बदल : एक प्रवास

परिस्थितीचा तडाखा जबरदस्त असतो तेव्हा मात्र हे बदल आपसूक होऊन जातात.

बदल घडवून आणण्यासाठी एखादी गोष्ट ठरवणं आणि ती अमलात आणणं, यात खूप अंतर असतं. हे अंतर पार करणं नेहमीच जमतं असं नाही. किंबहुना अनेकदा ते आपल्या हातून निसटूनच जातं. म्हणूनच नव्या वर्षांसाठीचे संकल्प हा जगभरात कायमचा विनोदविषय आहे.

परिस्थितीचा तडाखा जबरदस्त असतो तेव्हा मात्र हे बदल आपसूक होऊन जातात. मोठं आजारपण, युद्धातला पराभव, खेळातलं/ परीक्षेतलं अपयश.. ही त्याची काही खास उदाहरणं. अशा वेळी घडवून आणलेले बदल टिकण्याची शक्यताही खूप जास्त असते. बदल करणाऱ्याला त्याची वाटलेली ‘आत्यंतिक निकड’ हा त्यातला कळीचा भाग असतो.

पालकत्वाच्या बाबतीत नेमका हाच कळीचा मुद्दा खास दुर्लक्षिला जातो. म्हणजे आपण मुलांच्या खाण्याचं उदाहरण घेऊ. अनेक लहान मुलं ‘खात नाहीत’ ही एक अतिशय कॉमन तक्रार. मुलांच्या पोटाच्या काही तक्रारी नसतील तर मुलं का खाणार नाहीत? बहुतेक वेळा मुलांना भूक लागलेली नसताना त्यांना खाऊ घालायचे प्रयत्न केले जातात. त्यासाठी मग अगदी सात-आठ वर्षांच्या मुलांनाही भरवलं जातं. मुलं आपल्या परीने ‘नाही’ म्हणून पाहतात, पण आई-वडील त्यातून काही बोध घेत नाहीत. कळत-नकळत मग त्यांचा प्रतिकार घास तोंडात धरून ठेवणं, हट्ट करत राहणं, अशा मार्गातून व्यक्त होऊ लागतो. मुलाला भूक लागेपर्यंत थांबणं हा त्यावरचा पहिला उपाय असतो. त्याला खायची निकड वाटते, तेव्हा ते आपोआप खातंच. पण आपली थांबायची तयारी नसते.

हाच प्रकार मुलांच्या अभ्यास, होमवर्क, प्रॉजेक्ट्सबाबत होतो. तो वेळेत पुरा झाला पाहिजे असं मुलांना वाटतं, तेव्हा ते आपणहून करतात.

मुळात पालक आणि मुलांबरोबर काम करतानाची ही खास मेख असते. बऱ्याचदा काही गोष्टी, सवयी भविष्यासाठी म्हणून मुलांच्या अंगी बाणायला हव्यात असं पालकांना वाटत असतं (उदा. स्वच्छता, व्यवस्थितपणा, वेळेचं महत्त्व, थांबता येणं). तेव्हा ते समजण्याची मुलांची कुवत नसते. पण पालकांना अनुभवातून त्याचं मोल माहीत असतं, म्हणून ते मुलांच्या मागे लागतात. कितीही सांगितलं तरी मूल एखादा बदल करू पाहत नसेल तर त्याला मुळातून तो करावासा वाटत नसावा, अशीही खूप शक्यता असते. किंवा त्या वेळेला ती त्याची प्रॉयॉरिटीही नसेल, म्हणूनही त्याला ती निकड नाही वाटत. पालक म्हणून याचं भान असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

म्हणून आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही गोष्टींत मुलाचा फारसा कल नाही हे पालकांनी लक्षात घेतलं की त्यांचा बोलायचा सूरही बदलतो. तो जास्त समजून-उमजूनचा, संयत होतो. थांबावं लागणार आहे, हे लक्षात घेतलं की आपोआपच मुलांना त्याची घाई करणं, हात धुऊन त्यांच्या मागं लागणं, कमी होतं. मुलांचं सहकार्य मिळवायला या अतिशय आवश्यक गोष्टी आहेत.

मुलाला बदल हवा असेल तेव्हा त्याच्यासोबत पावलं टाकत जाणं खूप सोपं आहे. पण मूल नाखूश असताना काही बदल घडवून आणण्यासाठी त्याला सोबत घेऊन प्रवास करणं तुलनेनं जास्त अवघड असतं, जिकिरीचं असतं. पालकांना थकवणारं असतं. पण यात एक गंमत असते. एखादी गोष्ट जितकी अवघड, तितकी ती पटकन आटपून जावी असं आपल्याला वाटत असतं. ती तशी अर्थातच होत नाही, कारण ती मुळातच अवघड असते ना! पण म्हणूनच आपण जास्त थकतो. यात मानसिक थकव्याचा भाग खूप असतो. अनेकदा बदलाचा प्रवास सोडून द्यायला हा मानसिक थकवाच कारणीभूत असतो.

म्हणून या प्रवासातले छोटे छोटे टप्पे सर झाले की ते बोलून दाखवणं, त्याला दाद देणं हे मुलांसाठी आणि स्वत:साठीही खूप आवश्यक असतं. अनेक आई-बाबांशी बोलताना ही गोष्ट खूप जाणवते. ‘‘प्रयत्न केले हो आम्ही, पण नाहीच जमलं’’, (उदा. परीक्षेसाठी आधीपासून अभ्यास करणं, रात्री लवकर झोपायचा प्रयत्न करणं, सुट्टीच्या दिवशी सकाळी फिरायला जाणं, या यादीत कुटुंबानुसार असंख्य गोष्टी असू शकतील.) अनेकांबरोबर बोलायची सुरुवात अशी होते. मग कुठवर जमलं, काय काय जमलं, किती दिवस करता आलं, असं विचारत गेलं की लक्षात येतं- अरे हे तर आपण करू शकलो होतो, या इतक्या गोष्टी जमल्या की आपल्याला.

शिखर गाठलं तरच काय ती चढाई यशस्वी, नाही तर सगळीच मोहीम ओमफस्, असं आपण पालकच समजणार असलो, तर मुलांकडूनही आपण तीच अपेक्षा करू लागतो. मागच्या वेळी इथपर्यंत आलो होतो की डोंगर चढताना, तेव्हा फार पुढे जाता आलं नव्हतं, या वेळी आणखी थोडा प्रयत्न करू या, असा सूर असेल तर त्यातून सगळ्यांनाच हुरूप येऊ शकतो. आणि बदलाची प्रक्रिया सुरू राहू शकते.

‘समज उमज’ सदर सुरू करताना सुरुवातीला कठीण वाटलं होतं. अशा स्वरूपाचं सदर कोणतीही शास्त्रीय संकल्पना, परिभाषा न वापरता लिहायचं, बोजड होऊ द्यायचं नाही, रंजक, रोचक तर असायला हवं आणि तेही पाचशे-सहाशे शब्दांत- हे सगळं मला फार अवघड वाटलं होतं. पण प्रत्येक लेखागणिक पालकांनी दिलेल्या प्रतिसादाने हुरूप मिळत गेला. विचारांची आणि कृतीची एक वेगळी दिशा मिळाली असं अनेकांनी कळवलं. मलाही वाटलं- जमतं आहे की आपल्याला. त्यातून लिहितानाच्या प्रवासातले छोटे छोटे टप्पे माझेही सर होत गेलेच की! त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार.

नव्या वर्षांचे संकल्प करताना मग ‘प्रवासातले छोटे छोटे टप्पे’ ही खूणगाठ आपण मनाशी बांधू या का? स्वत:साठी आणि मुलांसाठीही. समजणं ते उमजणं या प्रवासात मग वेगळी गंमत असेल; त्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

mithila.dalvi@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article changes in a journey