Yashasvi Jaiswal Creates History IND vs WI 2nd Test: यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजविरूद्ध दिल्ली कसोटीत १७५ धावांची विक्रमी खेळी केली. यशस्वी जैस्वालने कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात डॉन ब्रॅडमननंतर ऐतिहासिक कामगिरी करून मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डची आपल्या नावे नोंद केली आहे. यशस्वी जैस्वालच्या खेळीसह भारताचा कर्णधार शुबमन गिलने १२९ धावांची शानदार खेळी केली आणि संघाला मोठी धावसंख्या करण्यात मदत केली.

पहिल्या कसोटीत चांगली सुरुवात मिळूनही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्यानंतर, या सामन्यात जैस्वालने उणीव भरून काढली. शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाने ५ बाद ५१८ धावा करत डाव घोषित केला. भारताच्या टॉप-५ फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

यशस्वीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १७३ धावांची खेळी केली होती. मात्र दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच विचित्र पद्धतीने धावबाद झाल्याने त्याचं द्विशतक हुकलं. मात्र तरीही त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. ही जैस्वालच्या कसोटी कारकिर्दीतील सातवी शतकी खेळी ठरली आणि त्यापैकी पाच खेळी या १५० धावांहून अधिक धावांच्या आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या पहिल्या चारही शतकांच्या खेळी १५० पेक्षा जास्त धावांच्या होत्या, अशी दुर्मिळ कामगिरी करणारा तो ग्रॅमी स्मिथनंतरचा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे.

यशस्वी जैस्वालने सचिन तेंडुलकरला टाकलं मागे अन् ठरला नंबर वन भारतीय फलंदाज

यशस्वी जैस्वालने २१व्या शतकात एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. २३ वर्षे किंवा त्याहून कमी वयात १५० पेक्षा जास्त धावांच्या पाच खेळी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. खरं तर, या वयात त्याच्यापेक्षा जास्त अशा खेळी फक्त डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहेत. तब्बल ९३ वर्षांपूर्वी, १९३२ मध्ये, आपल्या कसोटी पदार्पणानंतर त्यांनी ८ खेळी केल्या ज्या १५० अधिक धावांच्या आहेत.

वयाच्या २३ व्या वर्षी सर्वाधिक १५० अधिक धावा करणारे फलंदाज

डॉन ब्रॅडमन – १९३०-१९३२ – ऑस्ट्रेलिया – ८ खेळी
यशस्वी जैस्वाल – २०२३-२०२५ – भारत – ५ खेळी
जावेद मियांदाद – १९७६-१९७९ – पाकिस्तान – ४ खेळी
ग्रॅमी स्मिथ – २००२-२००३ – दक्षिण आफ्रिका – ४ खेळी
सचिन तेंडुलकर – १९९३-१९९७ – भारत – ४ खेळी

यशस्वी जैस्वाल हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील वयाच्या २३ व्या वर्षी १५०+ धावांच्या पाच खेळी करणारा पहिला सलामीवीर ठरला आहे. यापूर्वीचा विक्रम ग्रॅमी स्मिथच्या नावावर होता, ज्यांनी अशा चार खेळी केल्या होत्या. इंग्लंडच्या लिओनार्ड हटन (३), पाकिस्तानच्या अब्दुल्ला शफीक (२), वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल (२) आणि ऑस्ट्रेलियाच्या मायकेल स्लेटर (२) यांनीही या यादीत स्थान मिळवलं आहे.

डावखुरा फलंदाज जैस्वाल आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासातील १५०+ धावांच्या खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो रूट त्याच्यापेक्षा पुढे आहे. त्याच्या सात शतकांपैकी पाच १५०+ धावांच्या खेळी आहेत आणि ही आकडेवारी या स्पर्धेच्या इतिहासात त्याच्या वयाच्या कोणत्याही खेळाडूपेक्षा सर्वोच्च आहे.