|| भक्ती परब

मुलांच्या बाबतीतल्या राजस प्रियकर, स्वप्नातला राजकुमार, रोमँटिक, हँडसम हंक अशा संकल्पना मागे पडून ‘कूल गाय’ ही संकल्पना मूळ धरू लागली. मुलींसारखे केस वाढवलेला, दाढी-मिश्या नसलेला किंवा ती ठेवण्याचीही वेगळी स्टाइल असलेला, टी-शर्टवर विदेशी झेंडा मिरवणारा, कानात बाली, हाताच्या दंडावर टॅटू काढलेला असा मुलगा ‘कूल गाय’ म्हटल्यावर डोळ्यांसमोर उभा राहतो. अशी मुलं कॉलेजात, वर्गात कमीच दिसतात. पण कट्टय़ावर कॅफेटेरियात, डिस्को-पब्जमध्ये जास्त पाहायला मिळतात. ड्रम्स-गिटारसारखी वाद्य वाजवणारी, ‘यो..यो’ च्या भाषेत बोलणारी ही ‘कूल गाय’ मंडळी स्वत:च्याच स्वॅगमध्ये रमणारी असतात.

पूर्वी चित्रपटातील हिरोच काहीसे अशा संकल्पनांमध्ये बसत असत. त्यामुळे त्यांच्यासारखा स्वत:सोबत कोणी तरी असायला हवा. कॉलेज कट्टय़ावर टाइमपास करणारा, ज्याच्या येण्याने ग्रुपमध्ये उत्साह येईल, नेहमीच्या अभ्यासू वातावरणात एक जान येईल. असा ‘कूल गाय’ आसपास असलाच पाहिजे यार.. पण या त्याची व्याख्या आणि संकल्पना तेव्हा अशी असायची. कसला भारी दिसतोय, काय अ‍ॅटिटय़ूड आहे त्याचा. मुलींसाठी तो म्हणजे असा होता. आताही थोडय़ाफार फरकाने हे आहेच, पण मत बदलू लागले आहे.

सध्या मुलींसमोर ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’मधला कार्तिक आयर्न, ये जवानी है दीवानी, तमाशा, रॉकस्टारमधला रणबीर कपूर, वरुण धवनची फ्लर्टी मुलाचे व्यक्तिमत्त्व , की अ‍ॅण्ड का मधला अर्जुन कपूर, डॅशिंग आणि फायटर टायगर श्रॉफ, वेगवेगळ्या लुक्समधून भुरळ पाडणारा रणवीर सिंग असे अनेक बॉलीवूड स्टार्स ‘कुल गाय’च्या व्याख्येत आहेत. त्याचबरोबर छोटय़ा पडद्यावरचे करण कुंद्रा, पर्ल पुरी, नकुल मेहता, शांतनु माहेश्वरी, शब्बीर अहलुवालिया, अर्जुन बिजलानी यांच्याविषयी मुलींना कायम पण त्यांची त्यांची स्वत:ची अशी ‘कुल गाय’ची स्वतंत्र मते आहेत.

तुझी ‘कुल गाय’ची व्याख्या काय असं विचारलं असता व्यवसायाने वकील असलेली स्नेहा पोकळे सांगते, ‘कुल गाय’ म्हणजे एकदम हाय-फाय स्टाइलिश असावा. तरीही त्याने आपल्या संस्कृतीचा विसर पडू देता कामा नये. त्याला विविध स्वभावाच्या माणसांशी कसं वागायचं हे कळलं पाहिजे, त्याला कठीण प्रसंगात कोणी हाक मारली तर त्यांच्या हाकेला, मदतीला धावून जाणारा, तो समजूतदार असला पाहिजे, कुठल्याही व्यक्तीसोबतच्या संगतीत त्याला जुळवून घेता आले पाहिजे. एकूणच स्वत:च्या व्यवसायाप्रमाणे ठाम आणि योग्य शब्दांत स्नेहाने तिचे मत मांडले.

चिडवणारा, मस्करी करणारा..

खरं तर असा एक मित्र ज्याच्यासोबत आपण सगळ्याच गोष्टी शेअर करू शकतो. मग त्या वैयक्तिक असो की व्यावसायिक किंवा सामाजिक. ज्याच्यासोबत तासन्तास गप्पा मारू शकतो, त्याने समजून घेऊन आपल्याला नेहमी प्रोत्साहितही केले पाहिजे. त्याच्यासोबतची मस्ती, भांडणं, रुसवे-फुगवे फक्त त्या वेळेपुरतेच असले पाहिजेत. आपल्याला जी गोष्ट आवडत नाही, हे त्याला माहीत असूनही जो सतत त्याच शब्दावरून किंवा त्यानेच ठेवलेल्या टोपणनावावरून आपल्याला चिडवील, आपली मस्करी करेल, ज्याला आपण हक्काने आणि लाडाने म्हणू शकतो तू माझा कूल डूड आहेस.                   -रसिका म्हात्रे

विविध विषयांचा व्यासंग असलेला

अतिशय शांत पण मजेशीर स्वभावाचा, पर्यटनाची आवड असलेला, कला, साहित्य, तंत्रज्ञान, निसर्ग यांसारख्या विषयांचा व्यासंग असलेला, प्रत्येक विषयावर स्वत:चं मत असलेला, स्वत:च्या अटींवर जीवन जगण्याची धमक असणारा, आयुष्यातील छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये आनंद शोधणारा, आयुष्यात स्वत:चे ध्येय असलेला, मनमोकळा संवाद साधणारा, एखादा कलागुण अंगी असलेला.  -हर्षदा परब

व्यवसायाने ‘सॉफ्टवेअर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह’ असलेली प्रियांका कदम हिनेही काहीसे वेगळे मत मांडले, शांत आणि नीट समजून घेणाऱ्या स्वभावाचा. इतर लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात. याकडे लक्ष न देणारा, नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी सदैव तयार असलेला, मित्र जोडणारा, वेगवेगळे नवे आऊटफिट घालून बघणारा, वेगवेगळे लुक ट्राय करणारा म्हणजे अगदी रणवीर सिंगसारखा.. मुलींशी हेल्दी फ्लर्टिग करणारा म्हणजे ज्याचे फ्लर्टिग मुलींना चालेल इतपत असणारं आणि त्यालाही ते आवडायला हवं, स्वयंप्रेरणेने काम करणारा, तुम्हाला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तुमच्या बाजूने लढणारा अगदी मोठय़ा भावाप्रमाणे. स्त्री-पुरुष समानता मानणारा तो असला पाहिजे. प्रियांका सांगते, ‘कूल गाय’ म्हणजे असा मुलगा ज्याला स्वीकारणं आणि टाळणं यातला फरक समजायला हवा.

बालमानसोपचारतज्ज्ञ असलेल्या ऐश्वर्या कुलकर्णी हिचे एकदम हटकेच मत आहे बरं का. ती म्हणाली..मला ही ‘कूल गाय’ वगैरे संकल्पना फारशी पटत नाही. पण विचारत आहात तर सांगतेच. असा मुलगा जो निश्चितच असेल, त्याच्याकडे चांगली विनोदबुद्धी नसेल, ट्रेण्डमध्ये असणारे कपडे घालणारा म्हणजे लोवेस्ट पॅन्ट किंवा सॅण्डोज घालणारा. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ट्रान्समध्ये जाऊन वेगळी सांस्कृतिक पाश्र्वभूमी असलेलं संगीत ऐकण्याची आवड असली पाहिजे. त्याचे व्यक्तिमत्त्व असे असले पाहिजे की जग काहीही म्हणो, तो सगळं त्याला हवं तसं वागणारा, करणारा.

श्रुती वैद्य हिचं मत काहीसं वेगळं आहे. ती म्हणते, सगळ्यांचा आवडता असलेला, छान आणि नीटनेटका दिसणारा, सगळं कसं व्यवस्थित करणारा, वेगवेगळ्या सामाजिक समूहांत वा वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यात गुंतलेला, सतत कार्यमग्न असणारा, सुंदर व्यक्तिमत्त्व असलेला, इन्टरेस्टिंग आणि छान विनोदबुद्धी असलेला, गमतीशीर, स्वत:च्या नोकरी-व्यवसायात यशस्वी असलेला असा तो असला पाहिजे.