ZIM vs SL, Dilshan madushanka pick ODI hat trick : जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेला झिम्बाब्वेचा संघ पहिल्या वनडेत श्रीलंकेला नमवत खळबळजनक विजयाची नोंद करणार अशी स्थिती होती. शेवटच्या षटकात ६ चेंडूत १० धावा करण्याचं आव्हान झिम्बाब्वेसमोर होतं. मात्र डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशनकाने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट पटकावत हॅट्ट्रिक घेतली. या हॅट्ट्रिकच्या बळावर श्रीलंकेने झिम्ब्बाव्वेला ७ धावांनी निसटता विजय मिळवला. श्रीलंकेने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी बढत घेतली आहे. आशिया चषकाची तयारी म्हणून या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर पाथुम निसांकाने ७६ धावा करत श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. मात्र झिमाब्वेच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत श्रीलंकेच्या डावाला वेसण घातली. जनिथ लियांगे आणइ कामिंदू मेंडिस या जोडीने सातव्या विकेटसाठी ८३ चेंडूत १३७ धावांची भागीदारी करत श्रीलंकेला पावणेतीनशेचा टप्पा गाठून दिला. जयांगेने ४७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७० धावांची खेळी केली. कामिंदूने ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. झिम्बाब्वेतर्फे रिचर्ड नकाराग्वाने २ विकेटस घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेला सलामीवर बेन करन आणि शॉन विल्यम्स यांनी डावाला आकार दिला. बेनने ७० तर शॉने ५७ धावांची खेळी केली. स्थिरावल्यानंतर हे दोघे बाद झाले आणि झिम्बाब्वेची स्थिती १६१/५ अशी झाली मात्र यानंतर सिकंदर रझाने सूत्रं हातात घेतली. रझाने श्रीलंकेच्या गोलंदाजीवर चौकार, षटकार वसूल केले. त्याला टोनी मुनयोंगाने चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ११५ चेंडूत १२८ धावांची भागीदारी रचली. या दोघांनी वाढत्या धावगतीचं आव्हान नियंत्रणात ठेवलं होतं. शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला ६ चेंडूत १० धावांची आवश्यकता होती. रझा शतकाच्या उंबरठ्यावर होता. मात्र पहिल्याच चेंडूवर मधुशनकाने रझाला त्रिफळाचीत केलं. रझाने ८७ चेंडूत ८ चौकारांसह ९२ धावांची खेळी साकारली. पुढच्याच चेंडूवर ब्रॅड इव्हान्स अविष्का फर्नांडोच्या हातात झेल देऊन बाद झाला. तिसऱ्या चेंडूवर रिचर्ड नकाराग्वाला त्रिफळाचीत करत मधुशनकाने हॅट्टट्रिक नावावर केली. या धक्क्यातून झिमाब्वेचा संघ सावरलाच नाही. उर्वरित ३ चेंडूत त्यांना २ धावा करता आल्या आणि श्रीलंकेने थरारक विजय मिळवला.
वनडे क्रिकेटमधली ही ५२वी हॅट्ट्रिक आहे. वनडेत हॅट्ट्रिक घेणारा मधुशनका श्रीलंकेचा सातवा गोलंदाज ठरला. याआधी चामिंडा वास, परवेझ महारुफ, लसिथ मलिंगा, थिसारा परेरा, शेहान मधुशनका, महेश थीकसाना यांनी वनडेत श्रीलंकेसाठी हॅट्ट्रिक घेतली आहे.