15 August 2020

News Flash

‘कट्टा’उवाच : डायरी

कधीकाळी ती रोज लिहिली जायची आणि हळूहळू रोज वेळ मिळेनासा झाल्यावर ती कधीतरी लिहिली जायला लागली.

वेदवती चिपळूणकर

डायरी! साधा इंग्रजी शब्द आणि साधा मराठीतला अर्थ ‘रोजनिशी’ किंवा ‘दैनंदिनी’! डायरी म्हणजे अशी एक वस्तू जी निर्जीव असूनही आपलं सगळं ऐकून घेते आणि कोणतंही स्पष्टीकरण मागत नाही. डायरी दिसायला कशीही असली तरी सगळ्या गोष्टी तिला माहीत असतात आणि त्या लपवून ठेवण्याचं सामर्थ्यही तिच्यात असतं. कधीकाळी ती रोज लिहिली जायची आणि हळूहळू रोज वेळ मिळेनासा झाल्यावर ती कधीतरी लिहिली जायला लागली. मग नवीन वर्षांचा संकल्प म्हणून जानेवारीचा महिना डायरी लिहिली जायची आणि आता तर स्वत:बद्दल विचार करायला तेवढा वेळही कोणाकडे नसतो. त्यामुळे डायरी वगैरे खूपच लांब राहिली.

डायरी तरीही आपल्या शब्दकोशात आणि रोजच्या धावपळीत महत्त्वाची ठरते, कारण ती बदलत्या रूपात समोर येते आहे. या जुन्या डायरीची जागा आता फोटो डायरीने घेतली आहे आणि तीही प्रत्यक्षात नाही तर, सोशल मीडियावर! फेसबुकवर फोटो पोस्ट करताना अल्बम क्रिएट करण्याचा पर्याय खूप आधीपासून आहे. मात्र अल्बम तयार करताना त्याला नाव, थोडंसं डिस्क्रिप्शन वगैरेचा विचार करायलाही आता वेळ नसल्यामुळे अल्बम वगैरे तयार करण्याच्या भानगडीत न पडता फक्त फोटो पोस्ट करून त्याला कॅप्शन देणं एवढंच केलं जातं. इन्स्टाग्रामवर मात्र हा अल्बमचा पर्याय कधीच उपलब्ध नव्हता. त्यामुळे फोटो पोस्ट करताना त्याला कॅप्शन देणं आणि फोटोला शोभेल असा हॅशटॅग देणं हाच एकमात्र मार्ग होता. याच हॅशटॅगमध्ये #weddingdiaries, #traveldiaries, #birthdaydiaries वगैरे असे हॅशटॅग वापरून लेखी डायरीजचं परिवर्तन फोटो डायरीजमध्ये झालं. अनुभव शब्दांत व्यक्त करण्यापेक्षा फोटोत दिसणाऱ्या चेहऱ्यावर व्यक्त करण्याला प्राधान्य मिळू लागलं. काही वेळा त्यात नुसतं ट्रॅव्हल म्हणायच्या ऐवजी स्पेसिफिक जागांचाही उल्लेख व्हायला लागला.

लेखी डायरी आणि ही सोशल फोटो डायरी या दोन्हींत एक साम्य मात्र आहे. वर्षांच्या शेवटी डायरी म्हणजे आठवणींचा पेटारा बनलेला असतो जो प्रत्येकजण उघडून बघत असतो. सरत्या वर्षांला निरोप देताना वर्षभरात घडलेल्या घटनांकडे बघण्याचा मोह प्रत्येकाला होतो, मग ती लेखी डायरी असो किंवा फोटो डायरी ! आणि आतापर्यंत हा मोह झाला नसेल तर यावेळी डायरी तयार करून पाहा !

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2018 2:48 am

Web Title: article about importance of daily diary in life
Next Stories
1 ‘पॉप्यु’लिस्ट : संगीतातला भक्तिरस..
2 कॅफे कल्चर – बी. मेरवान अ‍ॅण्ड कंपनी : तुम जिओ हजारो साल..
3 ब्रॅण्डनामा : वॅसलिन
Just Now!
X