20 September 2018

News Flash

सुरक्षित ऑनलाइन खरेदी

ऑनलाइन खरेदीमध्ये ऑनलाइन पेमेंटखेरीज ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चीही सुविधा असते.

प्रा. योगेश हांडगे

HOT DEALS
 • Micromax Vdeo 2 4G
  ₹ 4650 MRP ₹ 5499 -15%
  ₹465 Cashback
 • Honor 9 Lite 32 GB Sapphire Blue
  ₹ 11914 MRP ₹ 13999 -15%
  ₹1500 Cashback

इंटरनेटची व्याप्ती वाढल्यामुळे ऑनलाइन शॉपिंगला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात आहे. आपल्याला हवी ती वस्तू घरबसल्या एका क्लिकसरशी मागवण्याची सुविधा ई कॉमर्ससंकेतस्थळे पुरवतातच; पण बाजाराच्या तुलनेत या संकेतस्थळांवरून मिळणाऱ्या वस्तू स्वस्त असल्याने या खरेदीकडे ओघ वाढत आहे. ऑनलाइन शॉपिंग ही ग्राहकांच्या फायद्याची असली तरी, ते करताना खबरदारी घेतलीच पाहिजे.

आजकाल इंटरनेटमुळे अनेक व्यवहार करणे सुलभ झाले आहेत. मात्र, जरी ही सुलभता असली तरी अनेक धोके आहेत. तुमची याच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.  प्रतिष्ठित आणि सुरक्षित साइट्सची निवड तुम्ही खरेदीसाठी साइटची निवड करता तेव्हा ब्राउझरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये छोटे कुलपाचे चिन्ह आहे का याची खात्री करा. वेबसाइटचा पत्ता ‘एचटीटीपीएस’पासून (https://)  सुरू व्हायला हवा. यातील ‘एस’ हे आद्याक्षर ‘सिक्युरिटी’ या अर्थाने प्रकट होते. म्हणजेच हे संकेतस्थळ सुरक्षित आहे. त्यामुळे ज्या संकेतस्थळावरून तुम्ही खरेदी करू इच्छिता, त्या संकेतस्थळाबाबत ही नोंद अवश्य करा. दुसरं म्हणजे, अनोळखी किंवा नवीन संकेतस्थळावरून खरेदी करण्यापूर्वी इंटरनेटवर सर्च करून त्या संकेतस्थळाबाबतची माहिती जाणून घ्या.

ऑनलाइन खरेदीमध्ये ऑनलाइन पेमेंटखेरीज ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चीही सुविधा असते. तुम्ही कितीही ‘नेटसॅव्ही’ असलात तरीही ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय निवडा. वस्तू घरी आल्यानंतर तिची खातरजमा करून पैसे चुकते करणं, कधीही चांगलं. ऑनलाइन पैसे भरणार असाल तर तुमचा पासवर्ड ‘शेअर’ किंवा ‘सेव्ह’ होणार नाही, याची खबरदारी घ्या. ऑनलाइन आर्थिक व्यवहारांसाठी पासवर्ड जितका क्लिष्ट तितके अधिक चांगले. जेव्हा तुम्ही जास्त किमतीची वस्तू खरेदी करता तेव्हा डेबिट कार्डपेक्षा क्रेडिट कार्ड वापरणे अधिक योग्य.   ऑनलाइन रिटेलर्स जरी पारंपरिक दुकानांच्या तुलनेत वाजवी दरात प्रॉडक्ट्सची विक्री करत असले, तरीही त्या प्रॉडक्टच्या दर्जाबाबत आपल्याला कुणीही शाश्वती देऊ  शकत नाही. पारंपरिक दुकानांमध्ये जाऊन तुम्ही वस्तूची तात्काळ खरेदी करू शकता. याउलट वस्तू ऑनलाइन खरेदी केली, तर ती वस्तू घरी यायला काही दिवस लागतात. पारंपरिक दुकानांमधून घेतलेली वस्तू वॉरंटीअंतर्गत परत करणे सहज सोपे असते; परंतु याउलट ऑनलाइन वस्तू परत करणे अवघड असते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाहतुकीचा खर्च द्यावा लागतो.

ऑनलाइन खरेदीमध्ये वाहतुकीच्या खर्चाबाबत सुरुवातीला काहीच सांगितले जात नाही. नंतर मात्र हा ‘शिपिंग’चा म्हणजेच वाहतुकीचा हा अतिरिक्त खर्च या वस्तूच्या मूळ किमतीत धरला जातो. ऑनलाइन खरेदीत फसवणुकीची शक्यता जास्त असते. यात प्रॉडक्ट्सची विक्री करणाऱ्या तिसऱ्या पक्षाकडून खरेदीदारांची फसवणूक होण्याची संभावना असते. यात हे विक्रेते खरेदीदारांकडून वस्तूंचे पैसे स्वीकारतात; परंतु त्या वस्तू घरी पाठवत नाही.

ऑनलाइन शॉपिंग टिप्स

 • शक्यतो नावाजलेल्या वेबसाइट्सवरून शॉपिंग करा. जेणेकरून काही अडचण आल्यास त्यांच्याशी थेट संपर्क साधता येतो.
 • कोणत्याही साइटवरून शॉपिंग करताना खाली ‘लॉक’चे चिन्ह आहे का याची खात्री करून घ्या.
 • कोणतीही शॉपिंग वेबसाइट तुमची जन्मतारीख किंवा तुमची अन्य माहिती मागवत नाही. पण जर तुमची जन्मतारीख आणि क्रेडिट – डेबिट कार्ड नंबर जर कोणाला मिळाला तर ते ‘कॉम्बिनेशन’ करून कार्ड वापरायचा प्रयत्न करू शकतात.
 • आपले क्रेडिट आणि बँक स्टेटमेंट चेक करत राहा आणि कोणतेही अन्य शुल्क लावलेले नाहीत हे पडताळा.
 • तुमचा कॉम्प्युटरवर अपडेटेड अँटिव्हायरस आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट्स इन्स्टॉल्ड आहेत याकडे लक्ष असू द्या.
 • आपला पासवर्ड कोणाला सहज कळेल असा नसावा.
 • शक्यतो बाहेरच्या मशीन्सवरून ऑनलाइन व्यवहार करणे टाळावे.
 • सुरक्षित आणि खासगी वायफायचाच वापर करा.

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

First Published on May 17, 2018 12:27 am

Web Title: article on secure online shopping