खेळाचा व्यावसायिक चेहरामोहरा बदलण्याची क्षमता लीग या सूत्रात आहे, याची प्रचीती आता जागतिक क्रीडा क्षेत्राला आली आहे. त्यामुळे अनेक खेळांच्या अनेक लीग लोकप्रिय झाल्या आहेत. शरीरसौष्ठव खेळातसुद्धा लवकरच एक जागतिक स्तरावरील व्यावसायिक लीग होणार असल्याचे संकेत जागतिक आणि आशियाई शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस दतूक पॉल चुआ यांनी दिले आहेत.
‘‘शरीरसौष्ठवमध्ये जागतिक स्तरावरील लीगसाठी आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. त्या दिशेने आमची टप्प्याटप्प्याने वाटचाल सुरू आहे. पुरस्कर्त्यांची योग्य साथ मिळाली, तर ही स्पर्धा अत्यंत यशस्वी होऊ शकेल. मात्र याकरिता मोठय़ा आर्थिक गुंतवणुकीचीही आवश्यकता आहे,’’ असे चुआ यांनी सांगितले.
शरीरसौष्ठव खेळाला आणखी विकसित करण्यासाठी कोणती पावले संघटनेकडून उचलण्यात येणार आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना चुआ म्हणाले, ‘‘जागतिक शरीरसौष्ठव संघटनेला खेळातील अर्थकारण सुधारायचे आहे. त्यामुळे व्यावसायिक दर्जाच्या अधिकाधिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. जागतिक स्तरावर फुटबॉल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटने चाहत्यांना आकर्षित करून खेळ लोकप्रिय कसा करायचा, याचा वस्तुपाठच दिला आहे. खेळाचा आलेख जागतिकदृष्टय़ा उंचावणे, हे प्रमुख लक्ष्य आहे. या स्पध्रेदरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हाच आराखडा निश्चित करण्यात आला.’’
उत्तेजक पदार्थाच्या सेवनामुळे खेळाला काळिमा फासला जातो, या आव्हानाविषयी चुआ म्हणाले, ‘‘उत्तेजकांची कीड फक्त शरीरसौष्ठवला नव्हे, तर सर्वच खेळांना लागली आहे. उत्तेजकांमुळे रशियाची क्रीडा क्षेत्रातील प्रतिमा कशी डागाळली गेली, हे सर्वानाच ज्ञात आहे. उत्तेजक पदार्थापासून खेळाडूंना दूर ठेवण्यासाठी योग्य प्रकारचे जाणीव-जागृती शिक्षण खेळाडूंना देणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच देशांमध्ये खेळाडूंसाठी असे उपक्रम राबवले जातात, त्याचे चांगले परिणामसुद्धा दिसून येतात. प्रशिक्षकांनीसुद्धा खेळाडूंना या अनैतिक मार्गावर जाण्यापासून रोखायला हवे. तुम्ही दोषी आढळलात, तर एवढय़ा वर्षांची तुमची कारकीर्द संपुष्टात येते.’’
शरीरसौष्ठव खेळाची सद्य:स्थिती मांडताना चुआ म्हणाले, ‘‘देशातील प्रत्येक नागरिकाला तंदुरुस्त आणि उत्तम स्वास्थ्य ठेवायला आवडते. उत्तम आरोग्य राखण्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता असते. शरीरसौष्ठव हा खेळ यावरच आधारित आहे. शारीरिक आरोग्य जोपासणारी मंडळी राष्ट्रबांधणीसाठी उपयुक्त ठरतात. हा स्वास्थ्यवर्धक खेळ आहे. परंतु बरेच नागरिक यातील गैरप्रकारांना बळी पडतात आणि नाहक पैसा घालवतात. अरनॉल्ड श्वार्झेनेगरने याच खेळाच्या बळावर नावलौकिक मिळवला. हा खेळ सध्या मोठय़ा प्रमाणात वाढतो आहे.’’
ऑलिम्पिक फार दूर आहे!
‘‘ऑलिम्पिकमध्ये खेळांचा आकडा मर्यादित ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय अससलेल्या अनेक खेळांचा त्यांनी समावेश केलेला नाही. दक्षिण आशियाई, आशियाई, जागतिक अशा दर्जाच्या स्पर्धा जागतिक शरीरसौष्ठव संघटनासुद्धा आयोजित करते. त्यामुळे ऑलिम्पिकपर्यंत पोहोचायला शरीरसौष्ठव खेळाला बराच अवधी लागेल,’’ असे मत चुआ यांनी व्यक्त केले.
