प्रत्युष राज | इंडियन एक्सप्रेस

Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Century: इंग्लंडविरूद्ध वानखेडेच्या मैदानावर झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात भारताच्या टी-२० संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माने उत्कृष्ट कामगिरी करत १३५ धावांची जबरदस्त खेळी केली. अभिषेकने आजवरची टी-२० मध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी केली. या खेळीनंतर त्याचं सर्वांनीच कौतुक केलं आणि त्याचे गुरू म्हणजेच युवराज सिंगनेही त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं, पण त्याला मेसेज करून काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. अभिषेकचे वडील राज कुमार शर्मा यांनी याबाबत माहिती दिली.

युवराजने शतकानंतर अभिषेकला मेसेज केला आणि म्हणाला, “तुला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण हे कधीही विसरू नकोस की तुला वैयक्तिक यशाचा पाठलाग करायचा नाहीय. संघ नेहमी पहिला असला पाहिजे. तू अशाच खेळी खेळत राहावंस अशी माझी इच्छा आहे. मेहनत कर पण हुशारीने खेळत राहा.” अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं की, युवराजची इच्छा आहे की अभिषेकने भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळावं. म्हणूनच तो त्याला स्ट्राइक रोटेट करून परिस्थितीनुसार खेळायला सांगतो.

४ सप्टेंबरला अभिषेक शर्माच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर युवराज सिंगने एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात लिहिले होते, “या वर्षी तू जितके चेंडू मैदानाबाहेर षटकारासाठी पाठवशील तितक्याच एकेक धावाही घेशील, अशी आशा आहे. व्हिडिओमध्ये, अभिषेकने प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केल्याने युवराज थोडा वैतागून त्याला म्हणताना दिसत आहे की, अरे सिंगल पण घे. यानंतर तरीही अभिषेकने षटकार मारलेला पाहून पंजाबीमध्ये युवराज म्हणतो, तू सुधरणार नाही, नुसता मोठे षटकार मारतो.

अभिषेकचे वडील युवराजच्या ट्रेनिंगबद्दल सांगताना म्हणाले, “युवराज सिंगने त्याला अनेकदा एकेक धावा घेऊन स्ट्राईक रोटेट करण्यावर भर द्यायला सांगितलं आहे. पण अभिषेक म्हणाला, ‘पाजी, जेव्हा मी चेंडू पाहतो तेव्हा मला असं वाटतं की मी प्रत्येक वेळी षटकार किंवा चौकार मारू शकतो आणि जेव्हा मी षटकार मारू शकतो तेव्हा एक धाव घ्यायची काय गरज आहे?’ पण युवराज या गोष्टीवर ठाम आहे की जर त्याला (अभिषेक) तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे असेल तर त्याला स्ट्राइक रोटेट करावी लागेल आणि परिस्थितीनुसार खेळायला शिकावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवराजने त्याला शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय अभिषेकच्या इंग्लंडविरूद्धच्या खेळीतून दिसला. इंग्लंडच्या सर्वोत्तम आक्रमणासमोर तो केवळ मोठे फटकेच मारू शकत नाही तर गरजेनुसार स्ट्राईक रोटेटही करू शकतो, हे त्याने दाखवून दिले. त्याने १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने ३७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सतत विकेट पडत असताना तो एका टोकाला उभा होता. १८ व्या षटकात बाद होण्यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर ५४ चेंडूत १३५ धावांची स्फोटक खेळी करताना अभिषेक शर्माने १९ एकेरी आणि पाच वेळा दोन धावा घेतल्या. याशिवाय त्याने १३ षटकार मारले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा विक्रम आहे.