दोन वर्षांपूर्वी अखेरच्या दिवशी जेतेपदासाठी रंगलेले थरारनाटय़ टाळण्याचा मँचेस्टर सिटीचा प्रयत्न असेल. रविवारी वेस्ट हॅम युनायटेडविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतपद पटकावण्यासाठी मँचेस्टर सिटी उत्सुक आहे.
दोन वर्षांपूर्वी मँचेस्टर युनायटेडच्या निकालाशी बरोबरी साधण्यासाठी मँचेस्टर सिटीला एका गोलची गरज होती. क्वीन्स पार्क रेंजर्सविरुद्ध शेवटच्या क्षणी अतिरिक्त वेळेत सर्जीओ अ‍ॅग्युरोने केलेल्या गोलमुळे मँचेस्टर सिटीने जेतेपदावर नाव कोरले होते. या वेळेला मात्र मँचेस्टर सिटी दुसऱ्या क्रमांकावरील लिव्हरपूलपेक्षा दोन गुणांनी पुढे आहे. वेस्ट हॅमविरुद्ध मँचेस्टर सिटीने बरोबरी पत्करली तरी गोलफरकाच्या आधारावर ते जेतेपद जिंकू शकतात.
घरच्या मैदानावर चेल्सीकडून २-०ने पराभूत आणि ३-० असे आघाडीवर असतानाही क्रीस्टल पॅलेसविरुद्ध ३-३ अशी बरोबरी पत्करल्यामुळे लिव्हरपूलचे जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान जवळपास संपुष्टात आले. जर लिव्हरपूलने न्यू कॅसल युनायटेडवर विजय मिळवला आणि वेस्ट हॅम युनायटेडने मँचेस्टर सिटीला पराभवाचा धक्का दिला तर १९९०नंतर प्रथमच लिव्हरपूल जेतेपदावर मोहोर उमटवेल.