पीटीआय, अम्मान (जॉर्डन)

भारताचा मोहित कुमार (६१ किलो) २० वर्षांखालील गटातील फ्री-स्टाईल प्रकारातील नवा जगज्जेता मल्ल ठरला. या वयोगटात विजेतेपद मिळविणारा मोहित चौथा भारतीय ठरला. दरम्यान, मुलींच्या ७६ किलो वजनी गटातून प्रियाने अंतिम फेरी गाठली. यापूर्वी मुलींच्या गटात गेल्या वर्षी अंतिम पंघालने ५३ किलो गटात विजेतेपद मिळवले होते.

मोहितने बुधवारी झालेल्या अंतिम लढतीत रशियाच्या एल्डर अखमाडुनिनोवचा गुणांवर ९-८ असा पराभव केला. लढतीत एकवेळ मोहित ०-६ असा पिछाडीवर होता. मात्र, वेगवान कुस्ती करण्याच्या नादात एका क्षणी एल्डर उर्जा गमावून बसला आणि त्याचा फायदा घेत मोहितने सलग नऊ गुणांची कमाई करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. २० वर्षांखालील गटात भारताला जागतिक स्पर्धेत २०१९ नंतर विजेतेपद मिळाले. त्यावेळी दीपक पुनिया विजेता ठरला होता. दीपक आता वरिष्ठ गटात खेळतो. मोहित भारताचा या गटातील चौथा विजेता ठरला. यापूर्वी पलिवदर चिमा (२००१) आणि रमेश कुमार (२००१) यांनी विजेतेपद पटकावले होते.

फ्री-स्टाईल विभागात ७४ किलो वजनी गटात जयदीप आणि १२५ किलो वजनी गटात रजत राहुल कांस्यपदकाचे मानकरी ठरले. जयदीपने किर्गिस्तानच्या झॉकशिलीक बेटाशोवाच ४-२, तर राहुलने कॅनडाच्या करनवीर सिंग माहिलचा ९-८ असा पराभव केला. यापूर्वी मंगळवारी झालेल्या लढतीतून सागर जगलने (७९ किलो) रौप्य, तर दीपक चहलने (९७ किलो) कांस्यपदक पटकावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुलींच्या गटातून प्रियाने आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेच्या केनेडी ब्लेडसचा प्रतिकार सहजपणे एकतर्फी लढतीत १०-० असा मोडून काढ़ला. प्रियाने आपल्या सर्व लढती एकतर्फी जिंकल्या. पहिल्या फेरीत तिने अल्बेनियाच्या मारिया सिलीनवर ४-० अशी मात केली, उपांत्यपूर्व फेरीत अल्बेनियाच्याच ऑलिआक्झांड्रा काझ्लोवाचा प्रतिकार ११-० असा मोडून काढला. मुलींच्या गटातील अन्य एका लढतीत ६८ किलो वजनी गटात आरजूला उपांत्य फेरीत अल्बेनियाच्या एलिझाबेटा पेटलीकोवाकडून ३-९ असा पराभव पत्करावा लागला. आरजू आता कांस्यपदकाची लढत खेळेल.