लंडन : विम्बल्डनच्या हिरवळीवर प्रतिस्पर्धी खेळाडूस एकही गेम जिंकू न देता विजेतेपद मिळविणारी पोलंडची इगा श्वीऑटेक शनिवारी पहिली टेनिसपटू ठरली. या लौकिकाबरोबर श्वीआटेकने कौतुक आणि बरेच काही मिळविले. श्वीऑटेकने या विजेतेपदाने काय काय कमावले हे पाहणेसुद्धा तिच्या एकतर्फी विजयाइतके मनोरंजक आहे.
विम्बल्डन स्पर्धेत सातत्याने पारितोषिक रकमेत वाढ केली जात आहे. या वेळी पुरुष, महिला आणि अन्य स्पर्धा गट मिळून स्पर्धेत एकत्रित ५२ दशलक्ष डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत साधारण चारशे पन्नास कोटी (४,५०,६९,४४, ७६० रुपये) रुपयाची रोख पारितोषिके देण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून पुरुष महिला विजेत्या-उपविजेत्यांना समान रकमेचे पारितोषिक दिले जाते. या वर्षीच्या पारितोषिक स्वरुपात विजेत्या इगा श्वीऑटेकला ४० लाख डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत तब्बल ३४ कोटी (३४,८२,१०, ०००) रुपयाचे घसघशीत पारितोषिक मिळाले. उपविजेती अमांडा अॅनिसिमोवा १७ कोटी रुपयांच्या पारितोषिकाची मानकरी ठरली. याचबरोबर स्पर्धा संयोजकांच्या वतीने श्वीऑटेकला एक आठवण म्हणून ‘प्रॉपर्टी ऑफ इगा श्वीऑटेक, विम्बल्डन विजेती’ असे लिहिलेला एक खास टॉवेल भेट म्हणून दिला.
श्वीऑटेकला अशा पद्धतीचा टॉवेल देण्यामागे एक गमतीशीर प्रसंग आहे. स्पर्धेदरम्यान श्वीऑटेक अनेकदा सामना झाल्यावर अधिकृत टॉवेल आपल्या बॅगमध्ये भरताना कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यामुळे तिला गमतीने ‘टॉवेल चोर’ असे संबोधले जात होते. त्यामुळेच संयोजकांनी तिला स्पर्धेचा निरोप घेताना ‘प्रॉपर्टी ऑफ इगा श्वीऑटेक’ असे लिहिलेला एक टॉवेल भेट दिला. श्वीऑटेकनेही हसत हसत या भेटीचा स्वीकार केला आणि इन्स्टाग्रामवरून टॉवेलसहचे छायाचित्रही प्रसिद्ध केले.