News Flash

नवं काय? : पेट्रोल इंजिनमधील फ्युएल इंजेक्शन सिस्टीम

सीएमच्या आज्ञेला अनुसरून इंजेक्टरद्वारे योग्य वेळी आणि  योग्य प्रमाणात पेट्रोल स्प्रे केले जाते.

मिलिंद गांगल

इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात क्रांती करून आमूलाग्र बदल घडवले. अनेक महाकाय गोष्टी सूक्ष्मात नेऊन ठेवल्या, अचूकता, सुलभता आणली. अर्थातच ही क्रांती वाहन तंत्रज्ञानात सुद्धा आलीच. कार्बोरेटर नामक पेट्रोल इंजिनचे ‘हृदय’च या इलेक्ट्रॉनिक्सच्या झंझावातात नाहीसे झाले आणि एमपीआय (मल्टि पॉइंट इंजेक्शन तंत्रज्ञान) प्रणाली उदयास आली.

पेट्रोल इंजिन (स्पार्क इग्निशन सायकल) चालण्यासाठी मुळात स्पार्कप्लगमधून पडणारी ठिणगी, हवा आणि पेट्रोलचे मिश्रण या दोन गोष्टी आवश्यक असतात. एमपीएफआय प्रणालीद्वारे इंजिनवर सेन्सर लावलेले असतात. त्याद्वारे माहिती गोळा करून ती इंजिन कण्ट्रोल मोडय़ुलला पाठवली जाते. त्यानुसार सी.यू. इलेक्ट्रॉनिक प्रोसेसर, इंजिनला दिले जाणारे पेट्रोल हवा आणि स्पार्कप्लगमधून पडणारी ठिणगी या गोष्टी नियंत्रित केल्या जातात.

इन टेक एअर टेम्परेचर सेन्सर (आयएटी)- इंजिनमध्ये जाणाऱ्या हवेचे तापमान मोजणारा सेन्सर.

मेनीफोल्ड प्रेशर सेन्सर -(एमएपी) इंजिनमध्ये जाणाऱ्या हवेचा दाब मोजणारा सेन्सर.

थ्रॉटल पोझिशनिंग सेन्सर (टी.पी.एस.)- एक्सलेटरवर दाब दिल्यावर हवा आत घेणारा व्हॉल किती उघडला आहे ते दर्शवणारा सेन्सर.

कुलॅण्ट टेम्परेचर सेन्सर (सीटीएस )- इंजिनमधील कुलन्टचे तापमान सूचित करणारा सेन्सर.

आर पी एम सेन्सर- इंजिन फिरण्याची गती मोजणारा सेन्सर.

ऑक्सिजन (लॅम्बडा) सेन्सर- ज्यामुळे एक्झॉस्टमधून किती प्रमाणात ऑक्सिजन बाहेर पडत आहे हे कळते.

व्हेईकल स्पीड सेन्सर- गाडीचा वेग दर्शवणारा सेन्सर.

बॅटरी व्होल्टेज सेन्सर- बॅटरी व्होल्टेज दर्शवणारा सिग्नल.

या साऱ्या सेन्सरद्वारे येणारी माहिती (ईसीएम) इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल मोडय़ुलला दिली जाते.

इंजिनच्या इन टेक व्हॉलच्या मागे एक फ्युएल इंजेक्टर लावलेला असतो.

सीएमच्या आज्ञेला अनुसरून इंजेक्टरद्वारे योग्य वेळी आणि  योग्य प्रमाणात पेट्रोल स्प्रे केले जाते. एअर फिल्टरमधून येणाऱ्या शुद्ध हवेसोबत पेट्रोल मिसळले जाते. सदर मिश्रण सक्शन स्ट्रोकमध्ये इंजिनमध्ये ओढले जाते, पिस्टनद्वारे दाबले जाते. (कॉम्प्रेशन स्ट्रोक) मग त्यावर सीएमच्या आज्ञेला अनुसरून स्पार्क प्लगद्वारे एक ठिणगी पडते आणि नियंत्रित स्वरूपाचा स्फोट होतो त्याला पॉवर स्ट्रोक असे म्हणतात. यामुळे इंजिनचा पिस्टन खाली ढकलला जाऊन इंजिन चालू होते. एक्झॉस्ट व्हालमधून धूर सायलेन्सरकडे ढकलला जातो.

एक्झॉस्टमधून बाहेर पडणाऱ्या धुरात असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण सेन्सरद्वारे लक्षात घेऊन इंजिन कंट्रोल मोडय़ुल इंजिनमध्ये जाणाऱ्या पेट्रोल व हवेचे मिश्रणातील पेट्रोलचे प्रमाण कमी-अधिक करून पेट्रोलची बचत करते.

एम पी आय पद्धतीत यात अधिक अचूकता आली आणि हे  प्रमाण १४.७ भाग हवा अन् १ भाग पेट्रोल असे झाले. याला लीन मिर असे म्हणतात. पूर्वी काबरेरेटर असलेल्या इंजिनात काबरेरेटरचा एअरस्क्रू हाताने अ‍ॅड्जस्ट करून हवा, पेट्रोलचे प्रमाण ठरवता यायचे तेव्हा ते १६:१ म्हणजे १६ भाग हवा व १ भाग पेट्रोल असे असले म्हणजे योग्य समजले जायचे.  एम पी आय इंजिन कमीत कमी प्रदूषण करतात, उत्तम कार्यक्षमता दाखवतात, ज्याने इंधन बचत होते. अंतर्गत ज्वलन इंजिनाचे सारे नियंत्रण आता इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या माध्यमातून केले जाते. भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रीक इंजिनाच्या गाडय़ांचे नियंत्रणसुद्धा अतिउच्च प्रकारातल्या इलेक्ट्रॉनिक सेन्सरद्वारेच केले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 6:25 am

Web Title: fuel injection system in petrol engine
Next Stories
1 जुन्नरचे कातळसौंदर्य
2 ट्रिपटिप्स : जंगल भ्रमंतीत काय टाळावे?
3 बांबू चिकन आणि कॉफी
Just Now!
X