Virat Kohli Test Retirement Reason: भारतीय क्रिकेटमध्ये येत्या काही दिवसांत मोठे बदल होणार आहेत. भारतीय संघातील स्टार फलंदाज रोहित शर्माने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. रोहितने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधूनन निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, बीसीसीआयने त्याला फेरविचार करण्यासाठी सांगितलं आहे.
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार,विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्याने बीसीसीआयला कल्पना दिली आहे. मात्र, आगामी इंग्लंड दौरा पाहता बीसीसीआयने त्याला फेरविचार करण्यासाठी सांगितलं आहे. त्यामुळे आता विराट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सध्या भारतात आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. मात्र, भारत- पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाची स्थिती पाहता ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. विराटने या हंगामातील ११ सामन्यांमध्ये ५०५ धावा केल्या आहेत.
आयपीएलआधी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही विराटने धावा केल्या. यावरून हे स्पष्ट होतंय की, विराट कोहली फॉर्ममध्ये आहे. मग फॉर्ममध्ये असताना विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय का घेतला? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
विराटला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घ्यायची आहे?
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर आता शुबमन गिलकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. बीसीसीआयने आता माघार न घेता पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयने यावर विचार केला नव्हता. कारण बीसीसीआयला पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा पाहता पूर्णवेळ कर्णधार हवा होता.
इंग्लंडचा दौरा हा भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे विराट कोहलीसारखा अनुभवी खेळाडू संघात असणं अतिशय गरजेचं आहे. संघात केएल राहुल, ऋषभ पंत, शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वालसारखे खेळाडू आहेत ज्यांना इंग्लंडमध्ये फारसा खेळण्याचा अनुभव नाही. तर दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की, पुढील महत्वाच्या स्पर्धा आणि मालिका पाहता गौतम गंभीरला युवा खेळाडूंचा संघ हवा आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीची बॅट शांत राहिली होती. त्याला ५ सामन्यांमध्ये अवघ्या १९० धावा करता आल्या होत्या. यादरम्यान पहिल्यात सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. उर्वरीत सामन्यांमध्ये मिळून त्याला अवघ्या ९० धावा करता आल्या होत्या. ही सुमार कामगिरी पाहता त्याने तेव्हाच निवृत्तीचा निर्णय घेतला होता, असंही म्हटलं जात आहे. आता विराट आपला निर्णय मागे घेणार का? बीसीसीआय त्याला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.