ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पात्रता साखळी फेरीतून ‘सुपर-१०’कडे जाण्याच्या दिशेने यजमान बांगलादेशने आपली दावेदारी मजबूत केली आहे. सलग दुसऱ्या विजयानिशी अ-गटात चार गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या बांगलादेशच्या विजयात अल-अमिन हुसेनची भेदक गोलंदाजी महत्त्वपूर्ण ठरली. फॉर्मात असलेल्या शाकिब अल हसनने शानदार फटकेबाजी करीत घरच्या क्रिकेटरसिकांना खूश केले. घरच्या मैदानावरील सोपा पेपर सोडवताना बांगलादेशने नेपाळ या शेजारी राष्ट्रावर आठ विकेट व २७ चेंडू राखून मात केली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेपाळने २० षटकांत ५ बाद १२६ धावा केल्या. त्यामध्ये पारस खाडका (४१) व शरद वेसावकर (४०) यांनी शैलीदार खेळ केला. बांगलादेशच्या अल-अमिन हुसेनने १७ धावांत दोन बळी घेतले. विजयासाठी आवश्यक असणारे १२७ धावांचे आव्हान बांगलादेशने १५.३ षटकांत पार केले. त्यामध्ये अनामुल हक (४२) व शाकिब उल हसन यांचा मोठा वाटा होता. शाकिबने १८ चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांनिश नाबाद ३७ धावा केलया. याशिवाय तमिम इक्बाल (३०) व शब्बीर रहेमान (नाबाद २१) यांनीही संघाच्या विजयाला हातभार लावला.