agarkar Statement on Why Rohit Sharma Removed as ODI Captain: ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेसाठी संघ जाहीर करताना भारतीय संघाच्या निवड समितीने मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या जागी आता शुबमन गिल वनडे संघाचं नेतृत्त्व करताना दिसेल. विराट कोहली आणि रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेसाठी संघात संधी मिळाली आहे. पण नेतृत्त्व मात्र गिलकडे असेल. पण रोहित शर्माकडून वनडेच्या कर्णधारपदाची जबाबदारी का काढून घेतली, यावर अजित आगरकरांनी उत्तर दिलं आहे.

अवघ्या आठ महिन्यांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकूनही, ३८ वर्षीय रोहित शर्माला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आणि ही जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली. रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर गिलने कसोटी संघाचं नेतृत्व स्वीकारलं होतंच, त्यामुळे वनडे संघाची कर्णधारपदाची सूत्रं त्याच्याकडे येणं ही स्वाभाविक गोष्ट होती.

BCCI मधील वरिष्ठांची नेहमीच सर्व फॉरमॅटसाठी एकच कर्णधार असावा, अशी भूमिका राहिली आहे. शुबमन गिल अल्पावधीतच भारतीय क्रिकेटचा नवा पोस्टर बॉय म्हणून समोर आला, त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापनाने २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने बदलाची हीच वेळ योग्य असल्याचे मानत हा निर्णय घेतला आहे.

आगरकर, मुख्य प्रशिक्षक गंभीर आणि बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी हा निर्णय एकत्रितपणे घेतला. अहमदाबादमधील पत्रकार परिषदेत आगरकर यांनी सांगितलं की, रोहित शर्माला या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांनी विराट आणि रोहितच्या भविष्याबाबत मौन बाळगलं आणि २०२७ च्या विश्वचषकात हे दोघे खेळतील का या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

रोहित शर्माला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यामागचं काय आहे कारण?

अजित आगरकर नेतृत्त्व बदलाबाबत बोलताना म्हणाले, “खरं सांगायचं तर काही गोष्टी अगदी स्पष्ट आहेत, तीनही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार ठेवणं प्रत्यक्षात जवळपास अशक्य आहे, कारण नियोजनाच्या दृष्टीने ते खूप गुंतागुंतीचं होतं. एका टप्प्यावर पुढच्या विश्वचषकाच्या दृष्टीने विचार करायला सुरुवात करावीच लागते. तसेच, वनडे फॉरमॅट आता सर्वात कमी खेळला जाणारा फॉरमॅट झाला आहे, त्यामुळे पुढच्या कर्णधाराला किंवा जर एखाद्या नवीन खेळाडूची निवड करायची असेल तर त्याला पुरेसा वेळ देण्यासाठी फार सामने मिळत नाहीत.”

रोहितबद्दल आगरकर पुढे म्हणाले, “जरी त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसती, तरीसुद्धा हा निर्णय (कर्णधार बदलण्याचा) कठीणच झाला असता, कारण रोहितने भारतासाठी जे काही केलं आहे, ते कमाल आहे. पण कधी कधी तुम्हाला पुढचा विचार करावा लागतो. संघाची सद्यस्थिती आणि पुढे संघाच्या हितासाठी सर्वोत्तम काय आहे, याचा विचार करावा लागतो. मग तो विचार आता करणं असो किंवा सहा महिन्यांनी, असे निर्णय घ्यावेच लागतात. मी आधीच म्हटलं आहे की, सध्या वनडे क्रिकेटबाबत निर्णय घेणं खरंच अवघड आहे.”

“कारण जर असा मोठा निर्णय घ्यायचाच असेल, तर तो शक्य तितक्या लवकर घ्यावा लागतो, म्हणजे नव्या कर्णधाराला दुसऱ्या फॉरमॅटमध्ये नेतृत्व करण्याचा आत्मविश्वास मिळण्यासाठी पुरेसा वेळ देता येईल, हाच या निर्णयामागचा हेतू होता. पण हा निर्णय घेणं नेहमीच कठीण असतं, विशेषतः अशा खेळाडूच्या जागी निर्णय घेणं जो संघासाठी इतका यशस्वी ठरलेला असतो”, असं पुढे अजित आगरकरांनी सांगितलं.