News Flash

ह्य़ू हेफनरचा ‘स्त्रीवाद’

अमेरिकेतील स्त्रियांना गर्भपाताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागली.

‘प्लेबॉय’ मासिकाचे कर्ते ह्य़ू हेफ्नर

अमेरिकेतील स्त्रियांना गर्भपाताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागली. त्या खटल्याच्या दहा र्वष आधीपासून ह्य़ू हेफनरच्या ‘प्लेबॉय’ मासिकामध्ये गर्भपात स्वातंत्र्यासाठीचे लेख प्रकाशित होऊ लागले होते. स्त्रीस्वातंत्र्याला त्याने दिलेल्या योगदानाचे त्याच्या समर्थकांनी कौतुक केले. मात्र स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्रीसमता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. स्त्रीसमता नसेल आणि स्त्री ही ‘वस्तू’ होत असेल तर त्या स्त्रीस्वातंत्र्याला काहीच अर्थ राहात नाही. हेफनरच्या ‘प्लेबॉय’चा स्त्रीवादी दृष्टिकोन हा स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य एवढाच होता. ‘प्लेबॉय’मध्ये मॉडेल म्हणून चमकणे किंवा ‘प्लेबॉय क्लब्स’मध्ये बनीज होणे हा काही स्त्रीवाद नाही. हेफनरला स्त्री ही परंपरेतून मुक्त झालेली पुरुषांची कामुक करमणूक करणारी हवी होती, हे नक्की. या मासिकाच्या परिघात नसलेल्या स्त्रियांच्या मते तर त्याने स्त्रीवादी चळवळीचे नुकसान केले. ह्य़ू हेफनरचे नुकतेच निधन झाले त्यानिमित्ताने..

‘प्लेबॉय’चा सम्राट ह्य़ू हेफनर नुकताच गेला. त्याचे ‘प्लेबॉय’ हे मासिक अमेरिकेच्या इतिहासातील एक लक्षणीय गोष्ट होती. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच मासिकाच्या माध्यमातून ‘उघडपणे’ नग्नता बाजारात आली आणि तेव्हापासून ती लोकांना सहजपणे विकत घेऊन बघता येऊ लागली. हे मासिक आणि त्याबरोबरीने ‘प्लेबॉय क्लब्स’सारखे कन्झ्युमर प्रॉडक्ट यातून ह्य़ू हेफनरने प्रचंड पैसे कमवले. एक व्यावसायिक साम्राज्य तयार केले. पुरुषांनी भलेही त्याचं कौतुक करून त्याचा खप ७२ लाखांपर्यंत नेऊन ठेवला असेल, परंतु या मासिकामुळे काहींच्या मते स्त्रीवादी चळवळीचे नुकसान तर झालेच, परंतु एक वेगळाच स्त्रीवाद जन्माला घातला गेला.

साठ-सत्तर वर्षांपूर्वीचा हा काळ, याच सुमारास अमेरिकेतील सांस्कृतिक आणि आर्थिक संदर्भ बदलत होते. हेफनरने ज्या सामाजिक पुरोगामी विचारांची आणि स्त्रीस्वातंत्र्याला अनुकूल विचारांची पाठराखण केली त्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. त्यात ‘प्लेबॉय’चे योगदान होतेच, परंतु बरेच समजतात तसे लक्षणीय नव्हते. त्याच्या निधनाच्या आधीच ते साम्राज्य लयाला गेले होते. त्याच्या निधनानंतर लिहिल्या गेलेल्या लेखांत पुरुष लेखकांनी त्याच्या व्यावसायिक यशाचे, त्याच्या पुरोगामी विचारांचे आणि स्त्रीस्वातंत्र्याला दिलेल्या योगदानाचे खूप कौतुक केले. मात्र ह्य़ू हेफनरची आणि त्याच्या वारशाची वर्तमानकाळातील गरज या विषयावर त्यांच्याकडे काहीच लिहिण्याजोगे नव्हते. त्यामुळे हे लिखाण फक्त भूतकाळात रमणारे होते. याउलट स्त्रीलेखिकांनी मात्र स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिखाण केले. ह्य़ू हेफनरने केलेले स्त्रियांचे वस्तूकरण आणि पैसे टाकून मिळणारा सॉफ्ट सेक्स यामुळे त्यांच्याकडे ह्य़ू हेफनरवर कौतुकाने लिहिण्याजोगे नव्हते.

भारतात तर या मासिकावर बंदी होती. तरीसुद्धा ते चोरून मिळायचे. वाचले आणि ‘पाहिले’ जायचे. परंतु मासिकाचा अमेरिकन संदर्भ भारतात बऱ्याच वाचकांना माहीत होता असे वाटत नाही. नवीन पिढीला या मासिकाबद्दल, ह्य़ू हेफनरबद्दल फारसे माहितीही नसेल. मात्र त्या संदर्भातली स्त्रीवादी मूल्यांची गरज भारतात मात्र आजही आहे. अमेरिकेत आधुनिकतेचे वातावरण सर्वत्र असले तरी त्यावर उजव्या कडव्या ख्रिश्चन गटाचा प्रभाव अजूनही लक्षणीय आहे. त्यावरून पूर्वीच्या काळातील, जवळजवळ ६०-७० वर्षांपूर्व काळातील प्रभावाची कल्पना यावी. सेक्स वा शरीरसंबंध फक्त अपत्य होण्यासाठीच यावा, असं सांगण्यात यायचं. योनिशुचिता ही सर्वोच्च नैतिकता होती. त्यामुळे विवाहपूर्व लैंगिक संबंध निषिद्ध होते. अविवाहित स्त्रियांना गर्भप्रतिबंधक साधने मिळायची नाहीत. गर्भपात बेकायदा होता. नग्नता उघड आणि सहजपणे दिसायची नाही. अशा काळात १९५३ मध्ये मर्लिन मन्रोसारख्या विख्यात ग्लॅमरस अभिनेत्रीचं नग्न छायाचित्र प्रसिद्ध केलं. ‘प्लेबॉय’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या अशा पूर्णत: नग्न स्त्रियांच्या छायाचित्रांनी सर्वत्र खळबळ उडाली. अमेरिकेच्या इतिहासात मासिकाद्वारे प्रथमच उघडपणे नग्नता ‘बाजारात’ आली आणि तेव्हापासून ती लोकांना सहजपणे विकत घेऊन बघता येऊ लागली. ‘प्लेबॉय’ मासिकाबरोबर नग्नता दाखवणारी इतर मासिके, अंकही निघू लागले. परंतु ‘प्लेबॉय’ने आपले वेगळेपण आणि वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मॉडेल्सचा ‘दर्जा’ चांगला ठेवला. या साऱ्या मॉडेल्स सेक्सी आणि दिसायला देखण्या, शरीराने कमनीय, रेखीव असत. त्यांच्या पोझेस कलात्मक असत. त्यामुळे या ग्लॅमरस दिसायच्या. रूढअर्थाने ओंगळ, बेडौल नव्हत्या. मॉडेल्सच्या या कमनीय शरीरयष्टीचा आणि त्यांच्या कलात्मक फोटोग्राफीचा एकत्रित परिणाम असा झाला की स्त्रीसौंदर्याचे मानदंड बदलत गेले. वक्षस्थळे, नितंब, कंबर अमुक अमुक मापाचे आणि आकाराचे असले तरच ती स्त्री सुंदर,आकर्षक, सेक्सी समजली जाऊ लागली. त्याचा परिणाम स्त्रियांमध्ये आपल्या देहाबद्दल न्यूनगंड निर्माण करण्यातही झाला. किंवा आपल्याला असे शरीर हवे, अशा इच्छेतही काही प्रमाणात परिवर्तित झाला. विशेषत: तरुण मुलींमध्ये. पुरुषांसाठी मात्र या मॉडेल्स किंवा हा अंक कामुक आनंद देणारा ठरला. पुरुषांच्या आधी शक्य नसलेल्या कामुक करमणुकीला क्रांती म्हणता येईल का? नग्नतेबरोबर स्त्रीचे वस्तूकरणसुद्धा सुरू झाले. मग या अर्थाने ती प्रतिक्रांती म्हणता येईल का?

वर म्हटल्याप्रमाणे अविवाहित स्त्रियांना त्या काळात गर्भप्रतिबंधक साधने कायदेशीररित्या मिळायची नाहीत. गर्भपात बेकायदेशीर होता. म्हणून स्त्रीस्वातंत्र्यतावादींनी गर्भप्रतिबंधक साधने मिळावी आणि गर्भपाताचा हक्क मिळावा यासाठी ६० आणि ७०च्या दशकात चळवळी केल्या. या काळात ह्य़ू हेफनरने स्त्रीस्वातंत्र्य चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. धर्माने, शासनाने आणि समाजाने लैंगिक नैतिकतेचे न्यायाधीश होऊ नये, हे विचार मांडले. सेक्स हा निषिद्ध विषय आहे, असा समज काढून टाकला. स्त्रियांच्या मनातून गर्भप्रतिबंधक साधने वापरणे आणि गर्भपात करणे याबद्दलची शरम दूर केली. हेफनरने या गोष्टी मिळण्यासाठी स्त्रियांच्या हक्कांचा सातत्याने पाठपुरावा केला. त्याने १९६५ मध्ये ‘प्लेबॉय फाउंडेशन’ स्थापन केले. या फाउंडेशनने सेक्सवर संशोधन करणाऱ्या सुप्रसिद्ध किन्सी इन्स्टिटय़ूटला, बलात्कार पीडितांच्या केंद्रांना, लहान मुलांची काळजी घेणाऱ्या संस्थांना, स्त्रीहक्कांच्या चळवळीला आर्थिक मदत केली. १९७३ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात ‘रो विरुद्ध वेड’ हा घटनात्मकदृष्टय़ा कलाटणी देणारा दिशादर्शी खटला झाला. या खटल्यात स्त्रियांना गर्भपाताचे बहुतांशी स्वातंत्र्य मिळाले. या खटल्यात हेफनरने ‘न्यायालयाचा मित्र’ म्हणून गर्भपात स्वातंत्र्याच्या बाजूने मदत केली. त्या खटल्याच्या दहा र्वष आधीपासून ‘प्लेबॉय’मध्ये गर्भपात स्वातंत्र्यासाठीचे लेख प्रकाशित होऊ लागले होते. स्त्रीस्वातंत्र्याला त्याने दिलेल्या या योगदानाचे त्याच्या समर्थकांनी कौतुक केले. या समर्थकांत काही स्त्रीवादी स्त्रियासुद्धा होत्या.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्रीसमता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. स्त्रीसमता नसेल आणि त्याचबरोबर स्त्री ही ‘वस्तू’ होत असेल तर त्या स्त्रीस्वातंत्र्याला काहीच अर्थ राहात नाही. हेफनरचा स्त्रीवादी दृष्टिकोन हा स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य एवढाच होता. ‘प्लेबॉय’मध्ये मॉडेल म्हणून चमकणे किंवा ‘प्लेबॉय क्लब्स’मध्ये बनीज होणे हा काही स्त्रीवाद नाही. हेफनरला स्त्री ही परंपरेतून मुक्त झालेली पुरुषांची कामुक करमणूक करणारी अशी हवी होती, हे नक्की.

ह्य़ू हेफनरच्या साम्राज्यातील मासिक हा फक्त एक घटक होता. त्याचबरोबर प्लेबॉय क्लब्स, रेस्टॉरंट्स होते. तिथे सशाचे कॉस्च्यूम घातलेल्या वेट्रेस असायच्या. त्यांना ‘प्लेबॉय’ बनीज् (ससे) म्हणतात. छाती, पोट यांना आवळणारा तंग ड्रेस, डोक्यावर सशाचे कान आणि मागे शेपूट असा मानहानीकारक ड्रेस घालावा लागायचा. त्याशिवाय टेबलावर ड्रिंक ठेवताना त्यांना विशिष्ट ‘बनी डिप’ नावाची कामुक पोझ द्यावी लागायची. त्या मुली सेक्स वर्कर नसतात. पण तरीसुद्धा रेस्टॉरंटच्या नियमानुसार आणि टीप मिळावी म्हणून त्यांच्याशी सभ्यतेने वागणाऱ्या ग्राहकाबरोबरच कामुक, वाईट नजरेने पाहणाऱ्या ग्राहकांशीही हसत खेळत बोलायला लागायचे. फ्रीलान्स वार्ताहर असणाऱ्या ग्लोरिया स्टायनेमने ‘न्यूयॉर्क प्लेबॉय क्लब’मध्ये काम केले आणि प्रत्यक्ष अनुभवून या हिडीस बाजू लोकांसमोर आणल्या. इथे पैशाने शरीरसंबंध नसला तरी एक प्रकारचा सौम्य सेक्स विकत घेता यायचा. यात अनैतिक काय असा युक्तिवाद करता येईल. युक्तिवाद वाजवी आहे. वेश्या व्यवसायात पैशाने सेक्स विकत घेता येतो. त्याला बहुतांश समाज अनैतिक समजतात. लैंगिक नैतिकतेची रेषा कुठे मारायची? त्यामुळे वेश्या व्यवसाय आणि सेक्स क्लब्स हे लैंगिक नैतिकतेच्या रेषेच्या कुठे ठेवायचे हे समाजानेच ठरवावे. या क्लब्समध्ये मुली आपणहून जातात. त्यांच्यावर बनी बनण्याची कुणी बळजबरी करत नाही. त्यामुळे याला लैंगिक शोषण म्हणायचे का? याचे उत्तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मिळवावे लागेल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्यांच्या लवचीकतेसाठी साधारणपणे कमीतकमी ४ टक्के बेरोजगारी राहतेच. या ४ टक्क्यांत लोक निघून जात असतात, नवीन येत राहतात. या ४ टक्क्यांतील लोक जिथे संधी असते तिथे पडेल ते काम करायला तयार असतात. तिथे त्यांना कुणी यायची सक्ती करत नाही. क्लब्समध्ये संधी असल्यावर काही बेरोजगार सेक्सी दिसणाऱ्या तरुणी अर्थार्जनासाठी आपणहून जाणारच. असेल त्या पगारावर काम करणार. जर रांगडा भांडवलशाही दृष्टिकोन स्वीकारला तर यामध्ये काहीच वावगे नाही, काहीच शोषण नाही, असे वाटणारच. पण हे योग्य आहे का? ह्य़ू हेफनर एका आलिशान हवेलीत, ‘प्लेबॉय मॅन्शन’मध्ये राहायचा. त्या राजवाडय़ात त्याच्यासोबत वर वर्णन केल्यासारख्या शंभर एक ‘प्लेबॉय बनी’ राहायच्या. तो सहा सहा बनींबरोबर बेडवर झोपतो, असेही सांगितले जाते. त्याच्या कडच्या पाटर्य़ाना सेलिब्रिटीज यायचे, मुक्काम करायचे. पैसा आणि पैशाने विकत घेतलेल्या सेक्सची ही संस्कृती होती. असा सेक्स नैतिक का अनैतिक, हे कुणी ठरवायचे?

‘प्लेबॉय’ची रचना करताना ह्य़ूने आणखी एक चाणाक्षपणा दाखवला. नग्न मॉडेल्सच्या छायाचित्रांबरोबर ‘वैचारिक’ विषय ठेवले. ‘प्लेबॉय’मध्ये विविध विषयांवरील वैचारिक साहित्य प्रसिद्ध व्हायचे. जीवनशैली, कला, राजकारण, साहित्य, विज्ञान आणि मानवी हक्कांचे लढे इत्यादी विषयांवर सातत्याने लिखाण प्रसिद्ध होई. अगदी पुरोगामी साहित्यही होते. त्याने सात्र्, बटरड्र रसेल, मार्टिन ल्युथर किंग ज्यु., माल्कम एक्स अशा बऱ्याच थोर लोकांचे इंटरव्ह्य़ू मिळवले होते. ह्य़ू हेफनरने पुरोगामी विचारांनाही ‘प्लेबॉय’मध्ये स्थान दिले होते. कृष्णवर्णीयांचे हक्क, गे हक्क चळवळ, अभिव्यक्तिस्वातंत्र्य इत्यादी चळवळींना त्याने उचलून धरले. या चळवळींतील नेत्यांशी त्याचे चांगले संबंध होते. त्यामुळे या मासिकाची दखल घेतली जाणे स्वाभाविक होते.

या वैचारिक लिखाणात स्त्रीसमतेला किती महत्त्व होते? नग्नतेवर लिहिताना नग्नता दाखवणे वेगळे आणि प्रत्येक अंकात केवळ नग्नता दाखवणे वेगळे. या मासिकाचा खप १९७२ मध्ये ७२ लाखांपर्यंत पोहोचला. हे मासिक नग्न मॉडेल्सच्या छायाचित्रांबरोबर वैचारिक गोष्टींसाठी विकत घेणारे किती आणि फक्त नग्न छायाचित्रांसाठी विकत घेणारे किती याचे उत्तर इंटरनेट सर्वत्र झाल्यावर मिळाले. तिथे मुबलक ‘पोर्न’ जवळपास फुकट मिळायला लागल्यावर मासिकाचा खप प्रचंड कमी झाला, याचा अर्थ उघड आहे.

‘प्लेबॉय क्लब्स’, ‘प्लेबॉय मॅन्शन’मधील ह्य़ू हेफनरची जीवनशैली, मूल्ये, मासिकातील फक्त स्त्रियांची नग्न छायाचित्रे या पाश्र्वभूमीवर या ‘वैचारिक’ मासिकात स्त्रीसमतेला किती जागा वा महत्त्व होते? मासिकातील या वैचारिक साहित्यात स्त्रीसमतेला स्थान नव्हते. काही वेळा मासिकातील विनोद, व्यंगचित्रे ही स्त्रियांबद्दल असंवेदनशील किंबहुना स्त्रियांना हीन लेखणारी होती. अगदी बलात्कारावरही असंवेदनशील विनोदही यात पाहायला मिळतात. याचं कारण स्त्री ही उपभोग्य वस्तू मानली जात असे. ही व्यंगचित्रे वा विनोद ह्य़ू हेफनरच्या स्त्रियांबद्दलच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतो.

ह्य़ू हेफनरची स्त्रियांबद्दलची व्यक्तव्ये प्रसिद्ध आहेत. एका लीक झालेल्या मेमोमध्ये हेफनर म्हणतो, ‘‘या (स्त्रीवादी) पोरी आपल्या स्वाभाविक शत्रू आहेत. त्यांच्याशी लढायची वेळ आलेली आहे. मला एखादं काहीतरी विनाशकारक (devastating) मिळालं पाहिजे की ज्यामुळे या झुंझार स्त्रीवादींच्या चिंधडय़ा उडायला पाहिजेत.’’  १८१८ मध्ये इंग्लिश कवी शेलीने त्या काळात एक प्रश्न उपस्थित केला होता, ‘‘स्त्री गुलाम असताना पुरुष स्वतंत्र असू शकतो का?’’ यावर हेफनरचे या काळातले उत्तर हे ‘अर्थातच’ असे होते. ‘द नेशन’मध्ये कथा पॉलिट म्हणते की हे उत्तर त्याला समजण्यासाठी महत्त्वाचे आहे. ‘व्हॅनिटीफेअर’ मधील एका मुलाखतीत त्याने कबूल केले होते की तो स्त्रियांना ‘वस्तू’ म्हणून बघतो.

त्याच्या निधनानंतर लिहिल्या गेलेल्या लेखांत बहुतांशी पुरुष लेखकांनी हेफनरच्या व्यावसायिक हुशारीवर, पुरोगामित्वाचे खूप कौतुक केले आहे. स्त्रीचे वस्तूकरण करणाऱ्या त्याच्या विचारांवर त्यांनी  विशेष भर दिलेला नाही. फक्त त्याच्या पुरोगामी विचारांवर आणि स्त्रीस्वातंत्र्य चळवळीला केलेल्या योगदानावर भर देऊन त्याचे व्यक्तिमत्त्व आणि त्याचा वारसा हे संमिश्र आहेत, असे म्हटले आहे. अमेरिकेत स्त्रीसमता नसली तरी स्त्रीस्वातंत्र्य आलेले आहे, कृष्णवर्णी आणि गे लोकांचे हक्क वाढले आहेत. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण त्यांना ह्य़ू हेफनरच्या स्त्रीला वस्तूकरण करणाऱ्या ‘वैचारिक’ वारशाचे वर्तमान काळातील स्थान दिसले नाही.

परंतु बहुतांशी स्त्रीवादी लेखिका त्याच्या पुरोगामी विचारांनी आणि स्त्रीस्वातंत्र्य चळवळीला केलेल्या योगदानाने  हुरळून गेल्या नाहीत. त्यांच्या दृष्टीने स्त्रीला सेक्ससाठी उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आणि पसे टाकून मिळणारा सॉफ्ट सेक्स या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या मते ह्य़ू हेफनरने स्त्रीवादी चळवळीचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्याच्या निधनवात्रेवरील लेखांत स्त्रीलेखिकांकडे त्याच्याबद्दल चांगले लिहिण्याजोगे काहीच नव्हते.

‘इंडिपेन्डंट’ ज्युली बिडेल म्हणाल्या की ह्य़ू हेफनर हा स्त्रियांचा सर्वात मोठा शत्रू होता. कुणीही स्त्रीवादी त्याच्या मृत्यूमुळे अश्रू ढाळणार नाही. ‘द गाíडयन’मध्ये सुझान मूरने त्याचा फारच वाईट शब्दांत उल्लेख केला आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये ब्राऊन मिलर यांनी एक आठवण सांगितली आहे. एकदा त्या आणि  हेफनर एकत्र एका ‘टॉक’वर होत्या. तिथे त्या म्हणाल्या, ‘‘हेफनर हा आमचा शत्रू आहे. स्त्रिया या काही बनी नाहीत, ससे नाहीत, त्या मनुष्यप्राणी आहेत.’’ मग त्या हेफनरला थेट म्हणाल्या की, ‘‘ज्या दिवशी तू तुझ्या पाश्र्वभागावर तशी शेपूट लावून येशील तेव्हा..’’

पशाचे सामथ्र्य खूप पूर्वीपासून आहे. आधीच्या समाजव्यवस्थेत योग्य वा अयोग्य रूढींचा, नतिकतेच्या कल्पनांचा पशांच्या सामर्थ्यांवर निदान वचक होता. भांडवलशाही ही आधीच्या समाजव्यवस्थेच्या तुलनेने खूप पुरोगामी आहे. कित्येक विचार आणि मूल्ये उद्दात्त आहेत. परंतु भांडवलशाहीत पशाचे सामथ्र्य प्रचंड वाढले आहे. त्यामुळे पसे मिळवताना मूल्यांना मुरड घातली जाते, मूल्यांची तोडफोड केली जाते. समाजात काय स्वीकारले जाईल, कशाला नतिक म्हणायचे हे पशाने बदलता येते. रांगडय़ा भांडवलशाही दृष्टिकोनातून यामध्ये काहीच वावगे नाही. ‘ह्य़ू हेफनर आणि प्लेबॉय’ ही या दृष्टिकोनाची मूर्तिमंत रूपे आहेत. अशा दृष्टिकोनातील नतिकता हा ह्य़ू हेफनरने मागे ठेवलेला वारसा आहे.

– डॉ. प्रमोद चाफळकर

pramod.chaphalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 5:08 am

Web Title: articles in marathi on hugh hefner
Next Stories
1 नवदुर्गांच्या कार्यकर्तृत्वाला संगीतमय सलामी
2 मांगल्याचा दिवा अन् विवेकाचं तोरण
3 उधारीवरचे बालकल्याण!
Just Now!
X