तो इथला नसावा असं सारखं वाटायचं. इथला म्हणजे मराठवाडय़ातला. का? तो मराठवाडय़ातला राठ नव्हता. ओबडधोबड, धसमुसळा, बेशिस्त, धडधाकटही नव्हता. अन् दलित तरी असेल का? त्याच्यात ना तो आक्रमकपणा, ना बेछूट जगण्याची रीत, ना अस्ताव्यस्त बोलणं. बहुधा दलित चळवळीला सापडलेला तो एखादा दलितेतर चेहरा असावा. काहीच कसं ठरावीक नसावं याच्यात? चपटं व पसरट नाक नाही. चेहरा चांगलाच हसरा आहे. केस बऱ्यापैकी कुरळे. दाढी-मिशी व्यवस्थित. म्हणजे कार्यकर्ता असूनही ओंगळ वाढलेली नाही, तर कापलेली. शर्ट-पॅन्ट तर असे, की हा बहुधा मुंबईहून कपडे आणत असावा. हेवा वाटावा असा त्याचा चॉइस. अजागळपणाचा मराठवाडी वावर अंगावर कुठंही नाही. नक्कीच हा मराठवाडी नसावा. बोलणं तर सांगायचंच, की महाशय या मातीतले नसावेत. अं.. इंग्रजीचा प्राध्यापक असला पाहिजे. त्या लोकांना असं जरा नीटनेटकं राहण्याची सवय असते. या आंग्ल भाषाध्यापकांना जरा वेगळेपणाची भावना असतेच, नाही तरी. मराठवाडय़ासारख्या आंग्लभाषा भयग्रस्त प्रदेशात तर असे लोक जरा स्मार्टपणा दाखवतातच. बायकोही ख्रिश्चन. जॅकलिन आहे म्हणे तिचं नाव. दिसतेही छान. म्हणजे महाराज खात्रीनं इथले नाहीत. आश्चर्य आहे.. औरंगाबादेत टिकलीय स्वारी अजून. त्यातही मिलिंदमध्ये! गंमत आहे बुवा या माणसाची..!

१९८१ साली डिसेंबरला औरंगाबादेत मी पुणं सोडून आलो. कधीतरी अविनाश डोळसची ओळख झाली. आणि माझं त्याच्याबद्दलचं मत असं बनलं. मी जिथे उपसंपादक म्हणून रुजू झालो ते दैनिक ‘मराठवाडा’ नामांतरविरोधी होतं. तो काळही मोर्चे, आंदोलने, लाँग मार्च, सत्याग्रह, जेल भरो यांचा होता. मी कधीही कोणत्या आंदोलनात उतरलो नाही. पत्रकार म्हणून कडेकडेनं न्याहाळायचो. नामांतर व्हायला हवं असं वाटायचं, पण कार्यकर्ता म्हणून तुरुंग वा कोठडी पाहावी अशी इच्छा कधी होऊ शकली नाही. इतकं सारं असूनही अविनाश ‘मराठवाडा’ दैनिकात येत-जात असायचा. पन्नालाल सुराणा संपादक झाल्यावर त्यात लिहूही लागला. लोकमत विरुद्ध मराठवाडा या झुंजीत तो आमच्या बाजूला राहू लागला. का, ते कळलं नव्हतं. हळूहळू समजू लागलं. तो कडवट झालेला नाही, हे उमगलं. उलट, अस्पृश्यता पाळणाऱ्यांपैकी तो नाही, हेही अनुभवाला आलं. मराठवाडय़ातले राजकीय कार्यकर्ते प्रत्येकाचा क्लोजअप् काढून तो जातीच्या फ्रेममध्ये कायमचा लटकावून टाकतात. ज्या विचाराचं, भूमिकेचं वृत्तपत्र आहे त्या वैचारिक व्यासपीठावर त्या पत्रकाराला कायमचं बसवून टाकतात. दोस्त-दुश्मन अशी पात्ररचना बहाल करून टाकतात. आपण काही बरं, वेगळं लिहिलं तरी ते त्यांच्या लेखी एक पवित्रा, बनाव, देखावाच असतो. त्यातून तो जन्मानं ब्राह्मण असला की संपलंच सारं! नामांतर चळवळीत का कोण जाणे, परंतु ब्राह्मण शत्रू ठरले अन् ब्राह्मणांनीही वैऱ्यासारखंच स्वत:ला पुढे आणलं. अविनाशनं असं कधी वागवलं नाही. मलाच काय, आमच्याबरोबरच्या कोणालाही.

छावणीतल्या तोफखान्यात तो राहायचा. एकदा त्याच्या घरी गेलो. छे! हा माणूस इथं असा राहतो? वाटलं होतं, हा तर एखाद्या बंगल्यातला असेल. पण हे जुनाट घर अन् तितकीच वयस्कर त्याची आई! ती पाहताच वाटायला लागलं, हा बहुधा इथलाच. आईची नऊवारी साडी, ग्रामीण भाषा, घरात भरपूर पोरं. नक्कीच डोळससर मराठवाडय़ातले दिसतात. आणि दलित तर निश्चितच दिसतात.

त्याकाळी दलित साहित्य तमाम परिवर्तनवाद्यांचं अग्रदूत बनलेलं होतं. त्यात अविनाशचा कथासंग्रह, नाटक झळकत होतं. ते वाचलेलं आठवतं. चांगलंय लेखन असं पटलं होतं. अच्छा, तर सर मराठीचे प्राध्यापक आहेत! समीक्षाही चांगली करतात. विशेष म्हणजे हा वाचूनबिचून बोलतो की! उगाच शेरेबाजी करीत नाही. महत्त्वाचे असे की, मराठीचा प्राध्यापक असूनही राजकारणाची उत्तम जाण आहे त्याला. पण हा खूप बोलतो. एकदा उभा राहिला की सव्वा- दीड तास घेतल्यावरच थांबतो. याचा अर्थ हा वाचतोही खूप. निरीक्षणंही एकदम भन्नाट असतात. भडक भाषा अन् बेजबाबदार विधानं तो टाळतो. इंटेलेक्च्युल असाच असावा लागतो. त्यानं समोरच्यांना चिथवणं, पेटवणं त्याला शोभत नाही. एकेक मुद्दा मेंदूत पेरत गेलं की आपोआप माणसं प्रेरित होतात. अविनाशला हे माहीत आहे. पण त्याचा बाज शिष्ट इंटेलेक्च्युलसारखा ताठर नाही. इतरांनाही श्रेय देण्याइतकं त्याचं मन मोठं आहे याची खात्री पटते. तो प्राध्यापक असल्यानं त्याला आधी विषयाचा इतिहास सांगायची सवय आहे. पूर्वपीठिका, पूर्वसुरी, पूर्वज यांची फार छान दखल तो भाषणातून घेत जातो.

जानेवारी, १९९० मध्ये नांदेडमध्ये पाचवं अ. भा. दलित नाटय़ संमेलन झालं होतं. अविनाश अध्यक्ष होता. अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका २७ पानी. बारीक फॉण्टमधली आहे. म्हणजे किती वेळ बोलला असेल हा बघा! ‘बोलण्याच्या ओघात विसरून जाईन म्हणून एका गोष्टीचा उल्लेख येथे आताच करतो..’ असं सांगून तो फार महत्त्वाचं बोलतो :

‘आपण असे बघतो की, जगभर औद्योगिकीकरणामुळे शहरी लोकांचे प्रश्न बिकट होत आहेत. जगभरच्या साहित्यात ते चित्रित होताना आपणास दिसताहेत. त्यामुळे चिरंतन अशी मानवी व्यवस्था ऱ्हास होत आहे असे जाणवते. जे स्वत:ला उच्च समजून घेत असतात अशा लोकांमध्ये हे ऱ्हासाचे प्रमाण फार असते. ही मूल्यव्यवस्था टिकवणे त्यांना शक्य होत नाही. अशा वेळी ही व्यवस्था निम्न स्तरातील लोकांमध्ये, विशेषत: गरीब, दलित, आदिवासी लोकांमध्ये टिकवून ठेवली जाते असे दिसते. त्याच्याकडे बघितल्यावर माणसाची काही चिरंतन मूल्यं आहेत, हे जाणवतं. त्यांच्यामुळेच हा होणारा ऱ्हास थांबविला जातो. यासाठी ‘शाकुंतल’ या संस्कृत नाटकातल्या प्रसंगाचं उदाहरण देतो..’ इथं अविनाश माशाच्या पोटात सापडलेली अंगठी एक कोळी राजाला प्रामाणिकपणे नेऊन देतो, ती गोष्ट सांगतो. जातीय विवेचनापेक्षा वर्गीय मूल्यात्मक ऱ्हासाकडे तो लक्ष वेधतो. ही दलित विचारकांमधली फार दुर्मीळ समज अविनाश दाखवतो. एखादा असता तर म्हणाला असता, शकुंतलेला विसरलेला दुष्यंत आणि त्यांचे संबंध सवर्णाचे अनैतिक संबंध होते. सबब त्यांना जे भोगावे लागले ते योग्यच होते. पण अविनाश प्रामाणिकपणा, निष्ठा, निर्मोह आणि त्याग या चिरंतन मानवी मूल्यांची जपणूक गरीब कसे करतात याचा ठामपणे दाखला देतो आणि त्याची दृष्टी किती व्यापक आहे हे सांगून जातो. महत्त्वाचे म्हणजे अविनाशच्या या भाषणानंतर दीड वर्षांनं भारतानं जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. आज चौकटीतल्या ज्या बातम्या असतात, त्यातले नायक व नायिका आवर्जून गरीब, कष्टकरी, वंचित असतात. कोळ्याने अंगठी परत केली, ही खरं तर दुष्यंताच्या काळच्याही पेपरांमधली चौकटीची बातमी असते. २७ वर्षांपूर्वीचा अविनाशचा चिरंतन मूल्यांवरचा विश्वास तसं बघितलं तर आंबेडकरांच्या संयमाचाच एक आविष्कार आहे. बाबासाहेब त्रागा खूप करीत, पण त्यांनी हिंसा, द्वेष, शत्रुत्व, प्रतिशोध यांना कधीही थारा दिला नाही. अविनाशही टोकाच्या भूमिका न घेता ठोस विचार मांडत राहतो.

२०११ च्या जानेवारीत घग्घुस (जि. चंद्रपूर) इथं १२ वं अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन पार पडलं. अध्यक्ष अर्थातच अविनाश. तिथंही त्यानं त्याच्या सविस्तर शैलीत भाषण केलं. त्यानं तिथं सरळ सांगून टाकलं की, ‘वैचारिक लेखनाचा अपवाद सोडल्यास आज आंबेडकरी साहित्य हे नोंद घ्यावे असे दिसत नाही. गेल्या दहा वर्षांत ज्याच्या साहित्याची चर्चा व्हावी असा साहित्यिक वा साहित्यकृती दिसत नाही. एक प्रकारचे अदखलपात्र असे हे साहित्य झाले आहे.’ आता या विधानाला खुद्द वक्ताच जबाबदार आहे बरं का! का नाही अविनाश कथा लिहीत राहिला? त्याच्यातला नाटककार कुठं त्यानं दडवून ठेवला होता? साहित्यानं काही परिवर्तन घडत नसतं असं मानून थंड नाही ना बसला? क्षमता असतानाही तो सर्जनशील राहू शकला नाही. कितीदा त्याचे कान उघडले, पण तो काही कोणाचं ऐकत नाही. डोळस आहे म्हणून कानांचा उपयोग करूच नये काय?

त्याच्या २००६ सालच्या एका सदरातील लेखनाचं ‘सम्यक दृष्टीतून’ या शीर्षकाचं पुस्तक प्रसिद्ध झालं. अविनाशनं त्याच्या सदराचं क्रमबद्ध संकलन, विषयानुरूप वर्गवारी करण्याचं काम माझ्यावर सोपवलं. अजित दळवीला अविनाशनं प्रस्तावना लिहायला सांगितलेलं. दोघंही नाटकातले. अविनाशनं बरोब्बर अशा मित्राला प्रस्तावनेसाठी जुंपलं, जो नाटककार आणि चित्रपटांचा संहितालेखक म्हणून तर नावाजलेला आहेच; परंतु तो अविनाशवर खूप जीव असणाऱ्या बाबा दळवींचा ज्येष्ठ मुलगाही आहे, हेही त्यामागचं एक कारण होतं. अविनाशमध्ये काय खासियत आहे कोण जाणे. अनंत भालेराव अन् बाबा दळवी या दोन्ही दिग्गजांचा तो लाडका होता. अण्णा-बाबा एकमेकांशी भांडून दुरावलेले. पण अविनाशनं त्यांच्यातलं पालकत्व अन् विश्वास असा मिळवला, की दुसऱ्या कोणाला तसं जमलं नसतं कधी. अशा बडय़ांकडून मिळेल तसं ज्ञान घ्यावं, हा अविनाशचा गुण. त्याचं निष्कपट मन, निर्व्याज हास्य त्याला अशा व्यक्तींचा सहवास देऊन गेलेलं आहे.

अविनाशला औरंगाबादेतल्या साऱ्या डाव्या अन् पुरोगमी पक्ष, संघटना, व्यक्ती आदींनी लोकसभेची निवडणूक लढवायला लावली होती. साल १९९६ होतं की १९९८, ते आठवत नाही. नापास करणाऱ्या परीक्षा देण्याचा एका हुशार विद्यार्थ्यांचा तो प्रयत्न होता. त्यानं अविनाशला समाज, राजकारण, प्रचार, पैसा, विचार अशा अनेक विषयांत खूप शिकवलं. आम्हालाही! अशीच एक निवडणूक अविनाश, वासुदेव मुलाटे, मी, श्रीकांत उमरीकर आदींनी मिळून मराठवाडा साहित्य परिषदेची लढवली. निदान तो अन् मुलाटे तरी जिंकतील असं वाटत होतं. मी भरीस घातलं म्हणून तो सामील झाला. ठालेसरांचा एकखांबी कारभार त्यालाही नकोसा झाला होता. पण तिथेही अपयशानंच समृद्ध व्हायची पाळी आली!

बापू काळदाते, बाबा आढाव, अंकुश भालेकर, चंद्रगुप्त चौधरी हे विद्यापीठ नामांतर आंदोलनाचे म्होरके. त्यांना अविनाश जसा एखाद्या कार्यकर्त्यांसारखा भेटला, तसाच तो त्यांच्या तरुण मित्रांत जमा झाला. वाचन, विचार, कर्तृत्व यात पारंगत अविनाश या मोठय़ांना आवडायचा; अन् आज तरुणांनाही आवडतो.

राजकीय धामधुमीत वाचणं राहून गेलं की हा आवर्जून हक्कानं माझ्यासारख्याकडे येतो अन् म्हणतो, ‘अमक्या विषयाबद्दल बोलू या.’ तो विचारू लागला की आपला मेंदूही काही उकरून, खोदून बाहेर काढतो अन् मग किती वेळ गेला, काही कळत नाही. हा मिनॅन्डर आपल्याला नागसेनाचं स्थान देतोय, हे लक्षात यायला जरा वेळ लागतो. नंतर वाटायला लागतं, तेवढय़ा आभासी स्थानासाठी तरी भेटत जा गडय़ा! बरं वाटतं.