गेल्या लेखाच्या (भावनिक गुणांकाचं महत्त्व) शेवटीशेवटी मी म्हणालो होतो तसं, मुलं झाली की निराळ्या प्रकारच्या शिक्षणाला सुरुवात होते. लग्नाचा एक अर्थ माता-पिता होणं हे असतच, त्यामुळे बाप होणं म्हणजे काय ते शिकणं अपरिहार्य असतेच. मला आणि शोभाला आता एक पंचेचाळिशीतला मुलगा आणि एक बेचाळीस वर्षांची मुलगी आहे, नातवंडही आहेत. आम्ही मध्यमवर्गीय असल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होणार हे नक्की होतं, पण वागणुकीबद्दल काही प्रश्न जाणवत होते. त्याच काळात पालकत्वाबद्दल एक अभ्यासक्रम जाहीर झाला होता. आम्ही दोघांनीही तो काही महिन्यांचा मोठा असूनही पुरा केला. बऱ्याच गोष्टी उलगडल्या.

आपण सगळे लहानपणापासून ऐकत आलो आहोत की थिअरी फक्त कपाटातल्या पुस्तकात लिहिण्याची, महाविद्यालयामधे शिकवण्याची असते आणि सराव निराळाच असतो. प्रत्यक्षात मानवाने कृती म्हणजे सराव प्रथम केला आणि दुसऱ्याला समजावून सांगण्यासाठी ती कृती शब्दात मांडली. विषय मोठा असल्यामुळे मी त्याचे दोन भाग करणार आहे. त्यातल्या या भागात सगळ्या पालकांच्या चिंतेचा विषय शाळा, अभ्यास हा होणार आहे. पुढच्या भागात इतर गोष्टींबद्दल बोलणार आहे.

Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान
Video: UPSC Civil Services Rank 239 Holder Pavan Kumar Celebrates Victory
VIDEO: शाब्बास पोरा! शेतकऱ्याचा लेक झाला IAS; घरची परिस्थिती बिकट, झोपडीत राहून यूपीएससीत भरारी
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Loksatta lokshivar Agriculture Business Milk business animal husbandry
शेती नसणाऱ्याची धवलक्रांती!

माझा स्वत:चा त्याबाबतीत भरपूर घोटाळा झालेला होता. मी पार बिघडलेला मुलगा होतो. मग मला मार मिळायचा. माझ्या आईला तर मला सुधारण्याच्या दोनच गोष्टी माहिती होत्या. एक म्हणजे मार आणि दुसरा उपाय म्हणजे देवासमोर मला उभं राहायला लावून पुन्हा असं वागणार नाही, असं म्हणायला लावणं. माझ्या अभ्यासाचा पायाच कच्चा राहिल्यामुळे पुढे शिक्षणाची पार वाट लागली होती. एवढया बिघडलेल्या अवस्थेवरून म्हणजे जवळजवळ कडय़ाच्या टोकावरून मी परत आलो याचं कारण माझे एक शिक्षक. ते इतर शिक्षकांबरोबर बोलत असताना असं म्हणाले की, ‘हा खरा हुशार मुलगा आहे आणि हा मागे पडला ही आपली चूक आहे. आपण याला शिक्षणाची गोडी लावू शकलो नाही.’ या एका वाक्याने मी १८० अंश उलटा फिरलो आणि चक्क सुधारलो. विद्यार्थ्यांला शिक्षणाची गोडी लागली नाही तर ती चूक शिक्षकाची आहे आणि दुसरं म्हणजे रागावून, मारून, मूल कधीही सुधारत नाही, हे सगळ्या पालकांनी लक्षात घ्यायला हवं.

समाजाची पालक-शिक्षणाची गरज वाढतेच आहे. पालकांवर खूप म्हणजे खूपच ताण आहेत. पण तरी एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांसाठी सांगतो, ‘देअर इज नो प्रॉब्लेम चाइल्ड, देअर आर प्रॉब्लेम पेरंट्स’. मुलांनी आई-वडिलांची परीक्षा घेऊन आपल्या पोटी जन्म घ्यायचा की नाही हे ठरवणं शक्य असतं तर अनेक आया कदाचित काठावर पास झाल्या असत्या, पण बाबा नक्की नापास झाले असते. मूल जन्माला कशासाठी घालायचं? हा प्रश्न विचारला तर तात्पुरते सगळेजण स्तब्ध होतात. एकमेकांकडे बघतात, नवराबायको दोघंही हजर असले तर ते एकमेकांकडे बघतात. फारच कमी लोकांनी लग्न करताना आपल्याला मुलं हवीत की नकोत, याच्यावर चर्चा केलेली असते. बाकीच्यांनी थेट गृहीत धरलेलं असतं की लग्न केलं म्हणजे मूल होणारच. मुलाला जन्म कशासाठी द्यायचा हा काय प्रश्न झाला?

कोणी सांगतं, ‘आई होण्याच्या आनंदासाठी’. कोणी तरी म्हणतं, ‘बाप होणं हाही आनंदच असतो की!’, एका कार्यशाळेत एकाने सांगितलं, ‘मानववंश चालू राहावा यासाठी’. एक म्हणाला, ‘निर्मितीच्या आनंदासाठी’, ‘आपण चांगला माणूस घडवू शकतो की नाही हे बघण्यासाठी’. मुलाचा जन्म ही इच्छा कोणाची होती? मुलांची नक्कीच नाही. जो हेतू होता तो आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचा होता. थोडक्यात, ‘मुलाचा जन्म हा आई-वडिलांच्या स्वार्थामुळेच होतो’ हे वाक्य बोचणारं वाटेल पण ते अशासाठी आहे की आई-वडिलांनी आपल्याला जन्म देऊन आणि पालनपोषण करून आपल्यावर उपकार केले आहेत या कृतज्ञतेच्या भावनेचा भव्यपणा जरा कमी व्हावा.

आता सर्वात जास्त प्रमाणात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाकडे वळतो. ‘आमचं मूल पुरेसा अभ्यास करत नाही, कितीही मागे लागलं तरी अभ्यासालाच बसत नाही, त्याचे शाळेतले मार्क कमी होतायत,’ हा तो प्रश्न. त्याशिवाय घराघरातला एक विषय असतोच तो म्हणजे मुलाच्या शाळेचं माध्यम कुठचं? त्याचंही उत्तर अगदी साधं म्हणजे कुटुंबात जी भाषा रोज बोलली जात असेल ती भाषा हे माध्यम. अभ्यास घेण्याची कल्पना डोक्यातून काढून टाकायची. आईने का वडिलांनी हा प्रश्नच नाही, पण अभ्यास हा घ्यायचा नसतो. फार फार तर गोडी लावण्यापुरतं आपण मिळून अभ्यास करू असं म्हणणं ही त्याची मर्यादा झाली.

एकदा अभ्यास घ्यायचा नाही हे ठरलं की शिक्षणातली पुढची वाटचाल फार सोपी आहे. पण हे सगळं आईने करायचं असं बाबांच्या डोक्यात असलं तर बाबांना त्याची फिकीर नसते, असा त्याचा अर्थ आहे. तुमच्या आणि मुलाच्या नशिबात इंग्लिश शाळा असेल तर आवर्जून त्याचं मराठी तयार करून घ्या आणि मराठी शाळा असेल तर अगदी लहानपणापासून इंग्लिश तयार करून घ्या. ज्याच्यात मजा येत नाही ते शिक्षण, तो विषय व्यर्थ आहे, एखादा विषय मुलाला आवडत नाही याचाच अर्थ तो शिकताना त्याला मजा आली नाही.

शिकणं हा मुलाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. मूल शिकणारच; तुम्ही त्याला थांबवूच शकत नाही. ते अनेक प्रश्न विचारणार, अनेक गोष्टी समजून घेणार. पालकांनी आणि शिक्षकांनी त्याच्या शिक्षणातला अडथळा बनायचा नाही एवढी एकच गोष्ट करायची आहे. बहुतेकांना असं वाटतं की, आपल्या मुलाचे दहावी आणि बारावीचे मार्क हे खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्यक्षात मी सगळ्यांना असं आवाहन करतो की, त्यांनी ओळखीच्या शंभर लोकांशी बोलावं आणि शोधून काढावं की ज्यांना आयुष्यात यश मिळालं अशांपकी किती मुलं दहावी-बारावीत भरपूर मार्क मिळवणारी होती.

मी जवळजवळ ५० र्वष नोकरी-धंद्यात-व्यवसायात व्यवस्थित काम करतो आहे. मला कधीही कोणी विचारलं नाही की, मला दहावीत किती टक्के मार्क मिळाले होते. सगळं जे अवलंबून असतं ते मी आसपासच्या लोकांशी वागतो कसा, माझं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच फील्डवर्क किती अर्थपूर्ण होतं याच्यावर. शाळांना नव्याण्णव टक्के वेळा माहिती असतं की कुठचीही भाषा शिकण्याचा क्रम – ऐकणं, बोलणं, वाचणं, लिहिणं असाच असतो. मुलं वाचायला लागली आणि शाळेने किंवा पालकांनी त्याबद्दल रागवारागवी, मारपीट, शिक्षा असला काही उद्योग केला नाही की मुलांना त्याची आपोआप गोडी लागते. हळूहळू ती आपसूक लिहायलाही लागतात.

त्यानंतर शाळा मुलांना घडवते किंवा बिघडवते. शाळेने भाषेची गोडी लावण्याचं मुख्य काम जर केलं तर सगळे प्रश्न आपोआप सुटत जातात. पुन्हा पुन्हा एकच गोष्ट समोर येते. खरं मुख्य काम म्हणजे गोडी लावणं असतं आणि ते सर्वात कठीण आहे. मूल सर्वसामान्य असलं तर खरं म्हणजे शिकवणं नावाची काही गोष्टच नसते. शिक्षण उपलब्ध करणं एवढंच करायचं असतं. बघा विचार करून.

आधी मी म्हणाल्याप्रमाणे पालकशाळेत इतर अनेक विषय निघतातच. मुलांना केलेल्या शिक्षा, त्यांचा टी. व्ही. बघण्याचा हट्ट, पशांची समज, योग्य संस्कार म्हणजे काय, खेळ, छंद, स्वछतेचं शिक्षण, अशा अनेक विषयांविषयी पुढच्या लेखामध्ये बोलूया.

– अनिल भागवत

hianildada@gmail.com