वर्कलोड मॅनेजमेंट यावर सातत्याने चर्चा होते. पण याबाबतीत आम्हाला अनेकदा गृहित धरलं जातं आणि याचं व्यवस्थापन नीट केलं जात नाही असं मत अष्टपैलू शार्दूल ठाकूरने व्यक्त केलं. वर्कलोड सांभाळत सर्वोत्तम कामगिरी करणं हे आव्हानात्मक आहे याकडे त्याने लक्ष वेधलं. दुलीप ट्रॉफीत पश्चिम विभागाचं नेतृत्व करणाऱ्या शार्दूलने परखडपणे आपली मतं मांडली.

‘कोणी येऊन विचारत नाही की तुमचं शरीर कसं आहे, तुम्हाला काय होतंय. पण मी फिजिओ, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच यांच्या मदतीने फिट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. क्रिकेट खेळता येणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सातत्याने माघार घेऊ शकत नाही. पण जर योग्य वेळी विश्रांती मिळाली तर शरीर ताजंतवानं राहतं’, असं क्रिकइन्फो संकेतस्थळाशी बोलताना शार्दूल म्हणाला.

शार्दूल गेली ११ महिने सलग खेळतो आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तो इराणी चषक स्पर्धेत खेळला. त्यानंतर रणजी स्पर्धेत मुंबईचा अविभाज्य घटक होता. त्यानंतर विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळला. आयपीएल लिलावात अनसोल्ड गेल्याने शार्दूलला दोन महिने विश्रांती मिळेल अशी चिन्हं होती पण लखनौ सुपर जायंट्स संघाच्या गोलंदाजांना दुखापतींचा विळखा पडल्याने त्यांनी शार्दूलला समाविष्ट केलं. यंदाच्या आयपीएलमध्ये शार्दूल एका नव्या संघाकडून खेळला. त्यानंतर भारतीय अ संघाकडून इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध खेळला. यानंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. शार्दूल या संघाचा भाग होता.

‘खेळाडूंना टेस्ट, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात खेळायचं असतं. याव्यतिरिक्त दोन महिने आयपीएलमध्ये खेळायचं असतं. याव्यतिरिक्त रणजी करंडक, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली स्पर्धा अशा डोमेस्टिक क्रिकेटमधील स्पर्धांमध्ये खेळायचं असतं. सगळीकडे खेळायचं तर दुखापतविरहित राहणं गरजेचं आहे. मात्र वेगवान गोलंदाजांना दुखापतींची भीती असते. यासाठीच वेगवान गोलंदाजांना नियमित विश्रांती दिली जाते. ते सगळे सामने खेळत नाहीत. जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या दौऱ्यात ५ पैकी तीनच सामने खेळला. वर्कलोड कसा हाताळायचा हे गोलंदाजांनी ठरवायला हवं. पण सामन्यादरम्यान हा मुद्दा डोक्यात नसावा’, असं शार्दूलला वाटतं.

तो पुढे म्हणाला, ‘खेळायला उतरल्यावर या गोष्टी मनात असता कामा नयेत. सगळं लक्ष सामन्यावरच हवं तरच सर्वोत्तम कामगिरी करता येईल. दोन सामन्यांनंतर विश्रांती मिळते तेव्हा शरीराकडे लक्ष द्यावं. जर सामन्यात तुम्हाला फार गोलंदाजी करावी लागली नसेल तर तुम्ही नेट्समध्ये मेहनत करू शकता. पण सामन्यात खूप गोलंदाजी करावी लागली असेल तर तर नेट्समध्ये थोडी विश्रांती घेऊ शकता’.

मुंबईचं नेतृत्व करण्यास तय्यार

अनुभवी अजिंक्य रहाणेने मुंबईचं नेतृ्त्त्व सोडल्यामुळे कर्णधारपद रितं आहे. शार्दूलने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पश्चिम विभागाचं नेतृत्व केलं. मुंबईचं नेतृत्व करण्यास तयार आहेस का असं विचारलं असता शार्दूल म्हणाला, ‘हो. कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यास त्याला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. दुलीप ट्रॉफीच्या निमित्ताने मला पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. मी अनेक गोष्टी शिकलो. कर्णधार म्हणून अनेक जबाबदाऱ्या असतात, त्या समजल्या’.

गोलंदाजांनाही साहाय्य करणाऱ्या खेळपट्ट्या हव्यात

१५ ऑक्टोबरपासून रणजी हंगाम सुरू होत आहे. खेळपट्ट्या सर्वसमावेशक असाव्यात असं आग्रही मत शार्दूलने मांडलं. गोलंदाजांना त्यांचं कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळावी. दुलीप ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये शार्दूलने १६४ पैकी केवळ ११ षटकं टाकली. अर्झान नागसवालाने १४.३ तर तुषार देशपांडेने १७ षटकं टाकली. बाकी १२२ षटकं फिरकी गोलंदाजांनीच टाकली. ‘खेळपट्टी फिरकीपटूंसाठीच होती त्यामुळे त्यांना गोलंदाजी मिळणं साहजिक होतं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हा मुद्दा नेहमीच चर्चेत येतो. ४० षटकं टाकून संघाच्या विजयात योगदान देऊ शकू अशा खेळपट्ट्या हव्यात. फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही समान संधी हवी’, असं शार्दूलने सांगितलं.