लंडन : ‘आयसीसी’ विजेतेपदापासून दहा वर्षे दूर राहिलेल्या भारतीय संघाच्या सगळय़ा नजरा आता बुधवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद लढतीकडे लागून आहेत. अलीकडच्या काळात भारताला ‘आयसीसी’ विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळताना आमच्यावर या अपयशाचे किंवा विजेतेपद मिळवण्याचे कसलेच दडपण नाही, असे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान हा अंतिम सामना ओव्हल मैदानवार खेळवण्यात येणार आहे. जागतिक कसोटी स्पर्धेचे हे दुसरे सत्र असून, पहिल्या सत्रात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यापूर्वी २०१४ ट्वेन्टी-२० विश्वचषक, चॅम्पियन्स करंडक (२०१७) या प्रमुख स्पर्धाच्या अंतिम फेरीत भारताला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. भारतीय संघ २०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धा, तसेच २०१६, २०२१ ट्वेंन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दडपणाचा सामना करू शकला नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सगळय़ा पार्श्वभूमीवर प्रशिक्षक द्रविड यांनी दडपणाचा मुद्दा खोडून काढला. ‘‘भारतीय संघ कसोटीच्या जागतिक स्पर्धेत सलग दुसऱ्या सत्रात अंतिम सामन्यात पोहोचला आहे. भारतीय संघाच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आहे. मायदेशासह परदेशातही त्यांचा खेळ उत्तम होत आहे. त्यामुळे या वेळी विजेतेपदाची आणखी एक लढत खेळताना भारतीय संघ दडपणाखाली आहे, असे वाटत नाही. उलट आम्ही विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहोत,’’ असे द्रविड म्हणाले. ‘‘इतिहासाकडे बघताना भारतीय संघाच्या सर्वागीण कामगिरीवरदेखील लक्ष द्यायला हवे. गेल्या दोन वर्षांत भारतीय संघाने चांगले यश मिळवले आहे. अनेक सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. आम्ही ऑस्ट्रेलियात मालिका जिंकलो, मायदेशात मालिका बरोबरीत सोडवली. गेली पाच-सहा वर्षे भारतीय संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला खेळत आहे. तुमच्याकडे ‘आयसीसी’ विजेतेपद नसले, तरी या वर्षांतील कामगिरी विसरता येण्यासारखी नाही,’’असेही द्रविड यांनी सांगितले. भारतीय संघाला संभाव्य विजेते म्हणून पसंती मिळत आहे. पण, द्रविड यांनी हा मुद्दा येथे महत्त्वाचा नसल्याचे स्पष्ट केले.