आशिया चषकाची चर्चा संपण्याआधीच वूमन्स वर्ल्डकपची नांदी होत आहे. गुवाहाटीत यजमान आणि भारत आणि श्रीलंका यांच्यात सलामीचा मुकाबला होणार आहे. यजमान भारतीय संघ पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी आतूर आहे.

भारत यजमान मग काही सामने श्रीलंकेत का?

या वर्ल्डकपचं यजमानपद भारताला मिळालं. मात्र तटस्थ सामन्यांचं ठिकाण म्हणून श्रीलंकेतील कोलंबोची निवड करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुरावलेल्या संबंधांमुळे दोन्ही संघ एकमेकांकडे जाऊन खेळत नाही. भारतीय संघ पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात येत नाही. आयसीसीने यावर तोडगा काढला. १३ वर्षात दोन्ही संघांदरम्यान द्विराष्ट्रीय मालिका झालेली नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संघर्ष पराकोटीला पोहोचला होता. वर्ल्डकपमध्ये भारत- पाकिस्तान सामना ५ ऑक्टोबरला कोलंबो इथे होणार आहे.

गुवाहाटी हे सेमीफायनलचं ठिकाण आहे मात्र पाकिस्तानने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला तर हा सामना कोलंबोत खेळवण्यात येईल. नवी मुंबईत दुसरी सेमी फायनल होणार आहे. भारतीय संघ हा सामना खेळण्याची शक्यता आहे. वर्ल्डकपची फायनल नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. मात्र पाकिस्तानने अंतिम लढतीत प्रवेश केल्यास फायनलही कोलंबो इथे खेळवण्यात येईल.

भारतीय संघाचे सामने

३० सप्टेंबर- श्रीलंका
५ ऑक्टोबर- पाकिस्तान
९ ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका
१२ ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया
१९ ऑक्टोबर- इंग्लंड
२३ ऑक्टोबर- न्यूझीलंड
२६ ऑक्टोबर- बांगलादेश

वर्ल्डकपचे सामने कुठे होणार आहेत?

भारतात चार ठिकाणी वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. पाकिस्तानचे सामने तटस्थ म्हणजेच श्रीलंकेतील कोलंबो इथे होतील.
डीवाय पाटील स्टेडियम, नेरूळ, नवी मुंबई<br>बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी
होळकर स्टेडियम, इंदूर
डॉ. राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
आर.प्रेमदास स्टेडियम, कोलंबो

वर्ल्डकपमध्ये किती संघ आहेत आणि ते कसे पात्र झाले?

ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका.
भारतीय संघ यजमान या नात्याने स्पर्धेसाठी पात्र ठरला. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ आयसीसी वूमन्स चॅम्पियनशिपच्या माध्यमातून पात्र ठरले. बांगलादेश आणि पाकिस्ता यांनी वर्ल्डकप पात्रता फेरीत पहिलं आणि दुसरं स्थान मिळवत वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला.

भारत-पाकिस्तान सामना कधी आहे?

पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्ता ५ ऑक्टोबरला आमनेसामने येत आहेत. कोलंबोतल्या आर.प्रेमदासा स्टेडियमवर हा मुकाबला होणार आहे. पुरुषांच्या आशिया चषकात भारत-पाकिस्तान संघ तीनवेळा एकमेकांविरुद्ध खेळले. तिन्ही लढतीत भारतीय संघाने विजय मिळवला. भारताने पाकिस्तानविरुद्धच्या ११ वनडेत विजय मिळवला आहे.

स्पर्धेचं स्वरुप कसं आहे?

वर्ल्डकप राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीतील अव्वल चार संघ सेमीफायनलमध्ये आगेकूच करतील. २९ आणि ३० ऑक्टोबरला सेमी फायनलच्या लढती होणार आहेत. २ नोव्हेंबरला फायनल होणार आहे.

कोणते संघ जेतेपदाचे दावेदार?

महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाचा नेहमीच दबदबा असतो. ऑस्ट्रेलियाच्या नावावर वनडे वर्ल्डकपची ७ जेतेपदं आहेत. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर सातत्याने दमदार कामगिरी करणारा संघ अशी ऑस्ट्रेलियाची ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ अशी सरशी साधली होती. अॅलिसा हिलीच्या संघाचा आणखी एका जेतेपदावर नाव कोरण्याचा प्रयत्न असेल.

भारतीय संघ २०१७ वर्ल्डकपमध्ये जेतेपदाच्या अगदी समीप पोहोचला होता. इंग्लंडने त्यावेळी बाजी मारली होती. त्या घटनेतून बोध घेत भारतीय संघाने चांगला खेळ केला आहे. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मन्धाना यांच्या रुपात भारताकडे दमदार बॅट्समन आहेत. रेणुका सिंग आणि दिप्ती शर्मा बॉलिंगची आघाडी समर्थपणे हाताळतात. फिल्डिंगमध्येही भारतीय संघाने अमूलाग्र सुधारणा केली आहे. घरच्या मैदानावर, चाहत्यांच्या प्रतिसादात जेतेपदावर नाव उमटवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे.

सामने कुठे पाहता येणार?

वूमन्स वर्ल्डकपचे सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर पाहता येतील. डीडी स्पोर्ट्सवर वर्ल्डकपचे सामने निशुल्क पाहता येतील. सोनी लिव्ह अॅपवरही सामने पाहता येतील.

तिकीटं कुठे मिळणार?

प्राथमिक फेरीच्या सामन्यांची तिकीटं आयसीसीने जारी केलेल्या वेबसाईटवर मिळतील.

प्राईजमनी किती आहे?

वूमन्स वनडे वर्ल्डकपच्या बक्षीस रकमेत आयसीसीने घसघशीत वाढ केली. २०२३ मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपवेळी पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. कमिन्सच्या संघाने जेतेपदावर नाव कोरत जेवढी कमाई केली त्यापेक्षा जास्त रक्कम महिला वनडे वर्ल्डकपविजेत्या संघाला मिळणार आहे.

२०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या तुलनेत २९७ टक्क्यांनी बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे. भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी १३.८८ मिलिअन डॉलर्स इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेवेळी बक्षीस रक्कम अवघी ३.५ मिलिअन डॉलर एवढीच होती.

२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नवी मुंबई किंवा कोलंबो इथे होणाऱ्या अंतिम लढतीच्या विजेत्या संघाला ४.४८ मिलिअन डॉलर्स बक्षीस रकमेने गौरवण्यात येणार आहे. 

आधीचे विजेते कोण आहेत?

१९७३- इंग्लंड
१९७८-ऑस्ट्रेलिया
१९८२-ऑस्ट्रेलिया
१९८८-ऑस्ट्रेलिया
१९९३- इंग्लंड
१९९७-ऑस्ट्रेलिया
२०००- न्यूझीलंड
२००५- ऑस्ट्रेलिया
२००९- इंग्लंड
२०१३- ऑस्ट्रेलिया
२०१७- इंग्लंड
२०२२- ऑस्ट्रेलिया