World Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने २१-१९, २१-१० असे पराभूत केले. मरीनने उपांत्य फेरीत भारताच्याच सायना नेहवाल हिला पराभूत केले होते. त्यामुळे स्पेनची मरीन भारताला तिखट असल्याचेच दिसून आले. पहिल्या गेममध्ये विजयासाठी मरीनला सिंधूने चांगलेच झुंजवले. सिंधूने सुरुवातीला ६-४ अशी आघाडी घेतली होती. पण नंतर गेम अत्यंत अटीतटीचा झाला. मरीनने आपला झुंजार खेळ दाखवत पहिला गेम २१-१९ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधू सपशेल अपयशी ठरली. तिने तो गेम तब्बल ११ गुणांच्या फरकाने गमावला. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

तत्पूर्वी, उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा सिंधूने २१-१६, २४-२२ असा पराभव केला. सामन्यातील पहिला गेम संघर्षपूर्ण झाला, पण तो सिंधूने २१-१६ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये यामागुची हिने १९-१२ अशी आघाडी घेतली होती. पण नंतर सिंधूने धमाकेदार कमबॅक करत २०-२० अशी बरोबरी साधली. सामना अत्यंत रंगतदार झाला. अखेर सिंधूने २४-२२ असा गेम जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने जपानच्या नोझुमी ओकुहारा हिचा २१-१७, २१-१९ असा पराभव केला होता. या विजयाबरोबरच ओकुहाराने मागील स्पर्धेत तिच्या केलेल्या पराभवाचा वचपा काढला. थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१५, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा सिंधूने काढला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.