विम्बल्डन : तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव, ब्रिटनच्या कॅमेरून नॉरी, अमेरिकचा फ्रान्सिस टियाफो व बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव्ह यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत आपापल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात विजय मिळवत आगेकूच केली. महिला एकेरीत अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑनटेकने सहज विजय नोंदवला. युक्रेनच्या मार्टा कोस्त्युकने ग्रीसच्या आठव्या मानांकित मारिया सक्कारीला नमवत धक्कादायक निकालाची नोंद केली. गटातील अन्य सामन्यात दारिया कसात्किनाने विजय नोंदवत तिसरी फेरी गाठली. तर, अमेरिकेची स्लोन स्टीफन्स व इस्टोनियाच्या अॅना कोंटावेइटने आपापले सामने जिंकले.
जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या मेदवेदेवने ब्रिटनच्या आर्थर फेरीवर ७-५, ६-४, ६-३ असा विजय नोंदवला. सामन्यातील पहिल्या सेटमध्ये मेदवेदेवला आर्थरने आव्हान दिले. मात्र, सेट जिंकत त्याने चांगली सुरुवात केली. आपली हीच लय पुढच्या दोन सेटमध्ये कायम राखताना विजय निश्चित केला. दहाव्या मानांकित टियाफोने चीनच्या वू यिबिंगला ७-६ (७-४), ६-३, ६-४ असे नमवले. अन्य सामन्यात, १२व्या मानांकित नॉरीला विजय मिळवण्यासाठी काहीसा संघर्ष करावा लागला. त्याने चेक प्रजासत्ताकच्या टॉमस मचाकला ६-३, ४-६, ६-१, ६-४ असे नमवले. अन्य सामन्यात, २१व्या मानांकित दिमित्रोव्हने जपानच्या शो शिमाबुकुरोला ६-१, ६-२, ६-१ असे पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या दिमित्रोव्हने जपानच्या खेळाडूला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.
श्वीऑनटेकने स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोला ६-२, ६-० असे नमवत आपली आगेकूच कायम राखली. कोस्त्युकने पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर सक्कारीला ०-६, ७-५, ६-२ असे पराभूत केले. तर, ११व्या मानांकित दारिया कसात्किनाने ब्रिटनच्या जोडी अॅना बुरेजला ६-०, ६-२ असे सहज नमवले. अन्य सामन्यात, स्टीफन्सने स्वीडनच्या रेबेका पीटरसनवर ६-२, ६-३ असा विजय नोंदवत आगेकूच केली. तर, कोंटावेइटने इटलीच्या लुक्रेझिया स्टेफानिनीवर ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये विजय साकारला. सर्बियाच्या डोना व्हेकिचने चीनच्या झँग शुआइला ६-२, ६-३ असे पराभूत केले.