सेल्फी काढण्यात वाईट काहीच नाही. आपण सेल्फी का काढतो याचं उत्तर आणि आपण रोज आरशात का बघतो याचं उत्तर एकच आहे. आपण या जगात आहोत, आपलं अस्तित्व आहे याची जाणीव लहानपणापासून इतर लोक आपलं नाव घेऊन, हाक मारून, आपल्याशी संवाद करून देत असतात. आपण ‘सामाजिक प्राणी’ आहोत.

रोजचं वर्तमानपत्र उघडलं की एखादी तरी बातमी नजरेस पडतेच आहे – नदीमध्ये होडीतून जात असताना सेल्फी काढताना होडी उलटली आणि अकरा तरुण पाण्यात बुडून मरण पावले. कुणी एखाद्या धबधब्याखाली उभे राहून युनिक सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात पाय घसरून पडले आणि वाहत गेले. कुणाचा उंच कडय़ाच्या अगदी टोकावर उभे राहून सेल्फी काढताना तोल जाऊन दरीत पडून मृत्यू झाला. कुणी खडकावर बसून सेल्फी घेत होते आणि एक मोठी लाट आली आणि खोल पाण्यात घेऊन गेली. कुणी उंच इमारतीच्या गच्चीच्या कठडय़ावर उभे राहून सेल्फी काढताना वरून खाली पडून मरतो. दरवेळी स्थळ, काळ आणि नावे वेगवेगळी असतात. शेवट सारखाच. सेल्फीच्या नादात मृत्यू येणं! मग वाटतं, का करतात असं लोक?

Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

सेल्फी काढणं – स्वत:चा फोटो घेणं यात वाईट वा विकृत काहीच नाही. आपण सेल्फी का काढतो याचं उत्तर आणि आपण रोज आरशात का बघतो याचं उत्तर एकच आहे. आपण या जगात आहोत, आपलं अस्तित्व आहे याची जाणीव लहानपणापासून इतर लोक आपलं नाव घेऊन, हाक मारून, आपल्याशी संवाद करून देत असतात. आपण ‘सामाजिक प्राणी’ आहोत. आजूबाजूला वेगवेगळ्या नातेसंबंधामधली माणसं आपल्याला आपण ‘माणसात’ आहोत याची जाणीव करून देतात आणि ही जाणीव आपल्या मनात एक भावनिक सुरक्षितता निर्माण करते. आपल्या मनाच्या स्वास्थ्यासाठी अशी भावना मदतही करते. वेगवेगळ्या स्तरांवर निर्माण होणारी आपली नाती आपल्या ‘आपण एक आहोत’ची जाणीव देतात. आपण कुणाला हवे आहोत, आपल्यावर लोकांचे प्रेम आहे, आपल्याबद्दल लोकांना आदर वाटतो, लोक आपली काळजी करतात, आपल्याबरोबर भावनिक आणि बौद्धिक गोष्टींचे आदानप्रदान करतात या साऱ्यांतून आपल्या जगण्याला आणि मुख्य म्हणजे आपल्या असण्याला अर्थ निर्माण होत असतो. हे सारं आपल्याला कळतं ते लोकांबरोबरच्या संवादातून, लोकांच्या कृतींमधून, लोकांच्या देहबोलीतून आणि लोकांच्या डोळ्यांमधून! डोळ्याला मनाचा आरसा म्हणतात. कारण मनातले भाव आणि मनातल्या भावना डोळ्यांमधून बुबुळांच्या आकुंचन – विस्फारण्यातून आणि त्यामुळे होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनातून, दिसणाऱ्या डोळ्यांच्या आकारातून आपण जाणू शकतो. वरकरणी खूप शांत वाटणारी व्यक्ती नकळत हात चोळत असेल आणि डोळे आकुंचित करत असेल तर तिची अस्वस्थता आपल्याला जाणवते. डोळे मिटून ज्या प्रकारे मान हलते त्यावरून व्यक्ती हताश आहे, का वैतागली आहे, का तल्लीन झाली आहे हे कळू शकतं.

आपल्या ‘असण्याची’ जाणीव असं आजूबाजूची माणसं करून देतात तेव्हा त्यांच्या लेखी आपण कसे आहोत – म्हणजे आपल्याबद्दल त्यांना काय वाटतं, ते आपल्याला कसे आणि काय समजतात, ते आपली किती आणि कशी किंमत करतात हेही आपल्याला समजत असतं. आपली सामाजिक प्रतिमा नेमकेपणाने कळून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. ही सामाजिक प्रतिमा सकारात्मक, सदृढ, सबळ असावी असं प्रत्येकाला वाटतं आणि ती तयार करण्यात आपल्या वागण्या-बोलण्याचा, आपल्या कृतींचा कर्तृत्वाचा मोठा वाटा असतो. सेल्फी काढून आपण स्वस्थ राहात नाही. ती आपण ‘आपल्या’ समजणाऱ्या सर्वाना ताबडतोब पाठवतो आणि त्यांनी लाइक्स पाठवले की धन्य होतो! आपली सामाजिक प्रतिमा चांगली करण्याचा हा एक नव्या तंत्रज्ञानाने दिलेला छान मार्ग आहे.

जेव्हा या साऱ्याचा अतिरेक होऊ लागतो तेव्हा समस्या तयार होते. हळूहळू सेल्फी काढण्याचं व्यसन लागतं आणि आलेल्या लाइक्सवर आपल्या असण्याचं सार्थक ठरतं. आपण असे हळूहळू सतत सेल्फी  घेण्याच्या, ती घेताना काही तरी आगळंवेगळं करून ‘मोठी अचिव्हमेंट’ केल्याच्या आहारी जातो. जणू लोकांनी – पुष्कळ लोकांनी लाइक केलंच पाहिजे या अट्टहासाने आपण ग्रासतो. त्यासाठी वाट्टेल ती साहसं करतो. अशी की जीव जाण्याचेही भान राहात नाही!

खरं तर जगण्याची प्रेरणा ही सर्वात मोठी प्रेरणा असते. जगण्यासाठी माणसं वाटेल तेवढी धडपड करतात, श्रम करतात, मेहनत करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सापडलेली माणसं प्रचंड धैर्याने जगण्याच्या प्रेरणेमुळे टिकून राहतात. प्रतिकूल परिस्थिती आपल्या अथक प्रयत्नांनी बदलतात. अनुकूलतेकडे प्रगती करतात. ही माणसं आपल्यातलीच असतात, पण त्यांना आत्मविश्वास असतो. स्वत:बद्दल आदर असतो. यांचा सेल्फ एस्टीम – स्वमूल्य मोठे असते आणि यांची स्वप्रतिमा सुदृढ, बलवान असते. यांचे मनोबल उत्तम असते.

जे स्वत:ला दुबळे समजतात, ज्यांना आपण ‘नगण्य’ आहोत असं वाटतं, ज्यांना स्वत:चा आदर नसतो आणि ज्यांची स्वप्रतिमा ही नकारात्मक आणि अशक्त असते अशी माणसं भावनिकदृष्टय़ा इतरांवर खूप जास्त अवलंबून राहतात. जसं घाबरलेल्या माणसाला सारखे धीराचे शब्द हवे असतात, तसंच दुबळ्या मनाच्या माणसांना, नकारात्मक स्वप्रतिमा असणाऱ्यांना इतरांचे लाइक्स हवे असतात. मेरिट नसणारी, गुण कमी असणारी व्यक्ती अधिक आक्रमक असते. तसंच अकर्तृत्ववान व्यक्ती येनकेनप्रकारेण ‘तुम्ही मला चांगले म्हणा’, ‘तुम्ही मला कर्तृत्ववान म्हणा’ असा आक्रोश वागण्यातून करत असते. त्यासाठी वाटेल ते धाडस करून सेल्फी घ्यायलाही मागे-पुढे पाहात नाही.  ‘मी इथे गेले/ गेलो’, ‘मी हे असं खाल्लं’ – असा आपल्या कृतींचा लेखाजोखा सेल्फी काढून आणि ती इतरांना पाठवून माणसं करतात तेव्हा ती त्या कृतींमधून स्वत:ला काय मिळावं याचा विचार कमी करतात किंवा करतही नाहीत. इतरांच्या दृष्टीने आपण किती आणि कसे ‘भारी’ ठरतोय याचाच विचार असतो. असं इतरांवर असलेलं भावनिक अवलंबित्व माणसाला आणखी दुबळं-परावलंबी करतं. जगताना वावरताना आजूबाजूच्या माणसांचे, परिस्थितीचे भान असणे गरजेचे असते. त्याचेही भान सेल्फी घेताना माणसांना राहात नाही. इथे विरोधाभास असा की इतरांच्या नजरेत स्वत:च्या जगण्याचे मूल्य वाढवण्याच्या प्रयत्नात माणसं जीवच गमावून बसतात!

आणखी एक गोष्ट आहे ‘नार्सिसिझम’ची! नार्सिसिस राजाने एकदा झऱ्याकाठी पाणी पिताना स्वत:चे प्रतिबिंब पाहिले आणि त्या प्रतिबिंबाच्याच प्रेमात तो पडला. आरसा आपल्याला आपल्या दिसण्याची यथार्थता दाखवून आपल्या असण्याचीही ग्वाही देतो. सेल्फीही तेच काम करते, मनाच्या आरशातली स्वप्रतिमा जशी सुदृढ, सकारात्मक हवी तसंच प्रत्यक्षात मिळालेला देह आपण कसा ‘ठेवतो’ व्यायामाने, खाण्याने, चवीने, बांध्याने, कपडय़ांनी, मेकअपने आणि चेहऱ्यावरील भावाने – हे सारे कळणेही महत्त्वाचे असते. कारण त्याची वास्तववादी जाणीव आपल्याला त्यात गुणात्मक सुधारणा करण्यासाठी मदत करते. असं असलं तरी आपण आरशात कारणाने बघतो. सकाळी तयार होताना, बाहेर जाताना, विशिष्ट कपडे वा जामानिमा केल्यास, कुठे काही दृश्य भागावर लागलं तर! येता-जाता सारखे आरशासमोर उभे राहात नाहीत. वयात येताना, तरुणपणी स्वत:च्या दिसण्याबाबत अधिक सजग झाल्यास आरशात पाहण्याचे प्रमाण थोडे साहजिकच वाढते. ठीक आहे. पण आपण स्वत:च्याच प्रेमात नार्सिसिक होत नाही. आपण एकेका माणसाला पकडून आरशासमोर स्वत:बरोबर उभे करून विचारतो का की ‘सांग मी कसा दिसतो / दिसते?’ कुणी असं करू लागलं तर ‘काय हा वेडेपणा’ असंच लोक म्हणतील! मग सतत सेल्फी काढायची, ती लोकांना दाखवायची – याला तरी आपण दुसरं काय म्हणू?

तात्पर्य – अधूनमधून मस्त सेल्फी काढावी. अगदी नक्की ‘आपल्या’ असणाऱ्यांना कधीतरी पाठवावी. पण सेल्फी काढण्यासाठी वाटेल ती रिस्क घेण्याने आपला चेहरा बदलणार नाही. सतत सेल्फी काढण्यानेही बदलणार नाही. जगण्यासाठी आणखी दुसऱ्या सकारात्मक आणि रचनात्मक प्रेरणा देणाऱ्या कृती करता येतात की!

अंजली पेंडसे manobal_institute@yahoo.co.in