भावनिक आणि वैचारिक गोंधळ सुरू झाला की उत्तरासाठी कोणाकडे जावे, याबाबतीत माणूस गोंधळतो. अनेकदा तो दैववादाकडे वळतो. त्या देवाचाच विस्तार म्हणजे गुरू-बाबांकडे त्याची पावले वळतात. आर्त भक्ताला आध्यात्मिक गुरूमध्ये देव दिसतो; पण ‘खरा’ गुरू कोण यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आपल्याच संतांनी, विद्वानांनी सांगितली आहेत. विनोबा म्हणतात, भक्तीला अवांतर फळांचे फाटे फुटू न देणे ही गुरूची जीवनकला. ज्ञानेश्वर म्हणतात, विकारांच्या ऊर्मीनी झाकोळून न जाणारा तो गुरू. तर ‘सत्य, असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता.’ हे तुकोबावचन आहे. रामकृष्ण म्हणतात, ‘आत्मज्ञानाची नदी वाहते आहे. साधकाला त्याचा योग्य वापर करायला मिळावा यासाठी बांधलेला घाट म्हणजे गुरू.’ तर विवेकानंद एके ठिकाणी लिहितात, आम्ही आमच्या गुरूला परमेश्वरसदृश (पण) माणूस मानतो. कर्मकांडामध्ये अडकला,  इतरांना अडकवले तो अव्वल प्रतीचा आध्यात्मिक गुरू नव्हे. आध्यात्मिक गुरुशोधाची मार्गदर्शक तत्त्वे सांगणारा हा लेख..

आपण सारी माणसं! बुद्धीने आणि अनुभवाने कमी-जास्त कसेही असलो तरी ‘गोंधळून जाण्याचा’ आणि ‘संभ्रमात पडण्याचा’ हक्क सर्वासाठी आहेच. त्या त्या विषयाप्रमाणे आणि प्रसंगाप्रमाणे एकदा का आपण गडबडलो, की आपल्या लक्षात येतं की, हे एकटय़ाला झेपणारं नाही.. मदत हवी बुवा! आपण अहंकार बाजूला ठेवतो. विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीमध्ये शिरतो आणि विषयाप्रमाणे, वकुबाप्रमाणे मदत शोधायला निघतो.. डोक्यातला गोंधळ निस्तरणारे उत्तर हवे असते आपल्याला. आरोग्याची समस्या असेल तर डॉक्टर, कायद्याची असेल तर वकील, टॅक्सची असेल तर सीए.. वगैरे!

When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

हे सारे आपले कन्सल्टंट अर्थात सल्लागार! त्यांना आपण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रापुरता आदर देतो.. प्रामाणिक आदर देतो; पण त्यांची पूजा वगैरे करत नाही, स्तोम माजवत नाही. (सहसा तेही असे करवून घेत नाहीत, पण अपवाद आहेतच.) पण भावनिक आणि वैचारिक गोंधळ झाला की कोणाकडे जावे याबाबतीत आपण जास्तच गोंधळतो. समुपदेशकाकडे जाऊ  की देवळात?.. ज्ञानेश्वरी वाचू की योगाभ्यास करू?.. नवस करू की मनोविकारतज्ज्ञाची औषधे घेऊ?.. गोंधळल्यामुळे असेल, पण त्याचे सोपे उत्तर असते.. सगळेच ‘करून बघू.’ या यादीमध्ये तऱ्हेतऱ्हेचे ज्योतिषी आणि आध्यात्मिक (म्हणवणारे) गुरू आपोआप समाविष्ट होतात. आशा नावाचा धागा माणसाला कधीकधी प्रयत्नवादाकडून दैववादाकडेसुद्धा वळवतो.. दैववाद म्हणजे ‘तत्काळ उत्तराची मनोमन इच्छा.’ प्रयत्नांना यश न मिळाल्याने माणसे विकल होतात. अन्यायाची दाद न लागल्यामुळे निराश होतात. परिस्थितीच्या हट्टापुढे हतबल होतात. अशा वेळी अनेकांना देवाधर्माची आठवण येते आणि जणू देवाचेच एक्स्टेन्शन म्हणून मग गुरू-बाबांकडे पावले वळतात.

जीवनातील हरघडीच्या प्रश्नांना तोंड देताना आलेल्या मेटाकुटीचे उत्तर देणे हे आध्यात्मिक गुरूचे कामच नाही हे मूळ निर्विवाद सत्य कुणी लक्षात घेत नाही. देव आणि धर्माकडे आपण वळतो, कारण इतके प्रयत्न करूनही काही होत नाही, तुझ्या कृपेने परिस्थितीमधले काही घटक आण रे ताब्यामध्ये देवराया! अशी आर्त साद भक्त घालतो.

आज आपला विषय देव-धर्म नाही. अशा व्यक्तीने देवाचा धावा करणे किती विवेकाचे हाही मुद्दा नाही. तर या आर्त भक्ताला आध्यात्मिक गुरूमध्ये देव दिसतो हा आहे. म्हणून पहिले मार्गदर्शन तत्त्व असे की, देव आणि आध्यात्मिक गुरू यामध्ये भेद करायला शिकू या. गुरूकडे जाऊन विचारांची दिशा शिकायची आणि देवाकडे मांडावे ते भावनिक गाऱ्हाणे. जे आध्यात्मिक गुरू हा भेद पुसण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे शंकायुक्त, संशयाने पाहावे. म्हणजेच, मी देवसदृश आहे असे म्हणून जे गुरू कर्मकांडे करायला सांगतात, माणसाच्या प्रश्नांची ‘उत्तरे’ देण्याचा प्रयत्न करतात ते गुरू म्हणून निवडायला नकोत. ‘आर्त’ अवस्थेमध्ये मानसशास्त्रज्ञ-मनोविकारतज्ज्ञ हा ‘सल्लागार’ जास्त योग्य. अर्थार्थी भक्त असतो आर्तचेच पुढचे पाऊल. त्याचा विषय देण्याघेण्याचा असतो. माझी इच्छा पूर्ण करावी आणि तसे झाल्यास मी तुम्हाला अमुक एक वस्तू देईन. सगळे नवस यात येतात. सगळ्या अर्थार्थी मंडळींनी तूर्तास फक्त देवावरच सरळ लक्ष केंद्रित करावे (त्या त्या वारी). त्यासाठी गुरू-बाबांकडे कशाला यायचे? नवस पुरे करण्यासाठी जनावरांचे बळी देणाऱ्यांवर गाडगेबाबा कसे बरसायचे ते एकदा या लोकांनी जाणून घ्यायला हवे; पण इथेही अनेक गुरू-बाबा मंडळी बेफाम वसुली करतात. वर म्हणतात की, भक्तांनी स्वेच्छेने दिले. स्वत:ला आध्यात्मिक गुरू म्हणवणारी मंडळी ‘चमत्कार’ करतात. उदीपासून अंगठीपर्यंत वस्तू काढून दाखवतात. चमत्कारावर ज्याचा भर तो खरा गुरू नव्हे, अशी भूमिका महात्मा गौतम बुद्धांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेकांनी नोंदवली आहे, त्याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो.

मग उरतात जिज्ञासू आणि ज्ञानी असे भक्तांचे दोन प्रकार. खरे तर ‘आध्यात्मिक गुरू’ याची जरुरी या गटांना आहे. या दोन गटांतील भक्त आत्मविकासाच्या मार्गावरचे सल्लागार शोधत आहेत. या विषयावर बोलू शकतील असे लोक व्यवस्थापन क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, मानसशास्त्र, विज्ञान, कला अशा क्षेत्रांतही आहेत; पण तत्त्वज्ञान, उपासना धर्म यांचा विशेष अभ्यास असलेल्यांना आपण आध्यात्मिक गुरू म्हणू. ग्रांथिक अभ्यास असेल किंवा नसेल, पण जगण्याबद्दलचे चिंतन मात्र सखोल हवे. उक्ती आणि कृतीमध्ये एकवाक्यता हवी. म्हणजेच या गुरूच्या ज्ञानाची लांबी, रुंदी आणि खोली तपासल्याशिवाय त्याला गुरुपद देऊ  नये. ‘लोकप्रियता’ हा काही गुरुशोधनाचा निकष नव्हे. ‘सत्य, असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता.’ हे तुकोबावचन मनात वाचावे. अत्यंत खुळे, मूर्ख, आगाऊ  प्रश्न विचारले तरी चालतील. विनाअट स्वीकार आणि अकृत्रिम स्नेह असेल गुरूकडे तर त्याची आपोआप परीक्षा होईल.

आता हे सारे तपासायचे तर आपली उंची तेवढी हवी आणि ती असती तर आपणच गुरुपदाला नसतो का पोहोचलो. तर मग गुरूची निवड करण्याचे सहजसोपे असे काय नियम असावे? (यापुढे गुरू हा शब्द आध्यात्मिक या अर्थाने घ्यायचा.) मी नियम तयार केले तर माझ्या क्षमतेपासूनच वाद निर्माण व्हायचा. म्हणून मी गुरुनिवडीसाठी गीता आणि ज्ञानेश्वरीलाच आधार म्हणून वापरतो आहे. त्यामध्ये योग्याचे म्हणजेच गुरूचे वर्तन कसे असावे याचे वर्णन आहे. गीता आणि ज्ञानेश्वरीच्या अशा अधिकाराबद्दलही वाद होऊ शकतो(?) पण, हे दोन्ही ग्रंथ आज टिकून आहेत इतकी जमेची बाजू तूर्त ध्यानात ठेवू.

गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील सहाव्या श्लोकामध्ये गुरू कसा नसावा, हे सांगितले आहे तर सातव्या श्लोकात तो कसा असावा हे सांगितले आहे. आपण गुरू कसा असावा याने सुरुवात करू. ज्ञानेश्वरांनी तिसऱ्या अध्यायातल्या ओवी ६८ ते ७५ मध्ये हे वर्णन केले आहे. त्यातले प्रमुख मुद्दे असे. अशी ज्ञानाने अधिकारी व्यक्ती बाह्य़त: चारचौघांसारखी साधारण दिसणारी असावी. (बाह्य़ तरि रुढु लौकिकु जैसा) सूक्ष्मपणाने पाहिल्याशिवाय त्याचे यथार्थ स्वरूप कळणार नाही. म्हणूनच त्याचे नीट अवलोकन करावे, चर्चा करावी, प्रश्न विचारावे.

असा गुरू कमलपत्राप्रमाणे आहे तो पाण्यात असूनही पाण्यात भिजत नाही. मोहाने व्याप्त होत नाही. इच्छेने ओढला जात नाही. त्याचे संपूर्ण लक्ष सत्यशोधनावर असते. स्वत:वर नाही. विषाचा प्याला रिचवताना सॉक्रेटिस नावाचा गुरू शिष्यांना म्हणाला, ‘‘I would ask you to be thinking of the truth and not of Socrates.’’ जसे पाण्याच्या संपर्काने सूर्याचे प्रतिबिंब सहजपणे पाण्यात पडते त्याप्रमाणे तो लोकांच्या सहज सहवासात असतो. त्यांच्यासारखाच दिसतो.

म्हणजेच बाह्य़ मान-सन्मानामध्ये या गुरूला जराही रस नसतो. असे म्हणतात की, शिवाजी महाराजांनी तुकारामांना पालखीचा मान देऊ  केला तर तुकाराम म्हणाले, ‘‘हे का माझ्या भक्तीचे फळ? मानसन्मानाचे फळ माझ्या हातावर ठेवून, देवा, तू तर मला तुझ्यापासून दूर लोटतो आहेस. जाणोनि अंतर, टाळिसील कटकट; तुज लागली हे खोडी, पांडुरंगा बहु कुडी.’’

याचा भावार्थ आपल्याला विनोबा गीता प्रवचनांमध्ये सांगतात, ‘‘देवा, तुझी खोड बरी नाही. तू असली चिरीमिरी देऊन मला घालवू पाहात असशील. याची ब्याद दारातून एकदाची जाऊ  दे, असे मनात म्हणत असशील, परंतु मी कच्चा नाही. मी तुझे पाय घट्ट धरून बसेन.’’ विनोबा म्हणतात, भक्तीला अवांतर फळांचे फाटे फुटू न देणे ही गुरूची जीवनकला.

आध्यात्मिक गुरूचे हे महत्त्वाचे लक्षण म्हणू या. हा गुरू कधीही आपले विहित कर्म करणे सोडत नाही. म्हणजे त्याची उक्ती आणि कृती यात अंतर नसते. (मानवी पातळीवर ‘कमीत कमी अंतर’ म्हणू या.) आध्यात्मिक गुरूने समाजातील दंभावर प्रहार करावा ही अपेक्षा आहे. दंभ म्हणजेच ‘दाखवायचे दात.’ खरे तर या गुरूचे आचारविचार निर्मळ असल्यामुळे त्याला बालसदृश निरागसतेचे वरदान असते.               ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे तर ‘कर्माच्या ठायी व्यवहारात वागत असता तेथल्या विकारांच्या ऊर्मीनी झाकोळून जात नाहीत.’ (ज्ञानदेवी. पान १४६). ‘विकारांच्या ऊर्मीनी झाकोळून न जाणारा’ हे आपण गुरूचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून घ्यायला हरकत नाही.

अरेच्च्या, इतकी कठीण तत्त्वे केलीत तर एक तरी ‘पंचतारांकित’ गुरू त्यात बसतील का? न बसोत.. पण ‘मार्केटिंग’ न करणारा गुरूच कालौघात टिकतो त्याच्या विचारांमुळे. निसर्गदत्त महाराज म्हणून एक असे ‘सामान्य’ गुरुजी होते. अर्थातच ते रूढार्थाने लोकप्रिय कधीच नव्हते. प्रख्यात चित्रकार गायतोंडे आणि निसर्गदत्त महाराज यांच्या संभाषणाचा लेख गायतोंडे यांच्यावरच्या पुस्तकात आहे. आपापल्या क्षेत्रातल्या दोन अधिकारी व्यक्ती कमीत कमी शब्दांमध्ये एकमेकांशी कशा बोलतात याचे ते उत्तम उदाहरण आहे. पिकासोचे एक वाक्य आहे, ‘‘(अभिजात) कलेला भूतकाळ आणि भविष्यकाळ नसतो. जर कलाकृती वर्तमानामध्ये अनुरूप नसेल तर तिला कलाकृती का म्हणायचे?’’ आध्यात्मिक गुरूंच्या विचारांबद्दल असेच म्हणता येईल. गुरूचा अभ्यास ग्रांथिक असेलही, पण जीवनानुभव हा त्याहीपलीकडे नेणारा असेल. ज्ञानेश्वरांच्या काळीसुद्धा तत्कालीन ‘दंभयुक्त गुरुछाप नट’ होते असे वाटणारे शब्द त्यांनी लिहिले आहेत.

तयां कर्मत्यागु न घडे, जें कर्तव्य मनी सांपडे;

वरी नटती ते फुडे, दरिद्र जाण.

ज्ञानेश्वरीच्या दांडेकर प्रतीमधले गद्यरूप असे; त्यास कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्यांच्या अंत:करणामध्ये (स्वत:प्रति) कर्तव्यबुद्धी (टिकून) असते. असे असूनही बाह्य़त्कारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात, ते खरोखर दैन्य आहे.

आपले अनेक प्रस्थापित गुरू समाजसेवेचा खोटा कळवळा आणतात, की तो त्यांचा प्रामाणिक वसा असतो हे काळ ठरवतोच आहे. समाजसेवा हा मुलामा असेल तर उतरून जाईल. रामकृष्णांचे मिशन असेल तर शंभरी पार करेल.. गुरूंबद्दलची रामकृष्णांची एक सोपी व्याख्या आहे, ‘‘आत्मज्ञानाची नदी वाहाते आहे. साधकाला त्याचा योग्य वापर करायला मिळावा यासाठी बांधलेला घाट म्हणजे गुरू.’’

विवेकानंद एके ठिकाणी लिहितात, आम्ही आमच्या गुरूला परमेश्वरसदृश (पण) माणूस मानतो. कर्मकांडांमध्ये अडकला, इतरांना अडकवले तो अव्वल प्रतीचा आध्यात्मिक गुरू नव्हे; पण सहजकृतीने काम करणारा गुरू सदैव कार्यरत असेल.

तुकारामांच्या शब्दांत,

आधी होता संतसंग, तुका झाला पांडुरंग;

त्याचे भजन राहिना, मूळ स्वभाव जाईना.

अशी ही निरलस सहजस्थिती असेल तर या गुरूकडून शिकणारे साधक-विद्यार्थी; त्याचे अनुयायी, समर्थक व्हायला हवेत अशी अट असणार तरी कशाला?.. ज्ञानाचा आदर करा, पण व्यक्तिशरणता नको, असेच हा गुरू म्हणणार. आत्मविकासाची दिशा दाखवणारे एक माध्यम म्हणून स्वत:कडे पाहाणार. माझ्या बालपणामध्ये मला स्वामी रामानंद तीर्थ यांचा सहवास मिळाला. ते लोकनेते होते. अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात कधी राहायला येत. माझे वडील प्राचार्य होते. आमच्या घरून स्वामीजींना डबा जायचा. कधीकधी संध्याकाळी ते माझ्याशी गप्पा मारायचे. माझ्या सर्व मूर्ख प्रश्नांना हसतमुखाने उत्तरे द्यायचे. हा माणूस किती मोठा हे मला खूप वर्षांनी कळले.. ‘‘तुम्ही गांधीजींशी बोलला आहात?’’पासून ‘‘हा निजाम एवढा श्रीमंत कसा झाला?’’ अशा प्रश्नांना त्यांनी दिलेली तपशीलवार उत्तरे अजून माझ्या मनात आहेत.

सदगुरुंनी द्यावे, दासा एक दान.

माझे दासपण नष्ट होवो.

सदगुरु वांचोनी सापडेल सोय,

तेव्हा जन्म होय धन्य, धन्य.

विंदा करंदीकर आपल्याला गुरू कसा असावा या विषयातले एक मार्गदर्शक तत्त्वच या ‘सदगुरुवाचोनी सापडेल सोय’ या कवितेतून सांगत आहेत. गुरूच्या विचारांनी आत्मबोधाचा स्वावलंबी प्रवास सुरू व्हावा, परावलंबित्वाचा नव्हे. गुरूने दिलेल्या पाथेयाचा रियाज करावा. त्या आशयाची मानसपूजा करावी सुरुवातीला. नंतर त्यात भर घालावी स्वत:च्या चिंतनाची, अनुभवाची. ज्यांनी ‘सत्यज्ञान’ वाढवले ते सारेच गुरू असे म्हणत. खरे तर करंदीकरांनी ‘आध्यात्मिक’ गुरूंची कक्षा खूपच वाढवली आहे. असे ही कविता पूर्ण वाचली तर लक्षात येईल.

या लक्षणचर्चेच्या समारोपामध्ये, योग्याचे (म्हणजेच खऱ्या गुरूचे) वर्णन करताना ‘मुक्त’ आणि ‘आशापाशरहित’ असे दोन शब्द ज्ञानेश्वरांनी वापरले आहेत. आध्यात्मिक गुरू हा दुराग्रहांपासून आणि पूर्वग्रहांपासून मुक्त असावा. भविष्याची भीती आणि भूतकाळाचे ओझे त्यांच्यावर नसावे. कर्माच्या फळाच्या मालकीतूनही तो मुक्त आहे.

‘आशा’ म्हणजे अपेक्षा. अपेक्षांचा ‘पाश’ होणे म्हणजे हट्टाग्रह.. अशा हट्टाग्रहांपासून रहित.. म्हणजे कसा.. तर फक्त आपल्याजवळचे ज्ञानकण वाटत जाणारा.. ‘गुरू’ म्हणजे गुरू नावाची भूमिका नाही. तर गुरू नावाचे अस्तित्व.

गेली काही वर्षे मी ज्यांच्याकडून वेदान्त तत्त्वज्ञान शिकतो त्यांची नावे आहेत निमा आणि सूर्या. निमा अमेरिकेत यूएनओमध्ये पूर्वी काम करायची. सूर्या एका प्रख्यात व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात शिकवतो. त्याची पीएच.डी. आहे ‘फार्मेकोकायनेटिक्स’ मध्ये.. मी त्यांना नावाने हाक मारतो आणि ते मला.. तत्त्वज्ञानाचा अभ्यास तर सुरेख आहेच, पण पॉवरपॉइंट्स, शास्त्रीय संदर्भ, फिल्म्स वापरून ते शिकवतात. कधी चार-पाच-सहा दिवसांची दहा-पंधरा विद्यार्थ्यांची निवासी शिबिरे असतात. सकाळी नऊ  ते रात्री नऊ  जोरदार बौद्धिक कार्यक्रम असतो. प्रत्येक जण ऐच्छिक गुरुदक्षिणेची रक्कम देतो. व्यवहार संपला.. हे दोघे मित्र म्हणून घरी येतात. आम्ही आइस्क्रीम खातो. मी आणि सूर्या नर्मविनोद करत एकमेकांची आणि सर्वाची ‘खेचतो’ ..पण सत्र सुरू झाले की आम्ही विद्यार्थी बनतो.. अर्थात तिथे भरपूर चर्चा असतात. एकदा हे दोघे मला म्हणतात, ‘‘आम्ही तुझ्याकडे को-फॅकल्टी म्हणून पाहातो, कारण तू वेगळे इनपूट्स देतोस.’’ ..गुरूंनी (त्यातही आध्यात्मिक) विद्यार्थ्यांला एवढे चढवणे म्हणजे! पण मुद्दा असा की, ज्ञानचिंतनाची पातळी उत्कृष्ट असूनही आढय़ता नाही.. ‘फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही’ ही तुकोबांची भूमिका असते त्यांची. शिबिराच्या शेवटच्या दिवशी मी त्यांना नमस्कार करतो. निमा माझे हात हातात घेते आणि सूर्या मी नमस्कार करण्याआधीच मला मिठी मारतो. आमच्या वर्गामध्ये कुठेही उपासनेची कर्मकांडे नसतात.. ना आरती, ना पूजा!

सूर्या म्हणतो, ‘‘प्रकाश हा माझा सहजधर्म आहे. माझ्याजवळ प्रकाश नसेल तर काय असेल? मी प्रकाश देतो हे मला माहीत नाही. मी असणे म्हणजेच प्रकाश. प्रकाश देण्याच्या क्रियेचे कष्ट मला नाहीत. मी काही करत आहे असे मला वाटत नाही.’’ (विनोबांचे शब्द, गीता-प्रवचने, अध्याय ५, अधिकरण १८). सूर्यासाठी जसे प्रकाशदान स्वाभाविक आहे तसेच गुरूचे असावे. विचार आणि अनुभवाचा प्रकाश त्याच्या साऱ्या असण्यातूनच अनुभवाला यावा.. त्याच्या वैभवाच्या, कीर्तीच्या, माध्यमप्रसिद्धीच्या झगमगाटाद्वारे नको.. लखलखाट कितीही डोळे दिपवणारा असला तरी त्याची सूर्याशी तुलना होऊ  शकेल का कधी?

डॉ. आनंद नाडकर्णी

anandiph@gmail.com